गेल्या काही दशकांमध्ये आपल्याकडील मातीची सुपीकता आणि गुणवत्ता मोठय़ा प्रमाणात ढासळली आहे आणि याचा थेट परिणाम अन्नधान्य उत्पादनावर आणि गुणवत्तेवर होत आहे. या समस्येवर जगभरातील शेतकऱ्यांना दिलासा देणारे संशोधन विख्यात मृदाशास्त्रज्ञ डॉ. रतन लाल यांनी केले आहे. आज पाकिस्तानचा भाग असलेल्या पश्चिम पंजाबात जन्मलेल्या डॉ. रतन लाल यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात आले. भारतीय कृषी संशोधन संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून अमेरिकेतील ओहियो विद्यापीठातून डॉ. लाल यांनी पीएच.डी. प्राप्त केली. नंतर काही काळ ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठात आणि पुढे नायजेरियातील आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेत १८ वर्षे अध्यापनकार्य करून डॉ. रतन लाल अमेरिकेतील ओहियो विद्यापीठात रुजू झाले. तिथल्या ‘कार्बन व्यवस्थापन आणि विलगीकरण केंद्रा’चे ते संस्थापक संचालक आहेत. डॉ. लाल यांनी मातीची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने संशोधन केले. मागील पाच दशकांत त्यांनी आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये केलेल्या मृदासंवर्धनाच्या संशोधनकार्यामुळे ५० कोटींहून अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा झाला, त्याचप्रमाणे दोन अब्ज लोकांच्या अन्नसुरक्षेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

मातीच्या विघटनावर परिणाम करणाऱ्या अनेक कारणांचा, घटकांचा अभ्यास करून डॉ. लाल यांनी मातीचे आरोग्य आणि जमिनीत असलेल्या सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढवण्यावर भर दिला. हानिकारक घटकांपासून मातीचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी विनानांगरणी शेती, आवरण पिके (कव्हर क्रॉपिंग), पालापाचोळ्यांचा वापर (मल्चिंग) अशा तंत्रांचा यशस्वीरीत्या अवलंब करून त्याद्वारे जमिनीतील पाण्याचे संरक्षण होईल आणि पोषणमूल्ये, कर्ब वायू, सेंद्रिय पदार्थ जमिनीत कसे मुरून राहतील, याचा मार्ग दाखवला. यामुळे दुष्काळ, पूर आणि बदलत्या वातावरणाच्या दुष्परिणामांना सामोरे जात असलेल्या शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. त्यांनी आणलेल्या या तंत्रांचा उपयोग व्यापक स्तरावर सुरू झाल्यास, पिकांखालील जमिनक्षेत्र सुमारे ३० टक्क्यांनी कमी होऊनही सद्य:शतक संपताना तृणधान्यांचे वार्षिक उत्पादन दुप्पट झालेले असेल, असा आशावाद व्यक्त केला जातो.

कृषी क्षेत्रातील मातीची गुणवत्ता वाढवून अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करणे आणि अन्नधान्याचा जागतिक पुरवठा वाढवणे या कामी दिलेल्या योगदानासाठी डॉ. रतन लाल यांना ‘कृषी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार’ अशी ओळख असलेला ‘जागतिक अन्न पुरस्कार’ देऊन यंदा सन्मानित करण्यात आले आहे.

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org