26 February 2021

News Flash

कुतूहल – शेतमाल प्रक्रिया

जागतिकीकरणानंतर आपल्या देशात काही विदेशी कंपन्या आल्या. भारत आणि चीन हे दोन देश जगातील मोठय़ा बाजारपेठा आहेत. या विदेशी कंपन्यांनी भारतात प्रवेश केला आणि शेतमालावर

| June 12, 2013 12:03 pm

जागतिकीकरणानंतर आपल्या देशात काही विदेशी कंपन्या आल्या. भारत आणि चीन हे दोन देश जगातील मोठय़ा बाजारपेठा आहेत. या विदेशी कंपन्यांनी भारतात प्रवेश केला आणि शेतमालावर व फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग प्रस्थापित केले. मक्याच्या लाह्य़ा, बटाटे वेफर्स, ज्यूस, केचप, सॉस यांचे उत्पादन सुरू केले. या कंपन्या हाच माल आपल्या देशात विकून प्रचंड फायदा मिळवीत आहेत.
आपल्या देशात फळे आणि भाजीपाल्याच्या फक्त दोन टक्के मालावर प्रक्रिया केली जाते. इतर देशात ८० ते ९० टक्के मालावर प्रक्रिया केली जाते. आपण आपल्या देशातील शेतमाल उदा. द्राक्षे, आंबे, भाज्या आणि औषधी वनस्पती जशीच्या तशी कच्चा शेतमाल म्हणून निर्यात केली तर मालाचा भाव कमी मिळतो. पण आंब्याऐवजी आमरस, द्राक्षापासून बेदाणे, वाइन, दुधापासून दूध पावडर, लसणीऐवजी लसूण पावडर असे पदार्थ करून त्यांचा टिकाऊपणा वाढवला तर शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो.
शेतमाल प्रक्रिया उद्योगासाठी ग्रामीण भागात युवकांना पुष्कळ संधी आहेत. स्वयंरोजगार करण्याची अत्यंत चांगली संधी आहे. या क्षेत्राचे महत्त्व ओळखून भारत सरकारने अन्न प्रक्रिया मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्याच्या बऱ्याच योजना आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान रोजगार हमी योजनेतून जिल्हा शेती अधिकारी काजूप्रक्रिया व इतर उद्योगांना मदत करतात. युवकांनी व फळभाज्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्हा उद्योग केंद्राची, शेतकी अधिकाऱ्यांची मदत घेऊन आपले उद्योग प्रस्थापित करावेत.
२००५ या वर्षी शेती मंत्रालयाच्या पुढाकाराने ‘व्हेन्चर कॅपिटल फॉर एग्रोबिझिनेस प्रोजेक्ट्स’ ही योजना जाहीर झाली. या योजनेतून छोटय़ा शेतकऱ्यांना तसेच शेती उद्योगांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. ही योजना भारत सरकारच्या सर्व बँकांमधून राबविली जाते. ग्रामीण भागातील महिला गटांनी मोठय़ा प्रमाणात या क्षेत्रात शिरण्याची गरज आहे. कारण खाद्य पदार्थ व फळ प्रक्रिया क्षेत्रात त्या सहज भाग घेऊ शकतात.

जे देखे रवी..   – ती सहृदय संपादक
माझ्यावर चालवलेल्या हलगर्जीपणाच्या खटल्यात माझ्याविरुद्ध निर्णय झाल्यावर किंवा त्याच्या आधी धादांत खोटी माहिती असलेली एक बातमी एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या तिसऱ्या पानावर चार कॉलमी मथळा देऊन छापण्यात आली. त्या बातमीच्या खाली बातमी देणाऱ्या बाईचे नाव छापले होते. माझ्या डोक्यात सणक चढली आणि मी त्या वर्तमानपत्राला फोन केला. कोणी धड उत्तर देईना.
मग मी गनिमीकावा केला. त्या स्त्री वार्ताहराची माहिती मिळवली. मग एका बऱ्यापैकी वरच्या स्तरावरच्या उपसंपादकाची ओळख काढली आणि काहीतरी इतर कामासाठी भेटायचे आहे म्हणून त्याची वेळ घेतली. माझी झाडाझडती घेऊन मला आत सोडण्यात आले. त्या माणसाशी मी गप्पा मारू लागलो, मग माझ्या बातमीच्या अनुषंगाने विचारू लागलो. मग आरडाओरडा करू लागलो. एखाद दुसरी लहान वस्तू इकडे फेकत ‘‘आताच्या आता मला संपादकाशी भेट करून द्या’’ अशा गर्जना करू लागलो. हे सगळे नाटक होते. सगळे लोक आवाक झाले. सुरक्षारक्षक आले, मला धरू लागले तेव्हा मी त्यांच्याशी मारामारी सुरू केली, तेव्हा एका केबिनमधून एखादी राणी शोभावी अशी एक बाई बाहेर आली आणि म्हणाली मीच संपादक आहे, जरा आत या.
मग मी तिच्याशी अर्धा तास बोललो. ती जे म्हणाली ते ऐकून मी थक्कच झालो. ती म्हणाली, ‘‘ही बातमी छापताना मलाही ती बातमी योग्य वाटली नव्हती. त्या बातमीसाठी तुमच्याशी संपर्क झाला नव्हता हे पत्रकारितेच्या नीतीप्रमाणे नव्हते, पण ती बातमी छापली गेली हे अयोग्यच होते.’’ मी तिला म्हटले, ‘‘ही तुमची वार्ताहर स्त्रीवादी आणि घटस्फोटित आहे, पण म्हणून तुम्ही मला बकरा करू नका. तिला माझ्यासमोर उभी करा आणि हिने जर घटस्फोट घेतला आहे तर ही नवऱ्याचे नाव का लावते?’’ त्या वेळी ही राणीसारखी दिसणारी संपादक म्हणाली. ‘‘असल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास मी बांधील नाही.’’ पण जर तुम्ही मला रीतसर पत्र दिलेत तर ते मी आमच्या वार्ताहरांच्या बैठकीत ठेवीन आणि जर सगळ्यांनी हो म्हटले तर त्याबद्दल काय आणि कसा मजकूर छापायचा हे ठरवता येईल.
मी तिचे आभार मानले आणि घरी जाऊन पत्र लिहिले आणि मला वाटते फॅक्स केले. चार दिवसांनी दिलगिरीच्या चार छोटय़ाशा ओळी छापून आल्या. मूळ बातमीच्या पाच टक्केही नसतील पण आल्या. पण हे भांडण मी पुढे चालू ठेवणार होतो आणि त्याला कारण घडले माझ्या मेव्हण्याच्या अनैसर्गिक मृत्यूबद्दल छापलेल्या एका विपर्यस्त बातमीमुळे त्याबद्दल उद्या. हे प्रकरण सुरू झाले कुठे आणि गेले कुठे, हे मागे वळून बघतो तेव्हा मलाच माझे हसू येते.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस  – महारोग : भाग १
महारोगाचे पूर्ण निर्मूलन आयुर्वेदीय पद्धतीने होते की नाही हा प्रश्न अलाहिदा. काही मर्यादित अवस्थेत, लक्षणात आम्हाला मिळालेले आयुर्वेदीय चिकित्सेचे यश सर्वापुढे मांडत आहे. महारोगातील जखमा, पुन: पुन: येणारा ताप, गळून जाऊ पाहणारी हातापायाच्या बोटांची हाडे, शरीराचा दर्शनी भीषणपणा व एकूण आरोग्य यात विलक्षण फरक आयुर्वेदीय औषधांनी होतो. हा फरक तातडीने पडतो, त्याला फार काळ लागत नाही. सुमारे ५०-५५ वर्षांपूर्वी केंद्रातील आरोग्य मंत्रालयाअंतर्गत आयुर्वेद विभागातर्फे देशभर या रोगाकरिता, काहीशे रुग्णांवर आयुर्वेद चिकित्सा केली गेली. फलनिष्पत्ती ‘आयुर्वेदीय औषधांनी महारोग बरा होत नाही.’ या संशोधनात पहिल्यापासून चुकीची पद्धत अवलंबिली होती. त्या काळच्या थोर आयुर्वेदीय तज्ञांनी ती सरकारी संधी नीट वापरली नाही याचा खेद वाटतो. असो.
एक दिवस आमच्या एका मित्राच्या घरी तळेगावला खोलीत शिरताच जखम सडल्याचा घाण वास आला. चौकशी केली. पायाच्या अंगठय़ाची जखम भरत नव्हती. हाड निघून येत होते. त्याकरिता दोन दिवसांनी प्लॅस्टर किंवा अंगठा काढून टाकणे असा उपचार ठरला होता. ताप हे प्रमुख लक्षण  दिसत होते लघुमालिनी वसंत, लाक्षादि गुग्गुळ व आरोग्यवर्धिनी पोटात घेण्याकरिता सुरू केली. त्रिफळाच्या काढय़ाने जखम धुवून एलादितेलाची वात व्रणात भरावयास सांगितली. पत्नी वैद्य, अतिसेवा तत्पर, त्यांनी मनोभावे व्रणोपचार केले. त्यानंतर ती व्यक्ती जवळपास उत्तम आरोग्य सांभाळून २५ वर्षे जगली. अंगठा, पाय कापावे लागले नाही. आयुर्वेदात ‘अस्थिसार’ असा एक प्रकृतीचा प्रकार सांगितलेला आहे. ही माणसे दीर्घायुषी असतात. त्यांच्या जखमा लवकर बऱ्या होतात. महारोगविकारातील ज्वर, व्रण, अस्थिसारपुरुष एलादितेलाचे शोधनरोपण गुण, त्रिफळा काढय़ाचे व्रणधावनाचे गुण, लघुमालिनीवसंत, आरोग्यवर्धिनी, लाक्षादिगुग्गुळ, लाक्षाधिघृत अशा अनेक औषधांचे अनुभव रुग्णांमुळे शिकलो!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – १२ जून
१८६१> आगरकरांच्या ‘सुधारक’मधील एक संपादक सीताराम  गणेश देवधर यांचे निधन.  ‘माझा जीवन वृत्तान्त’ या त्यांच्या आत्मकथनातून महाराष्ट्रातील सुधारणांच्या लढय़ांचे तपशीलवार चित्रण झाले आहे.
१९१७ > लेखक आणि अनुवादकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म. केसरी पत्रात त्यांनी काम केले व ‘सह्याद्री’चे संपादकपद भूषविले. स्वा. सावरकरांवर ‘यज्ञ’ तर लालबहादुर शास्त्रींच्या जीवनावर ‘अमृतपुत्र’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ‘प्रबुद्ध’ या कादंबऱ्या, चार्ली चॅप्लिनचे ‘हसरे दु:ख’ हे चरित्र, मनोहर माळगावकरांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद असे विपुल लेखन त्यांनी केले. २१ जून २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.
१९४२ > कवी, ललितगद्य लेखक गुरुनाथ नारायण धुरी यांचा जन्म. ‘ग्लोरिया’, ‘समुद्रकविता’, ‘लालकोवळा काळोख’ हे त्यांचे कवितासंग्रह, तर ‘आदिकाळोख’ हा ललितगद्य लेखांचा संग्रह ही त्यांची ग्रंथसंपदा. त्यांची कविता गूढ, चिंतनात्मक व जीवनाच्या सखोल जाणिवेची असल्याचा समीक्षकांचा अभिप्राय आहे.
– संजय वझरेकर
पांडुरंग सदाशिव साने  (गुरुजी) यांच्या निधनाची नोंद (११ जून १९५०) मंगळवारच्या अंकातून अनवधानाने सुटली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2013 12:03 pm

Web Title: commodities process
टॅग : Navneet,Navnit
Next Stories
1 कुतूहल- भाभा अणू संशोधन केंद्र
2 कुतूहल : हरितक्रांतीचे जनक : डॉ. नॉर्मन बोरलॉग
3 कुतूहल : भारत उत्पादनात पुढे, पण उत्पादकतेत मागे का?
Just Now!
X