02 June 2020

News Flash

कुतूहल : पेशी सिद्धांताचा पाया

मॅथिहॅस श्लायडेनने आपले लक्ष वनस्पतींच्या अभ्यासावर केंद्रित के

सजीवांतील पेशींचे वर्णन करणारा पहिला संशोधक इंग्लडचा रॉबर्ट हूक. १६६०-७० च्या दशकात आपल्या सूक्ष्मदर्शकाद्वारे त्याने प्राण्यांच्या तसेच वनस्पतींच्या पेशींचे निरीक्षण केले. डच संशोधक अँटनी व्हॅन ल्यूएनहॉकसह इतरांनीही त्यानंतरच्या काळात पेशींचे निरीक्षण केले. मात्र या पेशींचे जीवशास्त्रीय महत्त्व समजण्यास एकोणिसावे शतक उजाडावे लागले. दरम्यानच्या काळात पेशींतील इतर घटकांची माहिती होऊ लागली. १८२४ साली फ्रान्समधील हेन्री डय़ूट्रोशे आणि फ्रँकॉय-व्हिन्सेट रास्पेल या संशोधकांनी वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या पेशींच्या रचनेतील साम्य ओळखले. त्यानंतर सात वर्षांतच इंग्लडच्या रॉबर्ट ब्राऊनने पेशीतील केंद्रकाचा शोध लावला. या सर्व संशोधनानंतर थिओडोर श्वान आणि मॅथिहॅस श्लायडेन या जर्मन संशोधकांनी पेशी सिद्धांताचा पाया घातला.

मॅथिहॅस श्लायडेनने आपले लक्ष वनस्पतींच्या अभ्यासावर केंद्रित केले होते. १८३८ साली केंद्रकातील बारीक कणांपासून इतर केंद्रकांची निर्मिती होत असल्याचे (चुकीचे) मत त्याने मांडले. मात्र पेशींच्या वाढीत पेशींतील केंद्रक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्याने ओळखले होते. श्लायडेनच्याच प्रयोगशाळेतील थिओडोर श्वान याला, श्लायडेनशी याच विषयावर चर्चा करताना, प्राण्यांच्या चेतातंतूंच्या (नोटोकॉर्ड) पेशीत पूर्वी पाहिलेल्या अशाच केंद्रकांचे महत्त्व उमगले. आता वनस्पतीच्या पेशींतील केंद्रकाचे कार्य आणि प्राण्यांच्या चेतातंतूंच्या पेशींतील केंद्रकाचे कार्य सारखेच आहे का, याचा शोध घ्यायला त्याने सुरुवात केली. या निरीक्षणांचा परस्पर संबंध लक्षात घेता थिओडोर स्वान याने प्रत्येक सजीव हा पेशींनी बनलेला आहे असा सिद्धांत मांडला. यालाच ‘श्वान-श्लायडेन पेशी सिद्धांत’ असे म्हणतात.

थिओडोर श्वानने यानंतर, विविध संशोधकांनी त्या काळापर्यंत केलेल्या पेशीविषयक निरीक्षणांचे सविस्तर विश्लेषण करणारे पुस्तक लिहिले. १८३९ सालच्या या पुस्तकात त्याने, वनस्पतींतील आणि प्राण्यांतील उती जरी वेगळ्या दिसत असल्या, तरी त्या पेशींपासूनच बनल्या असल्याचे दाखवून दिले. पेशी ही तीन भागांत बनलेली असल्याचे त्याने स्पष्ट केले – केंद्रक, पेशीद्रव आणि पेशीभित्ती. पेशींची निर्मिती ही पेशींच्या केंद्रकांद्वारे होत असल्याचे मत व्यक्त करताना, पेशींच्या बाहेरही केंद्रके असून त्यातूनही पेशींची निर्मिती होत असल्याचा श्लायडेनप्रमाणेच त्याचाही समज होता. परंतु १८८०-९०च्या सुमारास जर्मनीच्या वाल्थेर फ्लेिमग आणि इतरांनी केलेल्या गुणसूत्रांच्या विभाजनावरील संशोधनानंतर हा गैरसमज दूर झाला.

– डॉ. रंजन गग्रे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2019 1:23 am

Web Title: history of cell biology foundation of cell theory cell theory zws 70
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : निसर्ग-शिक्षण
2 कुतूहल : ओझोनचे छिद्र
3 मेंदूशी मैत्री : उच्चार
Just Now!
X