05 March 2021

News Flash

हिमोग्लोबिनचे मोजमाप 

गरोदर मातांनी हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची विशेष काळजी घेतली पाहिजे.

हिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण कमी झाल्यावर पंडुरोगाचे निदान केले जाते. अशा व्यक्तीच्या तांबडय़ा रक्तपेशीदेखील कमी असतात. अतिरक्तस्राव, शस्त्रक्रिया, अपघात, जठर-व्रण (अल्सर) किंवा मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग या कारणानेदेखील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते. आहारात पुरेसे लोह, फॉलिक आम्ल आणि जीवनसत्त्व इ१२ नसेल तर अभावजन्य पंडुरोग होऊ शकतो. सिकल सेल पंडुरोग, थॅलासेमिया, हाडांचा कर्करोग, वृक्काचे काम बंद पडणे (‘्रल्लिी८ ऋं्र’४१ी) अशा कारणांनीदेखील हिमोग्लोबिनचे प्रमाण उतरते.

गरोदर मातांनी हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर हे प्रमाण कमी असेल तर भावी अर्भकाचे वजन कमी भरते. जर हे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल तर मृत अर्भक निपजायची शक्यता असते.

हिमोग्लोबिन मापनासाठी हिमोग्लोबिनोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. आधुनिक प्रकारची उपकरणे डिजिटल स्वरूपातील असतात. सहज कोठेही घेऊन जाण्यासारखी असल्याने ती सोयीस्कर ठरतात. पूर्वी ‘साहिली’ उपकरण वापरले जात असे. यात हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर तपासणीचा रक्त नमुना मिसळला जाई. रक्तातील हिमोग्लोबिन आम्लाच्या सान्निध्यात आम्लधर्मीय हिमॅटीन या संयुगात परावर्तित होते. या मिश्रणात पाणी घालून त्याच्या किरमिजी रंगाची तुलना हिमॅमीटरच्या रंगीत काचांबरोबर जुळवली जाई. या रंगीत काचांच्या बाजूलाच हिमोग्लोबिनचे प्रमाण दर्शवणारी पट्टिका असे. त्यातून हिमोग्लोबिनचे नेमके प्रमाण समजले जात असे.

हर्मन साहिली हा चतुरस्र स्विस शास्त्रज्ञ १८५६ ते १९३३ या काळात होऊन गेला. १९३० च्या सुमारास त्यांनी हे उपकरण तयार केले. शरीरांतर्गत औषधोपचार या विषयावर त्यांचा विशेष व्यासंग होता. चेताशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र आणि रुधिरशास्त्र या विषयांतील त्यांचे कार्य खूप महत्त्वाचे ठरते. रक्तदाब मोजमाप करण्याच्या यंत्रातील बदल आणि त्याचसोबत हिमोग्लोबिन तपासणी करण्याचे उपकरण त्यांनी एकाच वेळी शोधून काढले. त्यांच्या सन्मानार्थ या उपकरणाला साहिलीचे हिमोग्लोबिनोमीटर असे म्हणतात. जॉर्ज हायेम या फ्रेंच रुधिरशास्त्रज्ञासह त्यांनी रक्तबिम्बिका मोजण्याचे उपकरणदेखील शोधून काढले होते.

डॉ. नंदिनी नेरुरकर- देशमुख

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

आशापूर्णा देवी यांची साहित्यसंपदा

अनेक कथा आणि १२५ हून अधिक कादंबऱ्या- एवढं विपुल लेखन आशापूर्णा देवींनी केलं. सुरुवात झाली बालसाहित्यापासून, पण माणसामाणसांची अगणित रूपे न्याहाळण्याचा, त्यांच्या चित्रविचित्र वर्तनाचा वेध घेण्याचा त्यांना छंदच जडला होता. साध्यासुध्या सामान्य माणसांच्या व्यथा जिव्हाळ्याने त्यांनी जाणल्या आणि निपुणपणे शब्दांकित केल्या.

बंगालमधील तत्कालीन समाजातील मुलींना शालेय शिक्षण घेता आलं नव्हतं तसंच आशापूर्णा देवींनाही. बालपणापासून अनुभवलेल्या या परिस्थितीमुळे त्यांच्या संवेदनक्षम मनात अनेक ‘का’? घुटमळत होते. प्रकट होण्यास तळमळत होते. तेच त्यांच्या लेखणीने शब्दबद्ध केले. लहान वयापासूनच स्त्रीवर घातलेली बंधने, बालविधवांच्या समस्या, कठोर प्रथा, परंपरा यावर विपुल प्रतिकारात्मक लेखन त्यांनी केलं.

१९३७ मध्ये त्यांची ‘पत्नी ओ प्रेयोशी’ ही पहिली कथा ‘आनंद बझार’ पत्रिकेत प्रसिद्ध झाली. त्यातील  विचार अनेकांना बंडखोर वाटले. दुसऱ्या महायुद्धानंतर स्त्रिया नोकऱ्या करू लागल्यामुळे कुटुंबातील स्त्रियांचे  ताण वाढू लागले; पण या व्यथा-वेदना कोणीही जाणून घेतल्या नाहीत किंवा तिला दिलासाही दिला नाही. हे हेरणारी ‘पदविका’ ही निम्नवर्गातील जयंतीची आणि तिची आई सावित्री यांची कथा अंत:करणाला पीळ पाडणारी आहे. आशापूर्णा देवींचे २३ कथासंग्रह प्रसिद्ध झाले, त्यापैकी पहिला ‘जल और आगुन’हा  १९४० चा. कथासाहित्यातून असंख्य स्त्री पात्रे आणि अगदी घरातील नोकरचाकरसुद्घा- यांच्या मनोदशेचे चित्रण विलक्षण सहजतेने, प्रामाणिकपणे  केलेले  दिसते.

१९४५ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘प्रेम ओ प्रयोजन’ ही आशापूर्णा देवींची पहिली कादंबरी. त्यानंतर त्यांच्या सव्वाशेहून अधिक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. ‘बालिर नीचे ढेडम्’ (वाळूखालील लाट) ही कादंबरी क्रमश: प्रसिद्ध झाली आहे. ‘प्रेम ओ प्रयोजन’ मध्ये दोन पिढय़ांतील द्वंद्व चित्रित केले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या पाश्र्वभूमीवर आणि बॉम्बफेकीच्या अफवेनं घाबरलेल्या कोलकात्यात बेरोजगार युवकांसाठी रोजचे जगणेही अवघड झालेले होते. त्यांना आशापूर्णा देवींनी, काळाची आव्हाने भावुकतेने नव्हे तर सक्रिय जीवन जगून पेलता येतील हे सांगितले आहे. १९६४ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘प्रथम प्रतिश्रुती’ या कादंबरीने वाचकांचे लक्ष वेधून घेतले. त्या वर्षीच टागोर पुरस्कार; तर १९७६ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. वास्तविक ‘प्रथम प्रतिश्रुती’, ‘सुवर्णलता’ व ‘बकुलकथा’ या  त्रयीतली पहिली कायदंबरी.  या तीन पिढय़ांतील स्त्रीचं दर्शन घडवणाऱ्या या एकेका कादंबरीतून  तिच्या प्रश्नांचे डोह उमगतात.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 3:23 am

Web Title: hemoglobin measurements
Next Stories
1 कुतूहल : हिमोग्लोबिन
2 महमद  इब्न  मुसा  अल्  ख्वारिज्मी
3 अकिलन यांची ‘चित्तिरप्पावै’
Just Now!
X