News Flash

कुतूहल : राइट बंधूंचे विमान

१७ डिसेंबर १९०३ रोजी राइट बंधूंच्या या ‘राइट फ्लायर’ विमानाने स्वबळावर आकाशात झेप घेतली

मानवाची आकाशात झेप घेण्याची इच्छा फार पुरातन आहे. सुरुवातीच्या काळात आकाशात झेप घेण्यासाठी हायड्रोजनसारख्या वायूने भरलेले फुगे किंवा मोठय़ा फुग्यासारखे ‘झेपेलिन’, तसेच पतंगासारखी ग्लायडर वापरात आली. ग्लायडरला बांधलेल्या दोऱ्या पकडून तीन-चार जण जोरात धावायचे. या धावण्यामुळे ही ग्लायडर पतंगासारखी हवेत वर जायची. त्यानंतर धावणाऱ्यांच्या हातातल्या दोऱ्या सोडून दिल्या जायच्या आणि ग्लायडर हवेत उडायचे. अनेक उत्साही वैमानिकांना ही ग्लायडर चालवत असताना अपघाती मृत्यू आले. यापैकी ग्लायडरच्या अपघातात मृत्यू पावलेल्या ओटो लिलेन्थाल या जर्मन संशोधकाने ग्लायडरचा शास्त्रोक्त अभ्यास केला होता.

अमेरिकेत डेटन येथील ऑव्‍‌र्हिल आणि विल्बर राइट या सायकलचे दुकान चालवणाऱ्या बंधूंना ग्लायडिंगचा छंद होता. लिलेन्थालला झालेला अपघात हा ग्लायडरवर पुरेसा ताबा ठेवता येत नसल्यामुळे झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पंख्याचा आकार हा ग्लायडरच्या स्थैर्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे त्यांनी जाणले. १९०० सालापासून उत्तर कॅरोलिनातील किट्टी हॉक येथील प्रशस्त समुद्रकिनाऱ्यावर सुरू केलेल्या चाचण्यांत त्यांनी ग्लायडरच्या पंखांत अनेक बदल करून पाहिले. यातील अपयशानंतर अखेर राइटबंधूंनी घरगुती स्वरूपाचा, पत्र्याचा छोटासा बंदिस्त ‘विंड टनेल’ तयार केला. एका बाजूला पंखा लावलेल्या या साधनाच्या आत, ग्लायडरच्या छोटय़ा प्रारूपांच्या उड्डाणाचे बाहेरील काचेतून निरीक्षण करता येई. या चाचण्यांवरून राइट बंधूंनी अनेक ग्लायडर तयार करून, ती १९०२ साली किट्टी हॉक येथून उडवून पाहिली. वर-खाली, डावीकडे-उजवीकडे, स्वत:भोवती अशा सर्वच नियंत्रणासाठी त्यांनी या ग्लायडरच्या पंखात सोयी केल्या होत्या.

त्यानंतर १९०३ मध्ये त्यांनी, यापैकीच समाधानकारक ठरलेल्या एका ग्लायडरची थोडी मोठी आवृत्ती बनवली. स्प्रूसच्या हलक्या लाकडाची चौकट आणि मलमलसारखे तलम कापड वापरून केलेल्या या ‘विमाना’चे वजन पावणेतीनशे किलोग्रॅम होते आणि त्याच्या पंखांचा (विंग) पसारा बारा मीटरचा होता. वर उचलले जाण्यासाठी या विमानाला अडीच मीटर व्यासाचे पंखे (प्रॉपेलर) होते. हे पंखे फिरवण्यासाठी विमानात इंजिन बसवण्यात आले होते. १७ डिसेंबर १९०३ रोजी राइट बंधूंच्या या ‘राइट फ्लायर’ विमानाने स्वबळावर आकाशात झेप घेतली आणि विमानयुगाला सुरुवात झाली! या दिवशीच्या सर्वोत्तम उड्डाणात या विमानाने ५८ सेकंदांत सुमारे पाव किलोमीटरचा प्रवास केला.

– सुनील सुळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 4:13 am

Web Title: inventors of the airplane wright brothers zws 70
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : मनातल्या विचारांवर प्रकाश
2 मेंदूशी मैत्री : उच्च प्रेरणा
3 कुतूहल : विजेचा दिवा
Just Now!
X