बेन गुरियन हे स्वतंत्र इस्रायलचे पहिले पंतप्रधान. १८८६ साली जन्मलेले बेन गुरियन यांचे मूळ नाव डेव्हिड ग्रुएन. पुढे त्यांनी बेन गुरियन हे ग्रीक नाव घेतले. इस्तंबूल विद्यापीठातून कायद्याची पदवी घेत असताना तरुण वयातच ते इस्रायलवादी झियानिस्ट या ज्यू संघटनेचं कार्य हिरिरीने करू लागले. युरोपातील छळग्रस्त ज्यू समाजाने मोठय़ा संख्येने आपली पितृभूमी इस्रायल (पॅलेस्टाइन) मध्ये जाऊन तिथे स्थायिक व्हावे आणि आपले स्वतंत्र राष्ट्र उभारावे यासाठी ही झियॉनिस्ट चळवळ प्रयत्न करीत होती. वडील व्यवसायानिमित्त अमेरिकेत स्थायिक झाले असूनही बेन स्वत: १९०६ साली जेरुसलेमजवळच्या किबुत्झ म्हणजे सहकारी कृषी वसाहतीत राहून शेती करू लागले. त्या काळात त्या प्रदेशाला पॅलेस्टाइन असे नाव होते. सर्व प्रदेश तुर्की ओटोमन साम्राज्यात अंतर्भूत होता. पहिल्या महायुद्धानंतर हा प्रदेश ब्रिटिश सत्तेखाली आला. १९०७ साली बेन गुरियन यांनी जेरुसलेममध्ये पहिली जागतिक झियॉनिस्ट काँग्रेस भरवली व पुढे ते या चळवळीचे प्रमुख झाले. जहाल मतवादाकडे झुकणाऱ्या बेन यांनी ‘हशोमर’ हे ज्यूंचे सशस्त्र सुरक्षा पथक स्थापन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली दिला गेलेला स्वातंत्र्य लढा यशस्वी होऊन मे १९४८ मध्ये स्वतंत्र इस्रायल राष्ट्र घोषित झाले. या जाहीरनाम्यावर पहिली स्वाक्षरी बेन गुरियन यांची होती. त्यांनी स्वतंत्र इस्रायलचे पहिले नियुक्त पंतप्रधानपद आणि संरक्षणमंत्रिपद १९४८ ते १९५३ या काळात भूषविले. त्यानंतर ते नेसेट म्हणजे इस्रायली संसदेवर निवडून आले आणि १९५५ ते १९६३ या काळात पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री पदावर होते. या काळात त्यांनी अनेक राष्ट्रीय प्रकल्प सुरू करून अल्पकाळात पूर्ण केले. अरब देशातील ज्यूंना, जेरुसलेमच्या परिसरात गुप्तपणे हवाई मार्गाने स्थलांतर करण्यासाठी त्यांनी ‘ऑपरेशन मॅजिक काप्रेट’ ही धडक योजना वापरली. १९५६ च्या सिनाई मोहिमेतील विजयात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. १९७० साली राजकीय जीवनातून निवृत्त झालेले आधुनिक इस्रायलचे पितामह बेन गुरियन यांचा मृत्यू १९७३ मध्ये जेरुसलेमजवळच्या गावात झाला.

– सुनीत पोतनीस

narendra modi
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा ठसा! पंतप्रधान मोदींचा आरोप; काँग्रसचे प्रत्युत्तर
Congress strongly criticized Prime Minister Narendra Modi for destroying the country reputation and democracy
मोदींकडून लोकशाहीच्या चिंध्या! काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
Narendra Modi sanjay raut
“इस्रायली जनतेच्या उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार”, ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना सूचक इशारा
tejashwi yadav on modi guarantee
“पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी…”, तेजस्वी यादव यांचा भाजपाला टोला

sunitpotnis@rediffmail.com

 

 

कीटकाहारी वनस्पती

झडपपत्रे- दिओनिया मुसिपुला या झाडाची दोन अर्धवर्तुळाकार झाकणे असलेल्या डबीसारख्या दिसणाऱ्या पानांना प्रत्येकी संवेदनशील केस असतात. या फसव्या पानासारख्या दिसणाऱ्या फुलावर प्राणी बसला की डबी कॅमेऱ्याच्या शटरसारखी निमिषार्धात मिटते आणि कीटक आत अडकतो. त्याचे पचन होण्यासाठी ३ ते ५ दिवस लागतात. जर कीटक अडकला नाही तर पान एक तासाभरात हळूहळू परत उघडते. उदा. व्हीनस फ्लाय ट्रेप या वनस्पतीला नाकतोडे आणि कोळी फार आवडतात. गंमत म्हणजे फ्लाय ट्रेपचे प्रत्येक पान त्याच्या जीवनकाळामध्ये फक्त तीन किंवा चार  वेळाच उघडझाप करू शकते. याचे नाव जरी फ्लाय ट्रॅप असले तरी या झाडाला माश्या मुळीच आवडत नाहीत.

पोटली- युट्रिक्युलारिया उदा. कास पठारावर पाणथळ जागी आढळणारी सीतेची आसवे किंवा चिरे पापणीसारख्या वनस्पती या वनस्पतींच्या मुळावर पाण्याने भरलेल्या छोटय़ा पोटल्या असतात. या पोटलीमधले पाणी ऑस्मॉसिसमुळे पंपासारखे बाहेर खेचले जाते. पोटलीच्या प्रवेशद्वारावर सूक्ष्म लव असते. तिला स्पर्श होताच पाण्याच्या प्रवाहातील टॅडपोल, डासांच्या अळ्या पोटलीमध्ये शिरतात अन् पोटली भरल्यावर आपोआप पोटलीचे झाकण बंद होते. पचन होण्यासाठी कित्येक दिवस लागतात. भक्ष्य मिळाले नाही तर ६० मिनिटांमध्ये झडप परत उघडते.

कास पठारावर आढळणाऱ्या कंदीलपुष्प वनस्पतीची सेरोपेजिया फुले कंदिलासारखी असतात. प्रत्येक कंदीलपुष्प व त्याच्या परागीकरणासाठी येणारा विशिष्ट कीटक यांची एकाच वेळी उत्क्रांती होत असते. कीटकाच्या आकारानुसार फुलाला लहान-मोठय़ा खिडक्यांची रचना असते. कीटक आत शिरेपर्यंत फूल दिमाखात उभे असते. कीटक आत शिरला की फुलाच्या बीजांड कोशापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला एका लांब नलिकेतून जावे लागते. तो बाहेर पडू नये म्हणून नलिकेच्या आतल्या बाजूने बारीक लव असते. एकदा का तो आत पोहोचला की सुटण्यासाठी धडपड करू लागतो. आणि मग या झटापटीत बरेचसे परागकण त्याच्या अंगावर चिकटतात. मग फूल खाली झुकते. कीटक धडपडत बाहेर येतो आणि परत दुसऱ्या फुलात शिरतो. फुलाचे काम फत्ते होते.

– सुगंधा शेटय़े (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org