News Flash

कुतूहल : फळे पिकवणारा वायू

काही दिवसांतच त्याला कोल गॅस पुरवलेल्या रोपांची विचित्र वाढ झालेली दिसून आली.

झाडावरचे अंजीर काढून त्याच्या देठाला ऑलिव्ह तेलाचा थेंब लावला की अंजीर लवकर पिकते, हे तिसऱ्या शतकामध्ये मध्यपूर्वेतील अंजीर उत्पादकांना माहीत होते. मात्र देठाला लावलेल्या ऑलिव्ह तेलाच्या थेंबाचे विघटन होऊन त्यातून बाहेर पडणारा इथिलीन वायू त्यास जबाबदार आहे, हे मात्र तेव्हा कुणालाही ठाऊक नव्हते. आपल्याकडे आंब्याची फळे पिकविण्यासाठी वाळलेले गवत घालून आढी तयार करण्याची पारंपरिक पद्धत शेकडो वर्षे वापरली जाते. या प्रक्रियेमध्येही आंब्यामधून इथिलिन वायू बाहेर पडतो, आढी बंद असल्यामुळे तो तेथेच अडकतो आणि आंबा पिकतो, हेसुद्धा कुणासही ठाऊक नव्हते. लिंबासारख्या फळांची हिरवी कांती धुराचा वापर करून, त्यातील इथिलिनद्वारे पिवळी करण्याचे तंत्रज्ञान अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकन शेतकऱ्यांच्या पूर्ण अंगवळणी पडले होते. परंतु त्यामागचे कारण त्यांनाही माहीत नव्हते.

पूर्वीच्या काळी दिवे हे कोल गॅसवर चालवले जात. हा कोल गॅस वाहून नेणाऱ्या नलिकांतून अनेक वेळा गळती होत असे. गळती होणाऱ्या जागेजवळच्या वनस्पतींचे आकार विचित्र झालेले आणि त्यांची खोडेही जाडजूड झालेली, दिसून येत. हे पाहिल्यावर रशियन संशोधक दिमित्री नेलजुबॉवने एक प्रयोग केला. त्याने वाटाण्याची रोपे मुद्दाम बंदिस्त पेटीत लावली. एका पेटीला त्याने नैसर्गिक हवेचा पुरवठा केला, तर दुसऱ्या पेटीत त्याने कोल गॅस आणि हवा यांचे मिश्रण सोडले. काही दिवसांतच त्याला कोल गॅस पुरवलेल्या रोपांची विचित्र वाढ झालेली दिसून आली. यानंतर त्याने अधिक संशोधन करून कोल गॅसमधील इथिलिन हा घटक वनस्पतींवर परिणाम करीत असल्याचे दाखवून दिले.

यानंतर काही काळात हर्बट कुसिन्स या इंग्लिश संशोधकाने संत्र्यांबरोबर साठवलेली केळी लवकर पिकत असल्याचे लक्षात आणून दिले. १९३०च्या दशकात इंग्लंडच्याच रिचर्ड गेन याने मोठय़ा प्रमाणावर सफरचंदे पिकवली व ती पिकताना या सफरचंदांतून इथिलिन निर्माण होत असल्याचे रासायनिक विश्लेषणाद्वारे दाखवून दिले. कालांतराने सफरचंदेच नव्हे तर पिकणाऱ्या इतर फळांतूनही इथिलिनची निर्मिती होत असल्याचे त्याला दिसून आले. फळे पिकण्यात सहभागी होणाऱ्या या वायूची निर्मिती फळे स्वतच करतात, हे या संशोधनातून स्पष्ट झाले. आणि इथिलिन हे पहिले ज्ञात वायुरूपी संप्रेरक (हार्मोन) ठरले!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 3:55 am

Web Title: fruit ripening gas artificially ripened fruits
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : नैसर्गिक बुद्धिमत्तेला न्याय
2 कुतूहल : वेदनाशामक सॅलिक्स
3 मेंदूशी मैत्री : बुद्धिमत्तांचा सेट
Just Now!
X