पारंपरिक सूक्ष्मदर्शक हा छोटी वस्तू फार तर दोन हजारपट मोठय़ा करून स्पष्टपणे दाखवू शकतो. निरीक्षणासाठी वापरलेल्या प्रकाशाच्या लहरलांबीहून लहान आकाराच्या वस्तूंचे स्पष्टपणे निरीक्षण करणे शक्य होत नाही. त्यामुळे विषाणूसारखे अगदी लहान आकाराचे सजीव पारंपरिक सूक्ष्मदर्शकातून दिसत नाहीत. सन १९२३-२४च्या सुमारास दी ब्रॉयने गतीतील इलेक्ट्रॉनसारख्या कणांना लहरींचे गुणधर्म असल्याचे दाखवून दिले. ही गती जितकी जास्त, तितकी या इलेक्ट्रॉनची लहरलांबी कमी. दी ब्रॉयच्या या संशोधनामुळे अत्यंत गतिमान इलेक्ट्रॉनचा वापर करून अणूंचाही वेध घेणे शक्य झाले आहे. अर्न्‍स्ट रस्का याने बर्लिनच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीत शिकताना १९२९ साली, मॅक्स नॉल याच्या मार्गदर्शनाखाली एक प्रकल्प सादर केला. या प्रकल्पात त्याने ताऱ्यांच्या वेटोळ्याद्वारे निर्माण केलेल्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करून इलेक्ट्रॉनचा झोत अगदी छोटय़ा जागेत केंद्रित करून दाखवला. इलेक्ट्रॉनच्या झोताला छोटय़ाशा क्षेत्रफळात केंद्रित करणारे हे एक प्रकारचे भिंगच होते. केंद्रित केलेला इलेक्ट्रॉनचा झोत दिसण्यासाठी पडदा म्हणून त्याने युरेनियमयुक्त स्फुरदीप्त (फ्लूओरेसंट) काचेचा वापर केला. या संशोधनामुळे भिंग जसे प्रकाशकिरण केंद्रित करू शकते, तसेच चुंबकाचा वापर करून इलेक्ट्रॉनचा झोत केंद्रित करणे शक्य झाले.

पारंपरिक सूक्ष्मदर्शकात दोन भिंगे वापरून प्रकाशकिरणांच्या मदतीने एखादी वस्तू मोठी करून पाहता येते. गतीतील इलेक्ट्रॉनना लहरींचे गुणधर्म असल्याने, दोन चुंबकीय भिंगाचा वापर करून इलेक्ट्रॉनच्या झोताच्या मदतीने वस्तू मोठी दिसणे अपेक्षित होते. वस्तूवर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या झोतातील इलेक्ट्रॉनना योग्य ती प्रचंड गती दिली, तर अगदी लहान वस्तूंचे निरीक्षण करणेही शक्य व्हावे. रस्का आणि नॉल यांनी १९३१ साली असा पहिलावहिला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक तयार केला. या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकात वस्तूची मोठी झालेली प्रतिमा स्फूरदीप्त पडद्यावर दिसत होती. या सूक्ष्मदर्शकात वस्तूची प्रतिमा जरी फक्त चौदापट मोठी दिसत असली, तरी त्यात सुधारणा करत दोन वर्षांतच नॉल आणि रस्का यांनी वस्तू बारा हजारपट मोठी करून स्पष्टपणे दाखवणारा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक तयार केला. या अत्यंत उपयुक्त साधनाच्या निर्मितीसाठी अर्न्‍स्ट रस्का याला १९८६ साली नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. आजचे अत्याधुनिक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक हे वस्तू कोटय़वधीपट मोठी करून स्पष्टपणे दाखवू शकतात.

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

– डॉ. राजीव चिटणीस मराठी विज्ञान परिषद,  वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२   office@mavipamumbai.org