News Flash

कुतूहल – शेळ्यांच्या विविध जाती

जगातील एकूण शेळ्यांपकी भारतात चौदा टक्के शेळ्या आहेत. दरवर्षी ३५-४० टक्के शेळ्या मांसोत्पादनासाठी वापरल्या जात असल्या तरी शेळ्यांची जुळे व तिळे करडे देण्याची क्षमता त्यांची

| September 20, 2013 01:01 am

जगातील एकूण शेळ्यांपकी भारतात चौदा टक्के शेळ्या आहेत. दरवर्षी ३५-४० टक्के शेळ्या मांसोत्पादनासाठी वापरल्या जात असल्या तरी शेळ्यांची जुळे व तिळे करडे देण्याची क्षमता त्यांची संख्या टिकवून ठेवण्यास पुरेशी आहे. भारतात शेळ्यांच्या प्रामुख्याने २३ जाती आढळतात. विशिष्ट प्रदेशात तेथील हवामानाला सुयोग्य अशा शेळ्यांच्या जाती आढळतात.
हिमालयामध्ये (जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड) कश्मिरी, पश्मिना किंवा चांगथांगी आणि चेंगू शेळ्या आढळतात. यांपकी पश्मिना किंवा चांगथांगी शेळी उच्च प्रतीच्या तलम पश्मिना लोकरीसाठी प्रसिद्ध आहे. शुष्क हवामानाच्या उत्तर भारतात (पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश) जमुनापरी, बारबेरी, बीटल शेळ्या आढळतात. बीटल शेळी उंच, कणखर असते. तिचा रंग काळा-पांढरा असून पांढऱ्या रंगावर तपकिरी ठिपके असतात. कान लोंबकळणारे असून बोकडाला जास्त केस असतात. मध्य भारतात (राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश) मारवाडी, सिरोही, मेहसाणा, झालवाडी, बेरारी, काठेवाडी, कच्छी, जाखराणा शेळ्या आढळतात. दक्षिण भारतातील महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक राज्यांत उस्मानाबादी, सुरती, संगमनेरी, मालवारी, कन्नीआडू शेळ्या आढळतात. गंजाम, आसाम हिल, ब्लॅक बेंगॉल या पूर्व भारतातील प्रमुख शेळ्या आहेत. यापकी ब्लॅक बेंगॉल शेळी पश्चिम बंगालमध्ये आढळते. तिची कातडी मऊ असल्याने परदेशात तिला चांगली मागणी आहे.
महाराष्ट्रात प्रामुख्याने उस्मानाबादी, संगमनेरी, बोएर, कोकण कन्याळ शेळ्या आढळतात. उस्मानाबादी, संगमनेरी शेळ्या लातूर, बीड, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर भागात आढळतात. संगमनेरी शेळीचा उगम अहमदनगर जिल्ह्य़ातील संगमनेर येथील आहे. ती दूध व मांसासाठी प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी शेळीचा उगम उस्मानाबाद येथील असून ती मांसासाठी प्रसिद्ध आहे. तिच्यामध्ये जुळी करडे देण्याचे प्रमाण ५० टक्केपर्यंत आहे. कोकणातील उष्ण, दमट हवामान व जास्त पावसाच्या प्रदेशात तग धरण्याची क्षमता असलेली कोकण कन्याळ शेळी विकसित करण्यात आलेली आहे. तिच्या अंगावर काळा रंग व त्यावर पांढरे पट्टे असतात. ही शेळी अतिपावसातही तग धरू शकते. तिच्यामध्ये रोग व अन्य कारणांमुळे मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

जे देखे रवी..  – आत्मा
काही लोक आत्मा हा शब्द जरी उच्चारला तरी चवताळतात. असली गोष्टच नाही, असे म्हणतात. तो आत्मा इकडून तिकडे जातो हे बकवास आहे, असे म्हणतात तेव्हा त्यांचे म्हणणे खरेच असते. उदाहरणार्थ या ओव्या बघा. जेव्हा मडके फुटते, तेव्हा आकाश काय पुन्हा भेटते? मडक्यातल्या पोकळीत आकाशच असते. बाहेरही तेच असते, किंबहुना त्याच्या छिद्रांमध्येही आकाशच असते. ती पोकळी जाणार कुठे? पोकळीचे जाऊ द्या पृथ्वीबद्दलही तशीच ओवी आहे.
भांडय़ा घटांच्या शरीरांनी। असते एकच माती। होऊन सगळ्या गोष्टी। वस्तू असते तीच ती।।  जे सर्व गच्च भरले आहे आणि तरीही अगदी विरळ आहे. इतके विरळ की, अगदी तलम वस्त्रातूनही गळत नाही. कारण गळण्यासाठी ते एका बाजूला असावे लागते, ते जे चैतन्य किंवा ऊर्जा ती मोठी तरल असते आणि सर्वत्र विलसत असते. शरीरातले चैतन्य म्हणजे आत्मा अशी कल्पना आहे. माणसाच्या आयुष्यात कधी कधी असे दिवस येतात की, जेव्हा खूप तरल वाटते.
I feel light and buoyant  असे इंग्रजीत म्हणतात. या संवेदनेचा संबंध केवळ सुखाशी, यशाशी असतोच असे नाही, तर शरीर मनातल्या ऊर्जेच्या समतुल्यतेशीही असू शकतो. काप्रा नावाचा प्रसिद्ध लेखक आहे. त्याने म्हटले आहे, ‘कारण नसताना एकदा समुद्रकिनारी मला खूप हायसं वाटलं आणि मी लाटांसारखा डोलू लागलो.’ या तरलपणाच्या विरुद्ध जडपणा असतो. शरीर जड असते, त्याच्या गरजा असतात. मन स्वार्थी आणि वाभरे दोन्ही असू शकते. उत्क्रांतीत मिळालेली बुद्धी पक्षपात करू शकते याचे कारण आपण स्वार्थी असतो आणि ते असणे भाग असते. तरलतेला, ऊर्जेला, चैतन्याला असल्या अडचणी नसतात. ऊर्जेला कुठे ‘तू मी’ असते. ओवी म्हणते-
गर्वाची निशाणी पुसते। मोहालाच कचाटय़ात धरते। ‘तू मी’ची भाषाच। संपते।।  हे बुद्धीला कळते। पण डोळ्याआड असते। शरीरात उगवले। की दुसऱ्याला कळते।।
हे दुसऱ्याला कळणे तरलतेसारखेच अप्रत्यक्षपणे पाऊल उमटवते. ओव्या म्हणतात- भूमीचे मार्दव। सांगते कोंभाची लवलव।। किंवा वृक्षाच्या मुळातले पाणी। प्रकटते पानोपानी।। किंवा पालवीवरून कळतो। ऋतू वसंत। ज्ञानाच्या लक्षणांनी। कळतो संत।।
स्वार्थाचे आपले मडके जमिनीत आपटून पूर्णपणे नि:स्वार्थी होणे कोणाला शक्य आहे? प्रत्येक माणसाला संतांसारखे सुवर्णपदक कसे मिळणार? पण या सगळ्या गोष्टींची निदान माहिती तरी हवी. म्हणजे मग दुसरा कोणी छान  Buoyant वागतो, असे दिसत असेल तर आपल्यालाही ते जमते का हे बघता येते. त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस- कॅन्सर : कर्करोग- भाग १
माझ्याकडे दर दिवशी दुपारी सर्व कर्मचारी व काही सहकारी मित्र यांच्यासोबत सहभोजनाचा लाभ मी घेत असतो. खूप वर्षांची मैत्री असणारे एक मित्र ‘आज जेवणामध्ये ‘खेकडा भजी’ ठेवा, अशी ऑर्डर देतात.’ खेकडा हे कॅन्सर शब्दाचे मराठीतील मोठे गमतीदार नाव आहे. खेकडा भजी म्हणजे कांदा भजी. लहान-मोठे, गरीब-श्रीमंत सर्वजण अशा भज्यांवर ताव मारतात. पण कर्करोग या शब्दाचा संबंधित डॉक्टरांकडून रुग्णासमोर उच्चार झाल्याबरोबर रुग्ण तर हादरतोच, पण जळपासचे, घरचे नातेवाईकही विलक्षण चिंताग्रस्त होतात. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी माझ्या वैद्यकीय व्यवसायात एक डॉक्टर ‘रक्ताच्या कर्करोगाच्या समस्यांवर आयुर्वेदात काही उपचार आहेत का’ अशी विचारणा करत आले. त्या काळात आजच्यासारखे कॅन्सर विकारावरचे नवीन संशोधन उपलब्ध नव्हते. ब्लड कॅन्सरचा रुग्ण केवळ महाराष्ट्राच्या गावागावातूनच नव्हे; तर देशभरातून मुंबईच्या टाटा कॅन्सर रुग्णालयाकडे शंभर टक्के धाव घ्यायचे.
आता देशभरच्या लहानमोठय़ा शहरात कॅन्सरसंबंधित सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे उदंड पीक शेकडोंना दिलासा देत आहे. वर उल्लेख केलेल्या नगरच्या डॉक्टरांनी मला त्यांच्या उपचार करण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य व जणू काही हक्क दिले. मी या डॉक्टरांकरिता प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथांचे विशेषत: श्रीचरकसंहिता, रसरत्नसमुच्चय यांचा विशेष अभ्यास केला. च.सं.सू.अ/४ मध्ये लाक्षा या प्राणिज द्रव्याबद्दल एकाच वेळी अस्थी व रक्त या दोन धातूंवर कसे उपयुक्त पडते याचे मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
रसरत्नसमुच्चय ग्रंथात मोती, प्रवाळ यांच्या वापराबद्दल अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन आहे. उपळसरी ही वनस्पती समस्त रक्तविकारांवरील हुकमी औषधी आहे. अशा चारांच्या मिश्रणातून लाक्षा मिश्रण हे रक्तरोगावरील शंभर टक्के खात्रीचे औषध जन्माला आले. त्या डॉक्टरांनी श्रद्धेने घेतले. दीर्घकाळ कर्करोग न वाढता समृद्ध जीवन जगले. अनामिक डॉक्टरांना धन्यवाद!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  –  २० सप्टेंबर
१९१५> संतकवी, ग्रंथकार गुलाबराव महाराज यांचे वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी निधन. अंध आणि अल्पायुषी असणाऱ्या गुलाबरावांनी अभंग, ओव्या, योग, वेदांत, वैद्यक, व्याकरण, आयुर्वेद, संगीत अशा विविध विषयांवर प्रचंड लेखन केले.
१९९२ > शिक्षणतज्ज्ञ, चरित्रकार दत्तात्रय नरसिंह गोखले यांचा जन्म. त्यांनी लिहिलेल्या ज्ञानकोशकार केतकरांच्या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. याशिवाय डॉ. पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन यांचे चरित्र तसेच ‘हिंदुत्वदर्शन’ हा ग्रंथ आणि ‘क्रांतिवीर बाबाराव सावरकर, स्वा. सावरकर : एक रहस्य, गांधीजी, मानव नि महामानव’  अशी त्यांची साहित्य संपदा.
१९९६ > ख्यातनाम साहित्यिक  दया पवार यांचे निधन. ‘कोंडवाडा’ या काव्यसंग्रहातून रूढीप्रिय समाजाकडून दलितांची होणारी अवहेलना त्यांनी मांडली. ‘विटाळ’मधून वास्तवतेचा वेध घेणारे कथानक आणि ‘बलुतं’मधून दगडू मारुती पवार नावाच्या आत्मकथनातून पूर्वायुष्याचे भीषण अनुभव, जातिबंधने, दलितांमधले हेवेदावे यांचे परिणामकारक चित्रण केले आहे. हे आत्मचरित्र त्यातील नैतिक भूमिकेमुळे वादग्रस्त ठरले. तथापि दलित साहित्यात नव्या परंपरेला त्याने प्रेरणा दिली.
– संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 1:01 am

Web Title: different breeds of goats
टॅग : Navneet,Navnit
Next Stories
1 कुतूहल -मासेमारीसाठी जाळे
2 कुतूहल -गोडय़ा पाण्यातील मत्स्यसंवर्धन २
3 कुतूहल: गोडय़ा पाण्यातील मत्स्यसंवर्धन १
Just Now!
X