News Flash

संस्थानांची बखर – त्रावणकोर राज्यस्थापना

कन्याकुमारी जिल्हय़ाचा प्रदेश अंतर्भूत असलेले त्रावणकोर हे महत्त्वाचे संस्थान होते.

डी लॅनॉय मरतड वर्माला शरण आला.

सध्याच्या केरळ प्रांतातील मध्य आणि दक्षिण प्रदेश, तसेच तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्हय़ाचा प्रदेश अंतर्भूत असलेले त्रावणकोर हे महत्त्वाचे संस्थान होते. चेरामण ऊर्फ कुलशेखर या घराण्याची सत्ता असलेल्या या त्रावणकोर संस्थानाचे क्षेत्रफळ २० हजार चौ.किमी. होते. चेरा घराण्याची सत्ता असताना पूर्वी या राज्य प्रदेशाचे नाव थिरुविथमकोड असे होते. पुढे त्याचे थिरुबनकोड होऊन इंग्रजांनी त्याचे त्रावणकोर केले. चेरा राज्यातून निराळे निघालेल्या आयी राज्यम या राज्यात उत्तरेला कोल्लम (सध्याचे क्विलान), तिरुवनंतपूरम जिल्हा आणि कन्याकुमारी हा प्रदेश होता. राजधानी कोल्लम येथे होती आणि राज्याचे नाव वेनाड होते. १७२९ साली वेनाड या लहान राज्याच्या राजेपदी आलेल्या मरतड वर्मा याने कन्याकुमारीच्या आसपासचे सर्व जहागीरदार, सरंजामदार यांना लढायांमध्ये पराभूत करून मोठा राज्यविस्तार केला. मरतड वर्माने आपली राजधानी पद्मनाभपूरम येथे ठेवून आपल्या २९ वर्षांच्या कारकीर्दीत दक्षिणेला कन्याकुमारीपासून उत्तरेस कोशी म्हणजे कोचिनपर्यंत राज्यविस्तार केला. मरतड वर्माने पराभूत केलेल्या अनेक जहागीरदार, सामंतांशी त्या काळात डच ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारी संबंध होता. मरतड वर्माची वाढती ताकद पाहून डच कंपनी आणि त्रावणकोर राज्यात १७३९ पासून चकमकी उडू लागल्या. कोलाचेल येथे १७४१ मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी आणि त्रावणकोरच्या फौजांमध्ये झालेल्या लढाईत डच फौजांचा पराभव होऊन डच व्यापाऱ्यांचे त्या प्रदेशातून उच्चाटन झाले. या लढाईत डच अ‍ॅडमिरल डी लॅनॉय पकडला गेला. पुढे मरतड वर्माने डी लॅनॉयला त्रावणकोरच्या नाविक दलाचा प्रमुख (दर्यासारंग) पदावर नोकरीस ठेवून त्याचा उपयोग करून घेतला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल – भू तंत्र वस्त्रे – भाग २
भू तंत्र वस्त्रांचे वर्गीकरण तीन वर्गात केले जाते. विणाई प्रक्रियेने तयार केलेली वस्त्रे, विनावीण वस्त्रे आणि गुंफाई प्रक्रियेने तयार केलेली वस्त्रे. बहुतांश भू तंत्र वस्त्रे ही विणाई किंवा विनावीण प्रक्रियेने तयार केली जातात. काही खास उपयोगासाठी गुंफाई प्रक्रियेने तयार केलेली वस्त्रे वापरली जातात. ज्या उपयोगामध्ये वस्त्रांची ताकद महत्त्वाची असते आणि गाळण क्रिया महत्त्वाची नसते अशा ठिकाणी विणाई प्रक्रियेने तयार झालेले कापड वापरले जाते. ज्या उपयोगामध्ये गाळण क्रिया आणि पाण्याचे वाहन महत्त्वाचे असते अशा ठिकाणी विनावीण कापडांचा वापर केला जातो. भू तंत्र वस्त्रे फार मोठय़ा आकारामध्ये लागतात आणि म्हणून त्यासाठी खर्चाचे प्रमाण ही मोठे असते. विनावीण वस्त्रे ही कमी खर्चामध्ये तयार होतात आणि बहुतेक उपयोगांसाठी आवश्यक असणारे गुणधर्म त्यांच्यामध्ये असतात. त्यामुळे जगभर वापरल्या जाणाऱ्या एकूण भू तंत्र वस्त्रांपकी सुमारे ८५ टक्के वस्त्रे ही विनावीण पद्धतीच्या कापडांपासून तयार केली जातात. सुमारे १० टक्के भू तंत्र वस्त्रांसाठी विणाई प्रक्रियेने तयार केलेले कापड तर उरलेल्यासाठी गुंफाई प्रक्रियेने तयार केलेले कापड उपयोगात आणले जाते.
भू तंत्र वस्त्रे तयार करण्यासाठी जे तंतू वापरले जातात त्यांच्यामध्ये पुढील गुणधर्म असणे आवश्यक असते. १) उच्च रसायनरोधक क्षमता, २) लवचीकता, ३) उच्च वितळणिबदू, ४)अतिनील किरणांना अवरोध, ५) जैविक विघटनास विरोध आणि ६) फाटण्याच्या किंवा खुपसण्याच्या क्रियेमध्ये टिकून राहण्याची क्षमता.
हे गुणधर्म नसíगक तंतूंपेक्षा संश्लेषित तंतूंमध्ये म्हणजेच मानवनिर्मित तंतूमध्ये अधिक चांगल्या दर्जाचे असतात आणि म्हणून भू तंत्र वस्त्रांसाठी संश्लेषित तंतूंचा उपयोग सर्वाधिक प्रमाणामध्ये करण्यात येतो. भू तंत्र वस्त्रे तयार करण्यासाठी पॉलिप्रॉपिलीन, पॉलिस्टर, नायलॉन, पॉलिव्हिनिलिडीन क्लोराइड आणि काच तंतू यांचा वापर मोठय़ा प्रमाणावर करण्यात येतो. काही खास आणि महत्त्वाच्या उपयोगांमध्ये केवलार किंवा अ‍ॅरॅमिड यासारख्या उच्च कार्यक्षमतेच्या तंतूंचाही उपयोग केला जातो.
चं. द. काणे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2015 1:40 am

Web Title: creation of travancore state
Next Stories
1 भू तंत्र वस्त्रे – भाग १
2 टान्ट साडी
3 स्थापत्य तंत्र वस्त्रे
Just Now!
X