News Flash

धर्मावरम साडी

आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागातील ‘धर्मावरम’ या गावात हातमाग विणकरांचा समूह कार्यरत आहे.

आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागातील ‘धर्मावरम’ या गावात हातमाग विणकरांचा समूह कार्यरत आहे. येथील जनतेचा विणकाम हाच मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळेच अनंतपूर जिल्ह्य़ातील धर्मावरम हे व्यापाराचे मोठे केंद्र झाले आहे. रेशमी साडय़ांमध्ये धर्मावरम साडीला मानाचे स्थान आहे. रुंद भरीव काठ, कॉन्ट्रास्ट रंगाने विणलेला पदर, ज्यामध्ये जरीने नक्षी विणलेली असते, ही धर्मावरम साडीची वैशिष्टय़े सांगता येतील. त्यामुळे समारंभात धर्मावरम साडीला सहजी स्थान मिळते. अगदी साधे आकृतिबंध विणताना मात्र दोन रंगांचा वापर केला जातो. त्याचा चांगला परिणाम साधून फिरत्या रंगाचा भास होतो. यासाठी दोन रंगांची जोडी काळजीपूर्वक निवडावी लागते. इतर बाबतीत कांजीवरम साडीप्रमाणे असलेली ही साडी, रंगाच्या परिणामामुळे आपली वेगळी ओळख निर्माण करू शकली आहे.

धर्मावरम साडय़ांमध्ये भरजरी वजनदार पदर ही आणखी एक विशेष बाब आहे. त्यामधील नक्षीकाम हेही एकमेवाद्वितीय असते. धर्मावरम साडी विणताना रेशमी सूत वापरण्याऐवजी सुती, टसर रेशीम, सूत आणि रेशीम यांचे मिश्रण याचाही वापर केला जातो. साडीबरोबरच येथील हातमागावर उशी अभ्य्रापासून बेडशीटपर्यंत आणि पडद्याच्या कापडापासून गालिचापर्यंत अनेक प्रकारची उत्पादने तयार केली जातात. तरी उत्पादनाचा मुख्य भर साडय़ांवरच आहे, त्यातही रेशमी साडय़ांवर. या साडीची किंमत रु. दोन हजारपासून ते एक लाखापर्यंत असू शकते. पण सरासरी रु. आठ हजारांत बऱ्याच साडय़ा मिळतात.
धर्मावरममध्ये जवळपास एक लाख हातमाग आहेत. हे सर्व हातमाग विणकर घरूनच काम करतात. त्यांना घरातील इतर सभासद काहीना काही मदत करतात. धर्मावरमच्या साडय़ा टिकाऊ रंगासाठी ओळखल्या जातात. या साडीकरिता वापरले जाणारे सूत काळजीपूर्वक रंगवले जाते. गरम पाण्यातली रंगाई आणि रंगवलेले सूत सावलीत वाळवणे या दोन प्रमुख बाबी रंगाच्या टिकाऊपणाला जबाबदार आहेत. हातमागावर विणकाम करताना पडणारे कष्ट, आवश्यक असणारे कौशल्य आणि त्या तुलनेत मिळणारा तुटपुंजा मोबदला यामुळे निष्णात कारगिरांची कमतरता जाणवते आहे. ही कला टिकून राहण्यासाठी सरकारने योग्य मदत केली पाहिजे.

दिलीप हेर्लेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 

संस्थानांची बखर -अलवार राज्यस्थापना

सध्या राजस्थानातील जिल्ह्याचे ठिकाण असलेले अलवार येथे अलवार या संस्थानाचे मुख्यालय होते. अलवार शहर, राजस्थानची राजधानी जयपूर येथून उत्तरेला १५० कि.मी.वर आहे. राजस्थानातील कछवाह राजपूत प्रतापसिंह बहादूर याने १७७१ मध्ये स्थापन केलेले अलवार राज्य विराटनगर, भरतपूर, धौलपूर या मस्य राज्यसंघामध्ये अंतर्भूत होते. प्रतापसिंहाची कारकीर्द इ.स. १७७१ ते १७९१ अशी झाली. त्याचा पुढील वारस भक्तवारसिंह याने कंपनी सरकारला मराठय़ांविरुद्ध मदत करून १८०३ साली लासवारी येथील लढाई जिंकली. त्यानंतर कंपनी सरकारने अलवार राजाबरोबर संरक्षण करार करून आपली तनाती फौज राखली.
१८०३ साली ब्रिटिशांशी संरक्षण करार केलेले अलवार राज्य हे राजपुतान्यातील पहिले राज्य. दोन वर्षांनी राजा भक्तवारसिंहाने शेजारच्या जयपूरवर हल्ला करून स्वत:च पराभूत झाला. तेव्हापासून ब्रिटिशांनी अलवार राजांना दुसऱ्या राजांबरोबर कुठलाही राजकीय व्यवहार परस्पर करण्यास बंदी घातली. त्यापुढे इतर राजांबरोबर झालेल्या संरक्षण करारात तसे कलम नव्याने लागू करण्यात आले. अलवार या राज्याने सर्वप्रथम कंपनीच्या कलकत्ता येथील टांकसाळीतील ब्रिटिश चलन वापरले ते पुढे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत. कछवाह राजपूत वंशाचे अलवारचे राज्यकत्रे स्वत:च्या नावापुढे ‘बहादूर’ हे बिरुद लावून घेत.
अलवार राज्यकत्रे ब्रिटिशांना अखेपर्यंत निष्ठावंत राहिले. अलवार राजांचे ब्रिटिशांशी क्वचित मतभेदही झाले तरी त्यांनी अलवार राजाला १५ तोफांच्या सलामीचा मान दिला. अलवारचे राज्यक्षेत्र ८६०० चौ.कि.मी. होते आणि राज्याची लोकसंख्या १८९५ साली ६,८३,००० होती.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 1:33 am

Web Title: dharmavaram saree
टॅग : Navneet
Next Stories
1 नारायणपेठ साडय़ा
2 वेंकटगिरी साडी
3 कुतूहल – लखनवी चिकन
Just Now!
X