पाणी उपसण्यासाठी प्राचीन काळापासून विविध साधनांचा उपयोग केला जात आहे. त्यापैकी ज्याला पंप म्हणता येईल, असे दोन महत्त्वाचे शोध इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात लागले. यातला पहिला शोध म्हणजे आर्किमिडीज या ग्रीक संशोधकाने तयार केलेला स्क्रू-पंप. यामध्ये एका पोकळ सिलिंडरच्या आत, जवळपास सिलिंडरच्या व्यासाइतक्याच व्यासाचा एक उभा स्क्रू बसवला होता. या स्क्रूच्या आटय़ांत बरेच अंतर ठेवलेले होते. या स्क्रूची खालची बाजू पाण्याच्या साठय़ात असे, तर वरची बाजू ही, ज्यात पाणी सोडायचे त्या हौद्याजवळ असे. स्क्रू फिरविला की लागोपाठच्या दोन आटय़ांमध्ये अडकलेले पाणी वरवर चढत जाऊन हौद्यात पडायचे. स्क्रू फिरत असेपर्यंत, ही क्रिया सतत होत राहून पाणी उपसले जायचे. असा पंप आजही उद्योगजगतात वापरला जातो. फक्त स्क्रू हाताने फिरविण्याऐवजी त्याला विद्युतमोटर बसविलेली असते.

याच सुमारास टेसिबियस या ग्रीक संशोधकाने दुसऱ्या एका प्रकारच्या पंपाचा शोध लावला. टेसिबियसच्या पंपात सिलिंडर, दट्टय़ा व तळाला फक्त वर उघडणारी झडप होती. पंपातला दट्टय़ा वर खेचताना निर्माण होणाऱ्या कमी दाबामुळे झडप उघडायची आणि पाणी वर खेचले जायचे. दट्टय़ा खाली ढकलला की झडप बंद व्हायची आणि सिलिंडरमधील पाणी एका नळीद्वारे बाहेर फेकले जायचे. आजही असे दट्टय़ा व झडपेचा वापर करणारे पंप नेहमीच्या वापरात असून, अशा पंपांना ‘प्रत्यागामी’ (रेसिप्रोकेटिंग) पंप म्हटले जाते.

सोळाव्या शतकाच्या अखेरीस फ्रेंच संशोधक सव्‍‌र्हिए याने तयार केलेल्या ‘गियर’ पंपात, नळीद्वारे पंपात घेतलेले द्रवपदार्थ एका फिरत्या दंतूर चाकाच्या दात्यांद्वारे पुढे ढकलले जायचे व शेवटी दुसऱ्या नळीद्वारे बाहेर पडायचे. यानंतर सतराव्या शतकाच्या अखेरीस डेनिस पेपिन या फ्रेंच संशोधकाने अपकेंद्री (सेंट्रिफ्युगल) बलाचा वापर करणारा पंप बनवला.

यात एका अक्षाला जोडलेली पाती गोल फिरत आणि त्याबरोबर फिरणारा द्रवपदार्थ अक्षापासून दूर फेकला जाऊन एका नळीद्वारे बाहेर येई. या दोन्ही प्रकारच्या पंपांचा उपयोग तेल किंवा चिखलासारखे जाड पदार्थ उपसण्यासही करता येऊ लागला. यानंतरच्या काळात या सर्व प्रकारच्या पंपांत विविध सुधारणा होत राहून, त्यांची कार्यक्षमता आज मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.

शशिकांत धारणे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org