ताऱ्यांच्या संबंधी एक अतिशय मजेशीर गोष्ट आहे ती म्हणजे त्यांचे जीवन-चक्र. मनुष्य-प्राण्याचे जसे चक्र असते तसेच जीवनचक्र त्यांचेही असते. म्हणजे ताऱ्याचा जन्म होतो, तो किशोरावस्थेत प्रवेश करतो, पुढे प्रौढ बनतो आणि शेवटी मरण पावतो. याचाच अर्थ असा की, प्रत्येक ताऱ्याला ‘वय’ असते, तसेच ठरावीक आयुष्य असते.

खगोलशास्त्रात सगळ्याच गोष्टी प्रचंड असतात. साहजिकपणे ताऱ्याचे आयुष्यही प्रचंड असते. प्रचंड म्हणजे किती? तर अब्जावधी वर्षांचे. उदाहरणार्थ, आपल्या सूर्याचे आयुष्य आहे १० अब्ज वर्षांचे आणि त्याचे सध्याचे वय आहे ५ अब्ज वष्रे. म्हणजे तो त्याच्या आयुष्यकाळाच्या मध्यावर आहे.

आता साहजिकपणे प्रश्न पडतो की, ताऱ्याचे वय ठरवतात तरी कसे? हे वय ठरविण्याच्या अनेक पद्धती आहेत; पण त्यातली समजायला सोपी असलेली पद्धत आपण पाहू या. त्यासाठी आपण सूर्याचे उदाहरण घेऊ. प्रत्येक ताऱ्याच्या अंतर्भागात एक क्रिया सतत चालू असते. तिला म्हणतात संमीलन क्रिया. कारण या क्रियेत हायड्रोजनची दोन अणुकेंद्रे एकत्र येऊन त्यापासून हेलिअमची निर्मिती होते. या क्रियेत प्रचंड ऊर्जा निर्माण होते. तिलाच आपण सौरऊर्जा म्हणतो. ही ऊर्जा जेव्हा निर्माण होते तेव्हा ताऱ्याच्या वस्तुमानात घट होते. एखादा तारा मरण पावतो म्हणजे त्याच्यात असलेले इंधन म्हणजे हायड्रोजन संपते. साहजिकपणे, आपल्याला सूर्यात असलेल्या हायड्रोजनचे प्रमाण कळले तर त्याच्या वयाचा अंदाज बांधणे सोपे जाईल.

सूर्यामध्ये असलेल्या हायड्रोजनच्या वस्तुमानाचे मापन शास्त्रज्ञांनी केलेले आहे. ते सुमारे  २ ७ १०३२ ग्रॅम एवढे आहे. त्याच्या आधारे, सूर्य त्याच्या संपूर्ण जीवनात सुमारे  १०५१ अर्ग एवढी ऊर्जा बाहेर टाकेल, असे आपण म्हणू शकतो. सूर्य एका सेकंदात सुमारे ४ ७ १०३३ अर्ग इतकी ऊर्जा बाहेर टाकतो, असे गणित मांडण्यात आले आहे. याआधारे आकडेमोड केली तर सूर्याचे वय अंदाजे १० अब्ज वर्षे येते. हीच पद्धत वापरून आपण इतर ताऱ्यांच्या वयाचा अंदाज करू शकतो.

– डॉ. गिरीश पिंपळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

‘बाल साहित्यकार’ विंदांचे मोठेपण..

बालकविता हा विंदानी मराठी कवितेला दिलेला मोलाचा खजिना आहे. या वाङ्मय प्रकाराला नवे अर्थपूर्ण वळण देण्याचा- बालगीताचे बालकवितेत रूपांतर करण्याचा प्रयत्न विंदांनी केला. त्यांच्या मते बाल मनाशी जिव्हाळ्याचा संवाद साधणारी कविता म्हणजे बालकविता.  ‘एकदा काय झाले’ ( १९६१) पासून शेवटच्या ‘बागुलबोवा’ (१९९३) पर्यंत त्यांचे एकूण बारा बालकविता संग्रह प्रकाशित झाले . ‘राणीचा बाग’, ‘एटू लोकांचा देश’, ‘परी ग परी’, ‘पिशी मावशी आणि तिची भुतावळ’,  इ. संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बालकवितांमध्ये कधी प्रत्यक्ष लहान मुलांच्या दृष्टिकोनातून अनुभव साकार होतो तर कधी बालमनाच्या भावविश्वाला जवळचे असे माकडाचे दुकान, कोल्होबाची सर्कस, उंटावरचा शहाणा, पिशी मांजरी, सर्कसवाला, इ. असे अनेक विषय, प्राणीसृष्टी, शाळा, कुटुंब या कवितांमध्ये दिसतात.

‘डोळे मिटुनी पिशी मावशी

गाणे गाते साधेभोळे

डोळे उघडुनि पाही पुढती

सापाचे डुलते वेटोळे..

विंदांच्या बालकवितांतील मंत्राचं स्वरूपही आगळेवेगळं आहे. सुट्टी मिळवण्याचा मंत्र, टोक न मोडण्याचा मंत्र, छडी मोडण्याचा मंत्र, पहिल्या नंबरचा मंत्र, चिडविण्याचा मंत्र, पतंग गुल करण्याचा मंत्र या  मुलांच्या भावविश्वातली जागा व्यापणाऱ्या, बालमनाला आपला वाटणाऱ्या गोष्टी आहेत. आणि विंदा त्या अनोख्या पद्धतीने व्यक्त करताना दिसतात. विंदांचे हे वैविध्यपूर्ण, प्रयोगशील, काव्यलेखन, त्यांचे लघुनिबंध, समीक्षालेखन, एवढेच काय पण त्यांचे काव्यवाचनही वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे  होते.

आयुष्यात विंदांना अनेक मानसन्मान मिळाले . १९७० सोव्हिएट अ‍ॅण्ड नेहरू पुरस्कार, १९८२ कुमारन् आसन् पुरस्कार, १९८५ महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, १९८७ कुसुमाग्रज पुरस्कार, १९९१ कबीर सन्मान, १९९३ कोणार्क सन्मान, १९९३ जनस्थान पुरस्कार, १९९९ भारतीय भाषा परिषद, साहित्य पुरस्कार, २००२ डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार, २००३ ज्ञानपीठ पुरस्कार, एन.सी.आर.डी. (४ पुरस्कार), महाराष्ट्र शासन (१० पुरस्कार), सीनिअर फुलब्राइट पुरस्कार इ. विविध सन्मान त्यांना लाभले.

विंदांचे मोठेपण असे की, पुरस्कारातून मिळालेली सात लाख रुपयांची रक्कम त्यांनी झोपडपट्टी निर्मूलन, वेश्यांच्या एड्सग्रस्त मुलींचे पुनर्वसन, भूकंप, दुष्काळ निवारण, माधव ज्युलिअन व्याख्यानमाला,मराठी भाषा व साहित्य भवन वास्तू  इ. विविध कार्यासाठी, सार्वजनिक संस्थांना उदारविचारे वाटून टाकली.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com