औद्योगिक क्षेत्र असो किंवा नाटय़-चित्रपट क्षेत्र, भारतात शेकडो वर्षांपासून स्थायिक झालेल्या पारशी लोकांनी त्यामध्ये आपली विशेष ओळख निर्माण करून ठेवली आहे. अगदी वाडिया मूव्हिटोनचे होमी वाडिया, अभिनेते सोहराब मोदी यांच्यापासून रॉनी स्क्रूवाला, बोमन इराणी यांच्यापर्यंत आणि अभिनेत्रींतही डेझी इराणी, शेरनाझ पटेल, पर्सिस खंबाटा, अरुणा इराणी ही काही नावे घेता येतील.

३०० हून अधिक हिंदी, मराठी, गुजराती चित्रपटांत भूमिका केलेल्या अरुणा इराणीचा जन्म मुंबईतला, १९४६ सालचा. वडील फरीद्दुन हे पारशी तर आई सगुणा ही मराठी. बालवयातच अरुणाने चित्रपटात किरकोळ कामे करायला सुरुवात केली. १९६१साली दिलीपकुमारच्या ‘गंगा जमना’त बालकलाकार म्हणून अरुणाचा चित्रपटात प्रवेश झाला. ‘फर्ज’ (१९६७) आणि ‘कारवा’ (१९७१) या चित्रपटांमधील तिच्या नृत्याभिनयामुळे तिचे या क्षेत्रातले स्थान भक्कम झाले. अरुणा इराणीचे ‘उपकार’ (१९६७), ‘बॉम्बे टू गोवा’ (१९७२), ‘नागीन’ (१९७६), ‘चरस’ (१९७६), ‘दयावान’ (१९८८), ‘शहेनशहा’ (१९८८), ‘फूल और काँटे’ (१९९१), ‘राजा बाबू’ (१९९५), ‘हसीना मान जायेगी’ (१९९९) हे काही गाजलेले चित्रपट. अभिनेता मेहमूदसह ‘गरम मसाला’ (१९७२) मधील तिची भूमिका विशेष गाजली. दोनदा तिला सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आणि २०१२ साली याच सोहळ्यात ‘जीवन गौरव’ही मिळाला. चित्रपट दिग्दर्शक कुकू (संदेश) कोहली यांच्याशी १९९० साली अरुणाने विवाह केला. अरुणाचे धाकटे भाऊ अदी इराणी हे चित्रपट अभिनेते तर दुसरे इंद्रकुमार हे चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आहेत.

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com