21 January 2018

News Flash

कुतूहल

जैविक घटकांप्रमाणेच जर पाण्यात रासायनिक पदार्थ मिसळले गेले असतील तर आपल्या शरीरावर घातक परिणाम होतात. रासायनिक कारखान्यातून सोडलेल्या पाण्यात काही विषारी मूलद्रव्य असण्याची शक्यता असते.

मुंबई | Updated: November 8, 2012 1:08 AM

कुतूहल
दूषित पाण्यामुळे होणारे रोग-२
जैविक घटकांप्रमाणेच जर पाण्यात रासायनिक पदार्थ मिसळले गेले असतील तर आपल्या शरीरावर घातक परिणाम होतात. रासायनिक कारखान्यातून सोडलेल्या पाण्यात काही विषारी मूलद्रव्य असण्याची शक्यता असते.
शिसे : शिसंमिश्रित पाणी आपल्या शरीरात गेल्यास मज्जासंस्थेवर परिणाम होतो. लहान मुले आणि स्त्रिया यांना या पाण्यापासून जास्त धोका असतो.
फ्लोराइड हे दातांसाठी उपयुक्त मूलद्रव्य पण जास्त प्रमाणात पाण्यात मिसळले गेले असेल तर दात पिवळे पडतात तसेच पाठीच्या कण्यावर परिणाम होतो.
अर्सेनिक जर पाण्यात असेल तर यकृत, मूत्रपिंड, आतडी मज्जासंस्थेवर परिणाम होतो.
रोग होण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून काळजी घेणे जास्त चांगलं असते. दूषित पाण्यामुळे होणारे रोग टाळणे हे बऱ्याच प्रमाणात आपल्या हातात असते. नदी, तळे, तलाव, विहिरी हे पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक महत्त्वाचे स्रोत. पाण्याचे साठे सुरक्षित राहावेत यासाठी आपण बऱ्याच लहान लहान गोष्टी करू शकतो.
सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळणार नाही याची काळजी घ्या. बऱ्याच वेळेला पाण्याची पाइप लाइन आणि सांडपाण्याची गटारे एकमेकांच्या हातात हात घालून जातात, त्याची अशी मैत्री असेल तर ती तोडा. आपल्या गावात किंवा शहरात असं चित्र दिसल्यास परिसरातील संबंधित सरकारी यंत्रणेच्या ही गोष्ट लक्षात आणून द्या.
पाण्याच्या साठय़ात कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये.
तसेच आपल्या घरातील पाणी आपण सोप्या पद्धतीने शुद्ध करू शकतो.
निवळणे : जर पाणी थोडंसं जरी गढूळ असेल तर त्याला तुरटी लावा. तुरटी पाण्यात मिसळली की मातीतील बारीक कण तळाला बसतात.
गाळणे :  तुरटी लावून निवळलेले पाणी नंतर पांढऱ्या, सुती तीन पदरी कापडानं गाळावं.
उकळणे : पाणी साधारणपणे १५ मिनिटं उकळल्यावर पाण्यातील जीवाणू मरतात. उकळलेले पाणी हा एक सुरक्षित पर्याय आहे. त्याशिवाय बाजारात उपलब्ध असलेले क्लोरोवॅट हे औषध मिसळले तर उत्तमच. पाणी उकळवून थंड झाल्यावर कॅण्डल फिल्टने गाळावे. त्याची चव पूर्ववत होते.
सुचेता भिडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी,मुंबई २२  
office@mavipamumbai.org

इतिहासात आज दिनांक..
८ नोव्हेंबर
१८४८ जर्मन गणितज्ञ व ‘आकारिक तर्कशास्त्र’ या शाखेचे जनक गोटलोप फ्रेग यांचा जन्म.
१९१९महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ ‘पु.ल.’ यांचा मुंबईत गावदेवी भागातील हेमराज चाळीत जन्म. वडील आबा ऊर्फ लक्ष्मणराव आणि मातोश्री लक्ष्मीबाई यांच्याकडून पुलंना संगीत आणि साहित्याचा वारसा मिळाला. शालेय जीवनापासून पुलं नकला करणे, गाणे म्हणणे, पेटी वाजविणे, नाटकात भूमिका करणे, प्रसंगी नाटुकली लिहिणे, भाषणे करणे आणि ऐकणे या गोष्टी करीत असत. निरीक्षण, भाषाप्रभुत्व, हरहुन्नरीपणा यांमुळे ते बालपणापासूनच लोकप्रिय झाले. बी.ए., एलएलबी, एम. ए. झाल्यावर पुलंच्या प्राध्यापकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा झाला. राणी पार्वतीदेवी विद्यालय, कीर्ती महाविद्यालय, मालेगाव शिक्षण संस्था येथे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. १९४३ मध्ये बडोद्याच्या ‘अभिरुची’ मासिकात त्यांचे ‘अण्णा वडगावकर’ हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले. १९४६ मध्ये सुनीताबाई देशपांडे यांच्याशी रत्नागिरी येथे त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला व पुढे या दाम्पत्याने समाजसेवेचाही आदर्श निर्माण केला. पुलंनी साहित्य, नाटय़, चित्रपट, संगीत या सर्वच क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविला. १९५९ ते १९६१ या काळात भारतातील दूरदर्शनचे पहिले निर्माते या नात्याने त्यांनी ठसा उमटविला. साहित्यात ते अजरामर झाले.
१९८७ पुणे आंतरराष्ट्रीय  मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले. ही राज्यातील पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन.
डॉ. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची
होयसाळ कारकीर्द
होयसाळ घराण्याची कारकीर्द इ. स. १०२६ ते १३४३ या कालखंडात कर्नाटक व तामिळनाडूच्या काही प्रदेशांत झाली. प्रथम त्यांची राजधानी बेलूर येथे होती. नंतर त्यांनी हळेबीड येथे राजधानी हलविली. होयसाळ वंशाचे लोक मूळ पश्चिम घाट प्रदेशातले राहणारे होते. त्यांच्यापैकी अरेकल्ल या माणसाने साधारणत: इ.स. ९५० मध्ये एका छोटय़ा वसतीचे किंवा पाडय़ाचे नेतृत्व केले. त्याचा मुलगा मरूग हा त्या प्रदेशाच्या चालुक्य राजांचा मांडलिक झाला. त्यांचे वारस नृपकाम, मुंडा इत्यादींनी त्यांचे छोटे राज्य वाढवूनही चालुक्यांचे मांडलिकत्व चालूच ठेवले. पुढे चालुक्य आणि कलाचुरी या राजांमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धाच्या धुमश्चक्रीत होयसाळ राजांनी चालुक्यांचे मांडलिकत्व झुगारून देऊन स्वतंत्र राज्य जाहीर केले.
होयसाळांच्या सुरुवातीच्या राज्यकर्त्यांपैकी साल याने लहानशा तलशरीने वाघावर वार करून जैन गुरू सुदत यांस वाचविले. होय म्हणजे वार करणे. साल राजाने वार केला म्हणून होयसाळ. यावरून या राजवंशाचे नाव होयसाळ झाले. होयसाळ घराण्यातले नृपकर्म दुसरा, होयसाळ विनयदत्त, वीर बल्लाळ पहिला, विष्णुवर्धन, नरसिंह पहिला, वीर बल्लाळ दुसरा हे राजे प्रसिद्धी पावले. विष्णुवर्धनच्या कारकीर्दीत श्रीवैष्णव संत रामानुज यांचा उदय  झाला. रामानुजांनी इ.स. १११६ मध्ये विष्णुवर्धनला वैष्णव पंथ स्वीकारण्याचा आग्रह केला. पण त्याची राणी जैन तर वडील शैव होते. त्यामुळे विष्णुवर्धनने त्यांना नकार दिला. वीर बल्लाळ याने तामिळनाडूत पांडय़ांचा पराभव करून तिथे पाय रोवले. त्याने दक्षिण भागातली त्यांची राजधानी श्रीरंगम् येथे उभारली. चालुक्यांच्या अस्तानंतर ते राज्य देवगिरीचे यादव आणि द्वारसमुद्रचे (हळेबीड) होयसाळ यांच्या विभागले गेले. या गोष्टीचा फायदा अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक कपूरने उठवीत १३०७ साली यादवराज्य आणि १३४३ साली होयसाळ राज्य मदुराई येथील लढाईत विजय मिळवून नष्ट केले. बल्लाळ तिसरा हा राजा या युद्धात मारला गेला.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

मनमोराचा पिसारा..
जे न देखे रवी..
जे न देखे रवी, ते देखे ‘कवी’ या ओळीत गेली अनेक र्वष पाठलाग केलाय. जे सूर्यालाही दिसू शकत नाही. ते कवीला कसं काय बुवा दिसू शकतं? कवीला जे दिसतं. ते मित्रा, तुझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वकुबाच्या माणसाला दिसेल का? ते रवीला न दिसलेलं ते सत्य असतं की ती केवळ कवीकल्पना, कवीने लढविलेली अक्कल? कवींची ती प्रतिभा म्हणायची की दिव्य दृष्टी? की तर्कट? अशा प्रश्नांची उत्तरं अचानक मिळाली आणि न विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरं मिळाली.
गंमत म्हणजे ही उत्तर साहित्य. साहित्य समीक्षा किंवा मानसशास्त्राकडून मिळाले नाहीत तर ‘मेंदू’ शास्त्रांमध्ये सापडली. पुढे जाऊन असंही म्हणतो की बिघडलेल्या मेंदूच्या अभ्यासातून उत्तरं मिळाली. इथे मांडलेल्या दोन आकृती पाहा. इंग्रजी ५ आणि २ या आकडय़ांनी इथे करामत केली आहे.
‘आकृती १’ मध्ये नीट पाहिलंस तर तुला ‘२’ हा आकडा सापडेल एकाहून अधिक आकडेही दिसतील. काही मित्रांना मात्र शोधायला वेळ लागेल. स्वत:वर करून झाल्यावर हा प्रयोग इतरांवर करण्यापूर्वी स्टॉप वॉचचा वापर केलास तर तुझ्या कुटुंबीयांचे मित्र-परिवाराचं डोकं कसं चालतं? किंवा किती झपाटय़ानं काम करू शकतं? याचा अंदाज येईल. आता दुसरी आकृती (आकृती २) पाहा. इथेदेखील ‘२’ आकडे दिसतील आणि मोजून पाच सेकंदांनी दोन आकडय़ांनी एक त्रिकोण (उलटा) तयार केल्याचं लक्षात येईल. पुन्हा पाहा बरं.. दिसला ना त्रिकोण? जास्त वेळ लागला नाही ना? नाऊ, गो बॅक टू ‘आकृती १’ . इथेदेखील ‘२’ या आकडय़ांनी त्रिकोण तयार केलाय. नीट पाहा. वरून तिसऱ्या लाइनमध्ये सलग ‘२’ हा आकडा तीन वेळा दिसेल. तो त्रिकोणाचा पाया.. बाकीचे ‘२’ आकडे शोध म्हणजे त्रिकोण पूर्ण होईल. या गोष्टीला नक्कीच अधिक वेळ लागला. होय ना?
आता या प्रयोगाचा रवी-कवीशी काय संबंध? मेंदू शास्त्रज्ञांनी यावर अभ्यास आणि संशोधन करून मेंदूच्या विशिष्ट केंद्रामध्ये अशा दृष्य अनुभवाचं विश्लेषण केलं जातं, ते (केंद्र) कोणतं ते शोधून काढलं त्यांच्या लक्षात आलं की ‘आकृती १’ मधला त्रिकोण पटकन दिसत नाही आणि ‘आकृती २’ मधला दिसतो कारण ‘आकृती २’ मध्ये दोन हा आकडा अधिक ठळक रंगात आहे त्या मानाने पाच आकडा फिकट आहे. तर ‘आकृती १’ मध्ये ५ आणि २ यांचा ठळकपणा सारखाच आहे. परंतु नीट लक्ष दिल्यास चाणाक्षपणे निरीक्षण केल्यास ‘आकृती १’ मधला त्रिकोण दिसू शकतो. मेंदूच्या त्या विशिष्ट केंद्राला इजा झाली तर मात्र त्रिकोण हुडकणं कठीण होतं आणि भरपूर सराव केला आणि मेंदूला काळजीपूर्वक पाहण्याचं प्रशिक्षण दिलं तरीदेखील हे त्रिकोण पटकन सापडू शकतात. काही लोकांना मात्र ‘आकृती १’ मधला त्रिकोण कोणी सांगण्याआधीच दिसतो! हेच ते कवी!! मेंदू-मेंदूमध्ये फरक असतो, क्षमतांमध्ये फरक असतो, तो असा. मेंदूतल्या अशा तथाकथित कमतरतेवर प्रशिक्षणाने मात करता येते, आहे की नाही, गंमत!
आता हा खेळ कोणाकोणाबरोबर खेळणार? अ‍ॅण्ड बी रेडी फॉर सरप्राइजेस!!
डॉ. राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com

First Published on November 8, 2012 1:08 am

Web Title: history navneet today date
  1. No Comments.