प्रजासत्ताक मालदीवज् हे दक्षिण आशियात, विषुववृत्ताजवळ असलेले एक छोटे द्वीपराष्ट्र आहे. भारताच्या नैऋत्येला सातशे कि.मी. अंतरावर हिंद महासागरात असलेले मालदीवज तीनशे चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेले असून ‘क्षेत्रफळाच्या बाबतीत आशियातील सर्वात लहान सार्वभौम देश’ आहे, प्रवाळाच्या २६ कंकणाकृती खडकांच्या दोन रांगा या द्वीपसमूहात समाविष्ट आहेत. माले हे मालद्वीवच्या राजधानीचे शहर. १९६५ साली ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळविल्यानंतर मालदीव एक स्वायत्त, स्वतंत्र देश म्हणून जगापुढे आला. मालदीवच्या भूप्रदेशाची समुद्रसपाटी पासून सरासरी पातळी केवळ दीड मीटर इतकी कमी आहे.

मालदीवजच्या संस्कृतीला २५०० वर्षांचा इतिहास आहे. येथे प्रथम वस्ती करणाऱ्या लोकांना धेवीस म्हणत. धिवा मारी हे येथील लोकांचे प्रथम राज्य. सम्राट अशोकाने त्याचे दूत या भागात पाठविले तेव्हा मालदीवजला धिवा महाल असे नाव होते. मालदीवमध्ये प्रथम येऊन स्थायिक होणाऱ्यांमध्ये बहुसंख्य लोक हे शेजारच्या दक्षिण हिंदुस्थानातले असावेत. सध्यासुद्धा मालदीवच्या लोकांच्या भाषा, चालीरीती यावर तामीळ आणि मल्याळी संस्कृतीची मोठी छाप पडलेली जाणवते. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात या बेटांवर बौद्ध धर्म रुजला आणि पुढची एक हजार वर्षे तो मालदीवजचा प्रमुख धर्म बनला, ते बाराव्या शतकापर्यंत. बाराव्या शतकात येते अरब मुस्लीम व्यापाऱ्यांचा संपर्क वाढला आणि त्यांच्यामार्फत या बेटावर इस्लाम धर्माचा प्रवेश झाला.

अरब व्यापाऱ्यांच्या प्रभावामुळे मालदीवचा प्रमुख बौद्ध धर्मीय राजा धोवेमी याने तर ११९३ मध्ये स्वत: इस्लाम धर्म स्विकारला. त्याने सुलतान मुहम्मद इब्ज अब्दुल्ला असे नाव धारण करून राज्यकारभार केला. तसेच इस्लामचा पुरस्कारही केला. या मुहम्मद अब्दुल्ला नंतर त्याच्या घराण्यातल्या सहा पिढय़ांनी मालदीवज्वर त्यांच्या सल्तनती राखल्या, त्या इ.स. १९३२ पर्यंत. या काळात अठराव्या शतकापर्यंत अरबी व्यापारी येथे व्यापार करीत तो प्रामुख्याने येथे मिळणाऱ्या कवडय़ांचा! त्या काळात भारतातील काही राज्ये, आफ्रिकेतील काही भागांत कवडीचा उपयोग कायदेशीर चलन म्हणून करीत. त्याचप्रमाणे नारळाच्या सालापासून मालदीवजमध्ये बनलेल्या काथ्याला सिंध, चीन आणि येमेनमध्ये मोठी मागणी होती.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com