प्रा. जोशी यांचा जन्म १३ एप्रिल १९३७ साली झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. त्यानंतर मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी १९६४ मध्ये प्राप्त करून वनस्पतीशास्त्र अध्यापनासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची निवड केली. अध्यापनाबरोबरच पर्ण-प्रथिन या विषयात संशोधन करून विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्थ केले. डाळवर्गीय वनस्पती, काही गवताचे वाण आणि कंद भाज्यांची टाकून दिलेली हिरवी पाने, पर्ण-प्रथिनांबरोबरच जनावरांसाठी पौष्टिक आहारसुद्धा देतात. हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य गाभा होता. स्त्रिया आणि मुले यांच्या आहारातील प्रथिनांची कमतरता कशी भरून काढता येईल या विचारांनी ते प्रेरित झाले होते. याच विषयातील पुढील संशोधनासाठी १९६७ मध्ये आंतराष्ट्रीय ख्यातीचे जीवरसायनशास्त्रज्ञ डॉ. पिरी यांच्या इंग्लंडमधील ‘रॉथमस्टेड’ येथे गेले. मायदेशी परत येताना त्यांना रॉयल सोसायटी व आय, बी.पी. या संस्थांकडून पानांमधून प्रथिने वेगळी करण्यासाठी अद्ययावत यंत्रसामग्री भेट मिळाली. डॉ. जोशी यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून पर्ण-प्रथिनांवर उच्च दर्जाचे संशोधन केले. ‘मिल्स ऑफ मिलियन फाऊंडेशन’, युनायटेड किंगडम आणि स्वीडिश सरकारच्या फेलोशिप त्यांना प्राप्त होत्या. ते अमेरिकेतील टेनेसी विद्यापीठात तीन वष्रे अभ्यागत प्राध्यापक होते. आंतराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये अनेक शोध निबंध त्यांनी प्रसिद्ध केले. औरंगाबाद येथे १९८२ साली झालेल्या पर्ण-प्रथिन परिषदेचे ते अध्यक्ष होते. औरंगाबादजवळील बिडकीन येथे त्यांनी एक प्रकल्प राबवला, त्यात गरीब मुलांसाठी प्रथिनांची कमतरता पडू नये यासाठी पर्ण-प्रथिने पुरवण्याची योजना केली. मराठीत प्रथिनांवर विपुल प्रमाणात लेखन केले. भारत सरकारने १९८२ साली प्रा. जोशी यांच्या पर्ण-प्रथिन संशोधनावर आधारित मुल्कराज आनंद लिखित आणि दिग्दíशत एक सुरेख माहितीपट तयार करून देशात सर्वत्र प्रसिद्ध केला. मराठी विश्वकोश व जीवशास्त्र परिभाषा कोश यांचे ते सदस्य आहेत.

प्रा. जोशी १९९७ साली वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. सध्या ते कोल्हापूर येथे स्थायिक असून आजही अनेक विद्यार्थ्यांना संशोधनकार्यात मदत करत असतात.

– डॉ. नागेश टेकाळे 

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

 

 

बार्सिलोनाचा पाब्लो पिकासो

बार्सलिोनाजवळच्या मलागा या गावात १८८१ साली  जन्मलेला पाब्लो पिकासो हा नवचित्रकारितेचा जनक म्हणून ओळखला जातो. पिकासोने त्याच्या हयातीत अनेक माध्यमे हाताळली. विसाव्या शतकातले राजकीय, सामाजिक चढउतार, गुंतागुंत आणि परस्परविरोधी प्रवाह याबाबतच्या पिकासोच्या प्रतिक्रिया त्याच्या चित्र आणि शिल्पकृतींमधून आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्याने मांडल्या. त्याने पारंपरिक चित्रपद्धतीला नवीन वळण देऊन ‘क्युबिझम’ म्हणजे घनवाद ही संकल्पना मांडली. त्याने बार्सलिोनाच्या आर्ट अकादमीत पारंपरिक व्यक्तिचित्रे आणि समूहदृश्ये काढण्याचे शिक्षण त्याने घेतले.

बार्सलिोनानंतर पॅरिसमध्ये राहून तेथील कलाविश्वाचा त्याने सखोल अभ्यास केला. तेथील चित्रकारांशी, शिल्पकारांशी आणि साहित्यिकांशी त्याची ओळख होऊन कलेविषयीचा त्याचा एक वेगळा दृष्टिकोन तयार झाला. १९०१ ते १९०५ या काळात त्याने काढलेल्या चित्रांमध्ये त्याने स्वत: अनुभवलेल्या दारिद्रय़ाचे, वेदनांचे प्रतििबब दिसते. या कालखंडाला ‘ब्ल्यू पीरियड’ म्हणतात. पुढे १९०६ नंतरच्या कालखंडात त्याच्या कलाकृतींमध्ये संगीत, नृत्य हे विषय आले आणि थोडी सुबत्ता दिसू लागली. या पुढच्या कालखंडाला ‘रोझ पीरियड’ म्हणतात. १९०७ साली त्याने रंगवलेल्या ‘ला दम्वॉइझेल दि ला अ‍ॅव्हिऑन’ या चित्राने युरोपातील कलाविश्वात खळबळ उडाली. या चित्राला आधुनिक पाश्चात्त्य कलेतील महत्त्वाचा टप्पा मानण्यात येते. त्यापुढचे ‘थ्री म्युझिशियन्स’ हे त्याचे ‘घनवादी’ (क्युबिस्ट शैलीतील चित्र खूप गाजले. आधुनिकतेचा ध्यास घेतलेला पिकासो कुठल्या एका गोष्टीत जास्त काळ रमलाच नाही. पिकासोच्या गाजलेल्या चित्रांमध्ये ‘टु सिटेड वुमेन’, ‘नाइट फिशिंग’, ‘दि कार्ड प्लेयर’ वगरेंचा समावेश होतो. त्याने आपल्या कलाकृतींसाठी अनेक माध्यमे हाताळली. ‘द मॅन विथ द लॅम्ब’ ही त्याची शिल्पकृती बरीच प्रसिद्ध झाली. रंगलेपनासोबत कागद, दोरी, चिंध्या, तार इत्यादी वस्तू वापरून त्याने एक वेगळाच घनवाद निर्माण केला. आपल्या कलाकृतींमधून त्याने चित्रविषयाकडे किती प्रकारे पाहता येते, याची नवी दृष्टी कलाजगताला दिली. १९७३ साली त्याचा मृत्यू झाला. पिकासोवर ज्ञानेश्वर नाडकर्णी व  माधुरी पुरंदरे यांनी मराठीत पुस्तके लिहिली आहेत.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com