News Flash

कुतूहल: पांढरा आणि रंगीत कागद

नवीन, कोऱ्या, पांढऱ्या स्वच्छ कागदावर लिहिताना मजा येते आणि रंगीत कागदापासून हस्तकलेच्या वस्तू तयार करण्यात वेगळाच आनंद असतो.

| February 21, 2014 01:01 am

नवीन, कोऱ्या, पांढऱ्या स्वच्छ कागदावर लिहिताना मजा येते आणि रंगीत कागदापासून हस्तकलेच्या वस्तू तयार करण्यात वेगळाच आनंद असतो. या दोन्ही गोष्टींचा अनुभव आपण नेहमीच घेतो. हा आनंद आपल्याला देणारी रसायनं म्हणजे कागद तयार करताना वापरले जाणारे रंग.
रंगद्रव्य नसíगक आणि मानवनिर्मित असतात. कागद तयार करताना वापरल्या जाणाऱ्या रंगाचे मुख्यत: दोन प्रकार असतात. पाण्यात विद्राव्य आणि अविद्राव्य रंगद्रव्य. हा पाण्यात न विरघळणारा अत्यंत बारीक कणांनी तयार झालेला घन पदार्थ असतो.
 पिवळी माती, लाल माती, काजळी या पदार्थापासून नसíगक रंगद्रव्य मिळवतात. हे रंग कागदामधील तंतूमध्ये अडकून बसतात, त्यामुळे कागदावर रंग पक्का बसतो.
दुसऱ्या प्रकारचे रंग पाण्यात विरघळतात. या रंगांना विद्राव्य रंग म्हणतात. पेट्रोलियम पदार्थापासून तयार केलेल्या या रंगांना औद्योगिक भाषेत ‘डाय स्टफ’ म्हणतात. पाण्यात विरघळणाच्या या रंगाच्या गुणधर्मामुळे कागदाच्या तंतूवर सारखे पसरतात. जर हे रंग आम्लधर्मी असतील तर कागदाला चकाकी येते. आम्लधर्मी रंगामध्ये मुख्यत: सल्फोनिक आणि काबरेनिक आम्लं असतात. त्यातून लाल, केशरी रंगाच्या छटा मिळतात. आणि कागदाचा रंग लवकर उडून जात नाही.
हे रंग वनस्पतींपासून सुद्धा मिळवतात. इंडिगो हा एक निळा रंग इंडिगोफेरा या प्रजातीतील वनस्पतींच्या भागांपासून मिळणारा रंग आहे. छपाईसाठी स्वच्छ पांढरा आणि चकचकीत कागद तयार करताना कागद्याच्या लगद्यात टिटानियम डायऑक्साईड हे पांढऱ्या रंगाचे, अकार्बनी, अविद्राव्य रंगद्रव्य वापरलं जातं. बेरियम सल्फेट या रंगद्रव्याचा लेप कागदावर दिल्यावर कागदाला एक वेगळीच चमक येते आणि कागदावरून पांढरा रंग किंवा इतर कोणताही रंग जास्त प्रमाणात परावर्तित होतो. हा कागद फोटो छापण्यासाठी वापरतात. रंगीत कागदाचं उत्पादन करताना लगद्यामधील पाण्याचं, रंगद्रव्याचं प्रमाण, रंगद्रव्य घालण्याची वेळ, यासाठी खूप सतर्क राहावं लागतं. या सर्वाचं नियोजन करणारी व्यक्ती बदलली तरी कागदाची रंगछटा बदलते.
मनमोराचा पिसारा: लॉजिकॉमिक्स मुखपृष्ठ कथा
वेश असावा बावळा, अंगी नाना कळा.. या विचार संस्कृतीत लहानाचं मोठं झाल्यानं माणसांकडे आणि पुस्तकांकडे पाहण्याचा एक विशेष दृष्टिकोन मनात रुजू झाला आणि उगीचच आकर्षक मुखपृष्ठ आणि परिवेश करणारी माणसं आणि पुस्तकं (अनुक्रमे) उलट बाजूने दिखाऊ असतात, त्यांच्या मजकुरात आणि व्यक्तिमत्त्वात दम नसतो, असा समज निर्माण झाला. मग हळूहळू लक्षात आलं की, माणसाचा चेहरा म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब असतं, तसं पुस्तकांचं मुखपृष्ठ असतं.
अलीकडे आकर्षक आणि अत्यंत अर्थपूर्ण मुखपृष्ठ धारण करणारे ‘लॉजिकॉमिक्स’ हे पुस्तक वाचलं आणि अक्षरश: साक्षात्कारी अनुभव जमेस आला. ‘लॉजिकॉमिक्स’ हे पुस्तक तसं माझ्या किनारी उशिरा लागलं, पण लागल्यानंतर त्यानं मनाचं थेट बंदर (!) करून टाकलं. मी प्रेमात पडलोय या पुस्तकाच्या! त्यामुळे किती सांगू आणि किती नको असं झालंय. म्हणून इथं आज मुखपृष्ठाविषयी लिहितो. अपोस्टोलोस डॉक्सिआडिस आणि क्रिस्टोस पापाडिमित्रा (चूकभूल द्यावी घ्यावी) अशी थेट ‘अ‍ॅस्टेरिक्स कॉमिक्स’मध्ये शोभणाऱ्या ग्रीक लेखकद्वयीचं पुस्तकं आहे, ग्राफिक पुस्तक आहे ‘‘बट्र्राण्ड रसेल’ या ब्रिटिश तर्कवेत्ता आणि गणितज्ज्ञाच्या आयुष्यावर बेतलेली चरित्रात्मक गोष्ट त्यांनी सांगितली आहे. पुस्तकाची टॅग लाइन आहे ‘अ‍ॅन एपिक सर्च फॉर ट्रथ!’ सत्याचा चिरंतन महाशोध.
पुस्तकावरील चित्रात ‘क्लिक’ असं म्हणून डॉमिनो इफेक्टचे ग्राफिक आहे. डॉमिनो इफेक्ट ही मूळ राजकीय निरीक्षण सूत्री म्हणून प्रसिद्ध पावली. पूर्व आशियात साम्यवादी विचारांची सुरुवात होऊ दिली तर एकामागोमाग अनेक लहान-मोठी राष्ट्रं आपोआप रशियाच्या अंकित होतील, असं निरीक्षण धोरणी राजकारण्यांनी नोंदवलं. सुरुवात एके ठिकाणी आणि अंतिम परिणाम (भलत्याच) ठिकाणी कसा होतो हे लक्षात घेतल्यास, या पडझडीनं होणारा विद्ध्वंस टाळायचा असेल तर सुरुवातीलाच ‘क्लिक’ करू नका, असा इशारा त्यांनी राजकारण्यांना दिला.
हाच डॉमिनो इफेक्ट लेखकांनी होकारात्मक पद्धतीने चित्रित केलाय. लहानपणी पडलेल्या भीतीदायक स्वप्नं आणि विचित्र घटनांचा शोध ‘बर्टी’ घेऊ लागतो. एकातून दुसरा आणि त्यातून तिसरा असे अनेक शोध तो आयुष्यभर घेत राहतो. बालपणातल्या रहस्यमय अनुभवातून निर्माण झालेल्या जिज्ञासेपोटी तो सत्याचा शोध घेतो. असा अर्थ या ग्राफिकमधून सूचित होतो. डॉमिनो खेळण्याला पहिला धक्का आपण बोटांनी देतो तेव्हा ‘क्लिक’ आवाज येतो. त्यातूनच एकावर एक आदळणाऱ्या डॉमिनो (प्लास्टिकमुळे पुन:पुन्हा क्लिकचा आवाज येत राहतो आणि बघता बघता आपल्यासमोर उभारलेली डॉमिनोची आकृती रूप पालटते. सत्याचा आविष्कार हा असा होतो. हे या ग्राफिकमधून अतिशय सहजपणे जाणवतं. मुखपृष्ठावरचं हे चित्र अतिशय अर्थपूर्णतेनं मनात साकार होतं. प्रत्यक्ष पुस्तकातली गोष्ट आणि विशेषत: ग्राफिकची चित्रभाषा याविषयी शनिवारच्या अंकात.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व: ‘हिंदु व हिंदुधर्मा’बद्दल राजारामशास्त्री भागवत
‘‘ जोपर्यंत हिंदु म्हणणे सोडून देता येत नाही, जोपर्यंत हिंदुत्वाची आवड अस्तिगत ज्वराप्रमाणे सोडून जात नाही, तोपर्यंत हिंदु धर्माचा मोठा अभिमान वाटतो, तोपर्यंत राष्ट्राची किंवा देशाची गोष्टही असलेल्यांच्या पुढे नको, व विठोबाची* सुतराम नको आहे. हिंदुत्वाचे व त्यांच्या अभिमानाचे रुजलेले रानदेखील काढून टाकण्यास ज्यांचे हात लटपट कापतात, त्यांच्या हातून, राष्ट्राकडे किंवा देशाकडे मजल मारताना वाटेवर पडलेल्या लहानमोठय़ा काटय़ांची योग्य निरवानिरव लागणार कशी? क्षत्रिय म्हणवा, ब्राह्मण म्हणवा, ही दोन्ही नांवे अशी आहेत कीं, योग्य अभिमान बाळगता येणाऱ्या भूतकाळींच्या इतिहासाशी व ऐतिहासिक गोष्टीशी नातें या दोन्हींपैकी हव्या त्या नांवाने सहज जोडता येते.  ही दोन्ही श्रुतिस्मृतिपुराणांच्या पदरी पडून पवित्र झालेली आहेत..’’  अशा शब्दांत ‘हिंदु व हिंदुधर्म’ या निबंधात (तोही १९०५ साली लिहिलेला) राजारामशास्त्री भागवत हिंदुधर्माच्या सद्यस्थितीची, त्यातील दुहींची आणि त्यामुळे राष्ट्रभावनेपर्यंत पोहोचण्यासाठी धर्मभावना हीच कसा अडथळा ठरू शकते याची कठोर चिकित्सा करीत होते. व्यक्तीपेक्षा समाज मोठा व समाजापेक्षा देश मोठा, असे स्पष्टपणे मांडणारे राजारामशास्त्री, त्या काळाच्या व्यक्तींना त्यांच्या धर्माभिमानानेच इतके जखडून ठेवले आहे की त्यांच्यात राष्ट्राभिमान कसा जागृत होणार, याची चिंता करताना दिसतात.
‘‘हिंदु’ व ‘हिंदुधर्म’ हे शब्द वंद्य झालेल्यांपैकी नव्हत. इतकेच नाही, तर वर लिहिलेल्या कारणांनी उघड निंद्य झालेल्यांपैकी आहेत. या दोन्हीही शब्दांत जर बंधुप्रीतीकडे आणि शास्त्राकडे व शास्त्राचे द्वारा परमेश्वराकडे दृष्टी पोचविण्याची ताकद उघड रीतीने राहिलेली नाही, उलट या शब्दांच्या अर्थाचे तमाम तत्त्व जर सर्वथैव अनिष्ट जातिमत्सरांत , पोरकट किंवा खुळचट चालींत व निव्वळ पोटोबांत संपत आहे, तर या दोन्ही बकऱ्यांचा बळी परार्थाच्या पीठापुढे देणे हेच प्रत्येकाचे पहिले मुख्य कर्तव्य नव्हे काय?’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 1:01 am

Web Title: curiosity white and colour paper
टॅग : Curiosity
Next Stories
1 कुतूहल: उच्च प्रतीचा कागद
2 कुतूहल – डिझेल व पेट्रोलमधील फरक
3 कुतूहल – बिनशिशाचे पेट्रोल
Just Now!
X