कोणत्याही द्रव पदार्थाला सजातीय (त्याच पदार्थातील) अणूंच्या आकर्षण-बलामुळे पृष्ठीय ताण प्राप्त होतो. सजातीय अणूंमध्ये असणारे हे आकर्षण-बल पाऱ्यामध्ये अतिशय उच्च आहे. त्या तुलनेत इतर कोणत्याही पदार्थाच्या अणूंना आकर्षित करण्याचे (विजातीय) बल पाऱ्यामध्ये खूप कमी आहे. त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवांसारखा पारा कोणत्याही पृष्ठभागावर वाहात नाही. पारा सांडल्यास तो पाणी किंवा इतर द्रवासारखा न पसरता थेंबाच्या स्वरूपात दिसतो.

तापमापी, दाबमापक, टय़ूबलाइट, सी.एफ.एल. दिवे यांत पाऱ्याचा उपयोग केला जातो. म्हणूनच दैनंदिन जीवनाचा पारा हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत सर्वाना पाऱ्याची ओळख, तापमापीत याचा वापर होत असल्याने होते. येथे पाऱ्याची द्रवस्थिती, चकाकणे, काचेला न चिकटणे, जलद प्रसरण पावणे या गुणधर्मामुळे तापमापीत इतर मूलद्रव्यांपेक्षा पारा उपयुक्त ठरतो.

दाबमापक (Barometer) यंत्रामध्येही  पाऱ्याचा वापर केला जातो. इथे त्याची अतिशय उच्च असलेली घनता उपयोगी पडते. वातावरणीय दाब मोजण्याकरिता या यंत्राचा वापर केला जातो. रासायनिक उद्योगधंद्यात पारा वापरून क्लोरीन, कॉस्टिक सोडा, संश्लेषित अ‍ॅसेटिक आम्ल यांचे उत्पादन केले जाते. विद्युत स्विच, रेक्टिफायर यांसारख्या विद्युत उपकरणांत तसेच दंतवैद्यकीय क्षेत्रात पाऱ्याचा वापर केला जातो. पाऱ्याच्या वाफेत अरगॉन मिसळून ती ‘मक्र्युरी व्हेपर’ लॅम्पमध्ये (दीप्तीमान होणाऱ्या दिव्यात) भरली जाते. यात विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास हा दिवा प्रकाशमान होतो.

पारा असलेली उपकरणे काचेची असल्यामुळे नाजूक असतात. जर कोणत्याही उपकरणाची नळी फुटली तर सांडणारा पारा किंवा त्याची वाफ घातक असते.  पाऱ्याचे शरीरावर अनेक घातक परिणाम होतात. १९५६ मध्ये जपानी शहर मिनामाटा येथे पाऱ्याने विषबाधा झालेला एक रुग्ण आढळला होता; अशा रुग्णांची मज्जासंस्था आणि स्नायूंवर परिणाम झालेला दिसून येतो. थोडय़ाच कालावधीत मिनामाटा शहरात याच लक्षणाचे २६६८ रुग्ण आढळले. हे सर्व एका रासायनिक कारखान्यातून येणाऱ्या सांडपाण्यात पाऱ्याचा अंश (मिथाइल मक्र्युरी) असल्याने घडले होते. या रोगाला ‘मिनामाटा रोग’ असे नाव देण्यात आले होते. तेव्हापासून अनेक देशांमध्ये पाऱ्याच्या वापरावर निर्बंध आहेत. आजकाल हळूहळू डिजिटल तापमापी लोकप्रिय होत चालली आहे, यात पारा नसतो. पण टय़ूबलाइट किंवा ‘सीएफएल’ दिव्यांतील पाऱ्याच्या वापराला सध्या तरी अन्य विकल्प नाही.

सुधा सोमणी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ , office@mavipamumbai.org