वनस्पतिशास्त्र संशोधनातील उत्कृष्ट कार्यास प्रोत्साहन मिळावे आणि तरुण विद्यार्थ्यांना या क्षेत्रात कार्य करण्याची ऊर्जा मिळावी, या उद्देशाने भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालयाने ‘ई. के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार’ १९९९ पासून सुरू केला. प्रा. ई. के. जानकी अम्मल यांनी ‘सायटोटॅक्सोनॉमी’ (जीवांच्या वर्गीकरणाचे पद्धतिशास्त्र) या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार सुरू करण्यात आला.

वनस्पतिशास्त्र क्षेत्रात पीएच.डी. करणाऱ्या प्रा. अम्मल या पहिल्या भारतीय महिला होत. त्यांनी अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातून १९३१ साली पीएच.डी. केली. मुलींच्या उच्च शिक्षणाबद्दल उदासीनता असणाऱ्या त्या काळात प्रा. अम्मल यांनी जगभर फिरून वनस्पतिशास्त्रात संशोधन केले. कोइम्बतूरच्या ऊस संशोधन केंद्रात कार्यरत असताना त्यांनी भारतातील उसाच्या जातींचा सखोल अभ्यास केला. अधिक गोड आणि भारतातील सर्व प्रकारच्या वातावरणात पिकवता येईल अशी उसाची सुधारित जात त्यांनी तयार केली. ऊस संकरांचा शोध हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे संशोधन मानले जाते. त्यामुळेच ‘उसाला गोडवा देणारी शास्त्रज्ञ’ अशी त्यांची ख्याती आहे.

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Listed on Roots 2 Roots Social Stock Exchange in Arts Sector
कला क्षेत्रातील ‘रूट्स २ रूट्स’ सोशल स्टॉक एक्सचेंजवर सूचिबद्ध
sangli, sitar, tanpura musical instruments
सांगली: मिरजेच्या सतार, तानपुऱ्याला भौगोलिक मानांकन
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

केरळातील सदाहरित वनांमधून औषधी गुणधर्म असलेल्या आणि आर्थिकदृष्टय़ा मौल्यवान समजल्या जाणाऱ्या झाडाझुडपांच्या नमुन्यांचाही प्रा. अम्मल यांनी संग्रह केला होता. त्यांनी अनेक फुलांच्या गुणसूत्रांचाही अभ्यास केला. ऊस आणि फुलांबरोबरच वांग्याच्या ‘क्रॉस ब्रीडिंग’वर संशोधन करून त्यांनी वांग्याचे वाणही शोधले. १९७७ साली त्यांना पद्मश्रीने गौरविण्यात आले.

दर वर्षी ‘ई. के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार’ जागतिक पर्यावरणदिनी दिला जातो. देशपातळीवर दिला जाणारा हा पुरस्कार मागील वर्षी कोल्हापूर विद्यापाठातील डॉ. श्रीरंग यादव यांना मिळाला. हा पुरस्कार मिळवणारे डॉ. यादव हे एकमेव महाराष्ट्रीय आहेत!

वनस्पती प्रजाती वर्गीकरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या, नवीन प्रजाती शोधून त्यांची अचूक वर्गवारी करणाऱ्या, तसेच आण्विक टॅक्सोनॉमी, केमोटॅक्सोनॉमी इत्यादी क्षेत्रांतील उत्कृष्ट प्रयोगात्मक कार्यासाठी, तसेच वनस्पतिशास्त्र संशोधनात पीएच.डी. प्रबंध, त्या विषयात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.

–  मनीष चंद्रशेखर वाघ

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org