News Flash

कुतूहल – मेंढय़ांच्या विविध जाती

भारतात मेंढय़ांच्या विविध ३९ जाती आढळतात. भारतीय मेंढय़ांचे भौगोलिक प्रदेशानुसार चार विभाग केले आहेत.

| September 28, 2013 12:29 pm

भारतात मेंढय़ांच्या विविध ३९ जाती आढळतात. भारतीय मेंढय़ांचे भौगोलिक प्रदेशानुसार चार विभाग केले आहेत. हिमालयीन पर्वतरांगांत (जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड) काश्मिरी, गद्दी, भाकरवाल, रामपूर-भुशियार, गुरेझ, कर्नाह या प्रमुख जाती आढळतात. काश्मिरी व कर्नाह या जाती उच्च प्रतीच्या लोकर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. भारताच्या उत्तर-पश्चिम भागात (हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश) हिस्सार डेल, मारवाडी, मागरा, लोही, नाली, काठेवाडी, सोनाडी, पाटणवाडी, कच्छी, चौकला या मेंढय़ांच्या जाती आढळतात. दक्षिण विभागात (महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू) दख्खनी, नेल्लोर, माडग्याळ, बेल्लारी, मद्रासरेड, मेंचेरी या प्रमुख जाती आढळतात. यांपकी माडग्याळ, नेल्लोर, मेंचेरी व मद्रासरेड या मेंढय़ांच्या जाती मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. भारताच्या पूर्व विभागात (बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा आणि उत्तर पूर्व भारत) छोटा नागपुरी, शहाबादी, गरोल, गंजाम, तिबेटल या जाती आढळतात. दख्खनी, बेल्लारी, मारवाडी, सोनाडी, शहाबादी, छोटा नागपुरी, गंजाम या मेंढय़ांच्या जाती लोकर व मांस या दुहेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
मेंढय़ांच्या विदेशी जातींमध्ये मेरिनो, रॅमब्युलेट, चेव्हिओट, कॉरिडेल, डॉरसेट, साऊथ-डाऊन, पोलवर्थ, सफॉल्क विशेष प्रसिद्ध आहेत. मेरिनो मेंढीचे उगमस्थान स्पेन असून उच्च प्रतीच्या लोकर उत्पादनासाठी ती जगप्रसिद्ध आहे. संकरीकरणाद्वारे स्थानिक मेंढय़ांचे लोकर उत्पादन व प्रत सुधारण्यासाठी मेरिनो नरांचा विविध देशांत वापर केला जातो. सफॉल्क, डॉरसेट, साऊथ-डाऊन मेंढय़ांचे उगमस्थान इंग्लंड असून त्या मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्रात मेंढय़ांच्या दख्खनी व माडग्याळ या दोन प्रमुख जाती आढळतात. दख्खनच्या पठारावर आढळत असल्याने दख्खनी मेंढी हे नाव पडले. संगमनेरी, लोणंद, सोलापुरी, कोल्हापुरी या दख्खनी मेंढींच्या चार उपजाती आहेत. दख्खनी मेंढी उष्ण हवामानात, कमी चारा असलेल्या दुष्काळी प्रदेशात पाळण्यास उपयुक्त असून मांस व लोकर उत्पादनासाठी पाळतात. माडग्याळ मेंढय़ा सांगली जिल्ह्य़ातील जत तालुक्यातील कवठेमहांकाळ, रांजणी, माडग्याळ व सिद्धनाथ या भागात जास्त आढळतात. माडग्याळ गावाच्या नावावरूनच या मेंढय़ांना हे नाव पडले.
-डॉ. शरद आव्हाड, नगर , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – थोतांड
सगळे धर्म शेवटी एकच गोष्ट सांगतात. धर्माकडे नव्या दृष्टीने पाहा आणि म्हणून धर्मामध्ये काहीही फरक नाही, असे सांगण्याची हल्ली फॅशन आहे. लोकप्रतिनिधींनी जमाव बघून अशी विधाने करणे योग्यच, पण धर्मगुरूंना असे म्हणताना आवंढा गिळताना अडकावा त्याप्रमाणे होत असणार. एक मला म्हणाला, ‘वाघ कितीही भुकेला असला तरी तो शक्य तोवर वाघाला खात नाही.’ मग धर्म एकमेकांच्या नरडय़ाला का लागतात. मुसलमानांचे हल्ली काही खरे नाही. सगळे जग त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहे. पोर्तुगाल ते फिलिपाइन्स आणि नॉर्वे ते ऑस्ट्रेलिया. सर्वत्र त्यांचा संशय घेतला जातो. ब्रह्मदेशाची बुद्धधर्मीय मानवतावादी आँग सू की- जिला ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने गेली १५ वर्षे उचलून धरले- तीसुद्धा ब्रह्मदेशातल्या मुसलमानांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल ब्र काढत नाही आणि परवा तर तिथल्या लष्कराच्या कवायतीत मिरवीत होती. अहो, शेवटी इंदिराबाईंनी पहिला अणुस्फोट केला तेव्हा परवलीचा शब्द ‘बुद्ध हसला’ असाच होता. हल्लीचे पोप परवा म्हणाले, ‘मुसलमानांशी संवाद साधण्याची गरज आहे.’ त्या गादीवर जे पोप आधी विराजमान होते त्यांनी इतर धर्माचे पृथक्करण करताना हिंदू धर्मातल्या भक्तिमार्गाचे मोठे गोडवे गायले होते; परंतु बौद्ध धर्माबद्दल ‘जो धर्म देवच मानत नाही त्यांच्याशी आमचे कसे जमणार?’ असे लिहिले. इस्लामबद्दल बोलताना ‘आमच्या धर्मातला गॅब्रिअल नावाचा देवदूत मोहम्मदच्या कानात काहीतरी निराळेच कसे सांगेल,’ असा प्रश्न विचारते झाले. एकच देव आहे, दुसरा नाही, असा कंठशोष करणाऱ्या इस्लाम धर्माच्या अनुयायांनी आपल्याच धर्मातल्या लोकांना कंठस्नान घालण्याची मोहीम सुरू केली आहे. शिया आणि सुन्नी यांच्यात बॉम्बस्फोटाशिवाय हल्ली दिवस जात नाही. अहिंसा म्हणणाऱ्या जैन लोकांनी केलेल्या आर्थिक शोषणाबद्दल लिहावे तेवढे थोडे आहे. मध्ये परदेशात गेलो तेव्हा एक हवाई सुंदरी म्हणाली, ‘जैन अन्न हवे आहे का?’ विमान होते अमेरिकन. मुख्यत: जनावरे खाणारे हे लोक; परंतु भारतातले जैन लोक पैसे मिळवितात आणि तिकिटे काढतात. तेव्हा त्यांचे अन्नही हजर. शेवटी ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये’ हेच खरे आणि तीही धर्माची एक व्याख्या होऊ शकेल. आणि म्हणे सगळे धर्म सारखे! मी हिंदूंबद्दल लिहिण्याचे टाळतो, असे समजू नका. आमच्यातल्या एकाने एक शस्त्रक्रिया केली आणि एकाचे प्राण वाचविले, अशी त्याची समजूत झाली. म्हणून त्या रुग्णाला तो ‘जीभ दाखव’ असे म्हणत चिमटे काढू लागला. शेवटी तो मेलेला कंटाळला आणि म्हणाला, ‘मी खरेतर मेलो आहे. मी जीभ दाखवतो, पण तुमचे चिमटे बंद करा.’ माझ्यासारख्या उदारमतवाद्यांनी हिंदूंना इतके चिमटे काढले आहेत की, आता त्यांना जीभ उचलण्याचीही सोय उरलेली नाही.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – स्तनाचा कर्करोग :  भाग –  ८
रोहिणी वहिनी एक दिवस माझ्या मित्राबरोबर आल्या. स्तनाची गाठ तुम्ही बरी कराल का, म्हणून विचारणा झाली. दवाखान्यातील स्त्री वैद्यांकडून गाठ तपासली. गाठ हालत होती, घट्ट नव्हती. वहिनींना मधुमेह होता. मधुमेह व ग्रंथी लक्षात घेऊन आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादी, लाक्षादि, त्रिफळागुग्गुळ, मधुमेहवटी, रसायनचूर्ण, कांचनार अशी औषधी योजना केली.
महिनाभराच्या तपासणीत गाठ, मधुमेह कमी झाला. वहिनींनी आपण बरे झालो असे समजून औषधे बंद केली. खाण्या-पिण्याचे पथ्यपाणी सोडले. तीन महिन्यात गाठ पुन्हा वाढली, घट्ट झाली. घराजवळच्या फॅमिली सर्जननी स्तनाचा तो भाग काढावयास लावला.
काही काळाने मुंबईच्या रोहिणीताईंनी पुण्यात येऊन त्यांच्या दुसऱ्या स्तनग्रंथीचे परीक्षण स्त्री वैद्यांकडून करून घेतले. पूर्वीचीच औषधे व कडक पथ्यपाणी सुरू केले. काही दिवस सर्व व्यवस्थित होते. दुसऱ्या स्तनाच्या गाठीत खूप सुधारणा झाली. मधुमेह नियंत्रणात आला. काही काळाने बाईंची मती फिरली. आपण पूर्ण बरे झालो आहोत असे समजून त्यांनी औषधे थांबविली. सहा महिन्यांनी पूर्वीप्रमाणेच दुसऱ्या स्तनातील गाठ वाढली, घट्ट, हलेनाशी झाली. सर्जनने स्तनच काढून टाकला. दुर्दैवी रोहिणी वहिनी रोगचिंतेत मग्न. खाणेपिणे तुटले. खूप पांडुता आली. एक दिवस वहिनींनी देवाघरी जाणे पसंत केले.
या दुर्दैवी रुग्ण इतिहासाने मी खूप काही शिकलो. असे स्त्री रुग्ण महिन्यातून एखाददुसरा या हिशोबाने येतच असता. त्यांना सगळी स्टोरी थोडक्यात सांगून कडक पथ्यपाणी, वारंवार स्तनतपासणी लेडी डॉक्टरकडून करून घेण्याचा आग्रह धरतो. मधुमेह असला तर कडक शब्दात सुनावतो.
रक्तशर्करा दोनशेचे वर असल्यास मधुमेहकाढा देतो. स्थौल्य खूप असल्यास गोक्षुरादि, त्रिफळागुग्गुळ गोळ्या डबल डोस देतो. अमरकंद वनस्पतीचे पाच ग्रॅम तुकडय़ांचा नित्य काढा व सुधाजल-चुन्याची निवळी-लाईम वॉटर आठवडय़ाला २०० मि.ली. घ्यावयास सांगतो. निश्चयाने या स्त्री रुग्णांना रोगमुक्ती मिळते. महिलांनो पथ्य सांभाळा.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – २८ सप्टेंबर
१८९८> लेखक, पत्रकार, स्वातंत्र्यसेनानी मामाराव दाते यांचा जन्म. भाभानगर सत्याग्रह, हिंदुस्थान इतिहास, हिंदुधर्म स्वरूप, भारतीय समाजकार, मुद्रण स्वरूप ही पुस्तके प्रकाशित.
१९६८> चरित्रकार, वाङ्मयविवेचक बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचे निधन. ‘उदय’ या साप्ताहिकाचे संस्थापक. आपल्या वडिलांचे म्हणजे दादासाहेब खापर्डे यांचे चरित्र तसेच साहित्यातील प्रेरणा, पद्धती आणि ध्येय व ध्यानयोग इ. पुस्तके त्यांनी लिहिली.
१९७६ > रंगभूमीविषयक ग्रंथाचे लेखक पुरुषोत्तम श्रीपाद काळे यांचे निधन. ललितकलेच्या सहवासात आणि रंगभूमीवरील नेपथ्य ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध.
२००३> वैद्यक पत्रकार, आरोग्यशिक्षण व आरोग्यविषयक स्तंभलेखक डॉ. सुरेश दत्ताराम नाडकर्णी यांचे निधन. मराठीत वैद्यकशास्त्रावरील ग्रंथांची सूची तयार करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान.
– संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 12:29 pm

Web Title: different breeds of sheeps
टॅग : Navneet,Navnit
Next Stories
1 कुतूहल: शेळ्यांमधील आजार
2 कुतूहल – शेळ्यांच्या चाऱ्याचे नियोजन
3 कुतूहल- शेळ्यांच्या गोठय़ांची संरचना
Just Now!
X