02 March 2021

News Flash

इस्तंबूलची जडणघडण

भूमध्य समुद्र आणि काळा समुद्र यांना जोडणाऱ्या बॉस्फरस खाडीने विभागलेले इस्तंबूल

भूमध्य समुद्र आणि काळा समुद्र यांना जोडणाऱ्या बॉस्फरस खाडीने विभागलेले इस्तंबूल ही तुर्कस्तानची आíथक, व्यापारी आणि औद्योगिक राजधानी म्हणून ओळखली जाते. येथील औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योग, तेल उत्पादन, रबर, धातू, चामडे, रसायने, काच, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादींचा समावेश आहे. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही संस्कृतींचा मिलाफ इथे झाल्यामुळे प्रामुख्याने युरोपियन लोकांना येथे शॉपिंग करण्याची आवड आहे. इस्तंबुलात वेगवेगळ्या वस्तूंच्या वेगवेगळ्या बाजारपेठा आणि ‘बाजार’ किंवा ‘मॉल’ आहेत. ‘कापली कार्सी’ या आच्छादित बाजारात दागदागिने, गालिचे, कलाकृती, कलाकुसरीच्या वस्तूंची चार हजारांहून अधिक दुकाने आहेत तर ‘स्पाइस बाजारात’ मसाले आणि मसाल्याचे पदार्थ, सुकामेवा आणि टिकाऊ खाद्यपदार्थाचा मोठा बाजार आहे. निधर्मी प्रजासत्ताक सरकार असलेल्या तुर्कस्तानच्या या प्रमुख शहरांमध्ये ९९ टक्के नागरिक तुर्की इस्लाम धर्माचे आहेत. या मुस्लीम लोकसंख्येपकी दोन तृतीयांश लोक सुन्नीपंथीय तर एक तृतीयांश लोक अलेबी म्हणजे शियापंथीय आहेत. मुस्लीम बहुसंख्याक शहर असूनही इस्तंबूलमध्ये साक्षरतेचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक आहे. सध्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणाऱ्या ३५०० शाळा या शहरात आहेत. रोमन सम्राट थिओडोसियस द्वितीय (कारकीर्द इ.स.४०१ ते ४५०) याने इ.स. ४२५ साली इस्तंबूलमध्ये युनिव्हर्सटिी ऑफ कॉन्स्टन्टिनोपल स्थापन केली. पुढे ओटोमन काळात, १४५३ साली या विद्यापीठाचे नाव युनिव्हर्सटिी ऑफ इस्तंबूल करण्यात आले. याशिवाय दोन अमेरिकन शिक्षणसंस्था आणि काही खाजगी शिक्षणसंस्थाही शहरात कार्यरत आहेत. टर्की, अरेबिक आणि जर्मन भाषा इस्तंबूलमध्ये बोलल्या जातात. फुटबॉल हा येथील लोकांचा पसंतीचा खेळ. शहरात फुटबॉलची तीन क्रीडांगणे आहेत. युरोपियन इस्तंबूल आणि आशियाई इस्तंबूल, बास्फरस खाडीवरून तीन मोठय़ा लांबलचक पुलांनी जोडलेले आहेत. इस्तंबूल शहर आणि उपनगरे मिळून लोकसंख्या सव्वा कोटीहून अधिक आहे. आíथक परिस्थिती फारशी चांगली नसूनही इस्तंबूल शहरात शाही आणि आधुनिक संस्कृतींच्या मिश्रणामुळे या शहराला एक वेगळीच शान आहे!

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

परसबाग

परसबाग ही संकल्पना तशी काही नवीन नाही. परस होता तेव्हा बागपण होती. काळाची गरज आणि उदरनिर्वाहासाठी शहराकडे धाव घेणे माणसाच्या गरजेचे झाले. शहरी राहणीमानामुळे परस गेले, कारण इमारतीमधील ब्लॉक संस्कृती आली. अशा परिस्थितीत परसासाठी पर्याय शोधणे गरजेचे आहे.

अनुभवाने असे लक्षात आले की, कमीतकमी सहा तास सूर्यप्रकाश उपलब्ध असलेली गच्ची किंवा बाल्कनी परसबागेसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. या दोन्ही जागांमधून पाण्याची गळती होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. अन्यथा आपल्या हौसेचा इतरांना त्रास होऊ शकतो.

बाल्कनीमध्ये योग्य आकाराच्या कुंडय़ा, जुन्या बादल्या किंवा डबे ठेवून परसबाग करणे शक्य आहे. त्यासाठी काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम परसबागेसंबंधी आपले धोरण ठरवणे गरजेचे आहे. आपल्याला परसबागेत कुठले पीक अपेक्षित आहे. पालेभाज्या, फळभाज्या, मसाल्याचे पदार्थ किंवा घरगुती उपयोगाच्या औषधी वनस्पती, शक्य झाल्यास कमी वेळात उत्पन्न देणाऱ्या वनस्पतींची निवड करावी. वनस्पतींच्या निवडीनुसार कुंडय़ांचा आकार खोलगट असावा की उथळ असावा हे ठरविता येते.

आपण पालक, मेथी, शेपू, माठ यांसारख्या पालेभाज्या; भेंडी, कांदे- बटाटे, वांगी यांसारख्या फळभाज्या; आले, लसूण, पुदिना, कोथिंबिरीसारखे मसाल्याचे पदार्थ किंवा कोरफड, तुळस, कडूकिराईत, पातीचहासारखी औषधी वनस्पती लावू शकतो. स्वयंपाकघरातील ओला कचरा, गांडूळ यांचा उपयोग उत्तम खत म्हणून होतो. हे केल्यास खतांची उपलब्धता तर होतेच, शिवाय  कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्नही सुटतो. या कचऱ्यात लिंबूवर्गीय वनस्पतींचा कचरा नसावा. कारण तो गांडुळाच्या अस्तित्वास घातक ठरतो. त्याचप्रमाणे मांस व दुग्धजन्य पदार्थ कुजण्याच्या प्रक्रियेत दरुगध पसरवतात. परसबाग करणे, त्याची योग्य काळजी घेणे हा वेळेचा सदुपयोग ठरू शकतो. त्याद्वारे आपल्याला शुद्ध आणि स्वच्छ  निवासाची प्राप्ती होते, जे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.

खरंतर शालेय शिक्षणातच परसबागेसंबंधीचे प्रशिक्षण सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे उद्याच्या भावी नागरिकांमध्ये स्वच्छ आणि शुद्ध पर्यावरण राखण्यासाठीचे संस्कार लहान वयापासूनच होतील.

– डॉ. सी. एस. लट्टू

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

 office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 2:23 am

Web Title: istanbul city in turkey
Next Stories
1 इस्तंबूलची सत्तांतरे
2 बायझंटाइन.. कान्स्टंटिनोपल.. इस्तंबूल
3 ब्रसेल्सची ऑड्रे हेपबर्न
Just Now!
X