03 December 2020

News Flash

कुतूहल – जांभूळ

पावसाला सुरुवात झाली की बाजारात जांभळे विकायला येतात. काळी, जांभळी, टपोरी जांभळे पाहूनच जिभेला पाणी सुटते.

(संग्रहित छायाचित्र)

पावसाला सुरुवात झाली की बाजारात जांभळे विकायला येतात. काळी, जांभळी, टपोरी जांभळे पाहूनच जिभेला पाणी सुटते. आंबट, गोड चव जिभेवर रेंगाळते. संपूर्ण भारतात हा वृक्ष आढळतो. या वृक्षाचे उगमस्थान हिंदमहासागराच्या बेटावर असावे. उंची साधारण १५ ते २० मीटर असते. जंगलामध्ये याची वाढ जास्त असते. शेतात, बागेत, आणि रस्त्याच्या बाजूला अशा सर्व ठिकाणी हा वृक्ष आढळून येतो. याचे खोड खडबडीत, असून खोडावर फिकट रंगाची साल असते. पाने संमुख, लांबट, लंबगोलाकार, चिवट, गुळगुळीत, तजेलदार असतात. पाने चुरल्यावर जांभळाचा वास येतो. पानांच्या उपशिरा समांतर असतात, कडेवर एकमेकांना जुळलेल्या असतात. हा वृक्ष ‘मिर्टेसी’ म्हणजेच ‘जांभूळ’ कुळातील आहे. हिरवट सफेद रंगाच्या, मंद वासाचे भरघोस गुच्छ मार्च- एप्रिल महिन्यापासून दिसायला लागतात. याची फळे सुरुवातीला हिरवी, लाल, जांभळट असतात पिकल्यावर पूर्ण काळपट जांभळी, रसदार आणि गरयुक्त होतात, फळाची लांबी साधारण १५ ते १० मिमी असते याच्या आतमध्ये बी असते. ती साधारण ३ मिमी आकाराची असते. लहान मुलांपासून मोठय़ा माणसांपर्यंत सर्वांनाच ही फळे आवडतात. याच्यापासून जॅम, सरबते व व्हिनेगर बनवितात. याचे मूळ, खोड, पाने, फळे, बिया सर्वांचा, खोकला, अतिसार, पोटदुखी, पुटकुळ्या, फोड हे आजार बरे करण्यासाठी केला जातो. अनेक विकारांत उपयोगी पडते, जांभळाच्या बीचे चुर्ण मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाते. याचे लाकूड टिकाऊ असते.
जांभूळ वृक्षाचा उपयोग सावली अणि फळांसाठी आहे. पानांची रचना दाटीवाटीने असल्याने बऱ्यापकी गारवा निर्माण होतो. शिवाय जांभळाच्या फळांना संमिश्र स्वाद असल्याने मधमाशांना पोळे करण्यासाठी हा वृक्ष भावतो.
दक्षिण भारतात हा वृक्ष जोमाने वाढतो. तेथूनच हा वृक्ष पूर्वेकडे ब्रह्मदेश, (म्यानमार) मलेशिया, इंडोनेशिया येथे पोहोचला आहे. याची उगवणक्षमता चांगली आहे. वनस्पती शास्त्रातील याचे नाव ‘सायझियम क्युमिनी’ असे आहे. या झाडाची मुद्दामहून लागवड केली जात नाही. तसेच आपल्याकडे बियांपासून अभिवृद्धीचे प्रथा रूढ आहे. त्यामुळे अपेक्षित गुणवत्तेची फळे मिळणे कठीण होऊन बसते. परंतु या झाडाचे आíथक महत्त्व लक्षात घेऊन व्यापारी तत्त्वावर लागवड करणे आणि चांगले वाण विकसित करणे गरजेचे आहे.
– अनिता कुलकर्णी , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ – office@mavipamumbai.org

नागर आख्यान – रोमन साम्राज्याचा अस्त
३२४ साली पूर्वेकडच्या रोमन साम्राज्याचा कॉन्स्टन्टाइन हा सम्राट झाला. त्याने राजधानीसाठी कॉन्स्टन्टिनोपल हे शहर वसविले. या काळात मूळ रोमन राज्यात व्हिसगॉथ, सॅक्सन्स, लोंबार्ड यासारख्या जम्र्यानिक लुटारू टोळ्यांचा रोममध्ये हैदोस चालू होता. ४७६ साली जम्र्यानिक टोळी प्रमुख ओडोसर याने तत्कालीन रोमन सम्राट रोम्युलस सिझर याला पदच्युत करून रोमबाहेर हाकलून दिले आणि रोमचा कब्जा घेतला. अशा तऱ्हेने ४७६ साली रोमन साम्राज्याचा अस्त झाला. यानंतर पुढची चारशे वष्रे रोमवर रानटी टोळ्यांचे राज्य होते. या चारशे वर्षांत रोमन राज्याची लोकसंख्या १० लाखांवरून ५० हजारांवर आली. या टोळ्यांच्या हल्ल्यांबरोबरच युद्ध, प्लेग, दुष्काळ यामुळे एकेकाळी वैभवशाली असलेल्या रोमवर अवकळा पसरली. या ४०० वर्षांत चर्चचे प्राबल्य वाढले. पोपने चर्चची मालमत्ता वाढविली, अनेक जमिनी चर्चच्या अखत्यारीत आणल्या. पण लुटारूंचे हल्ले थांबविण्यासाठी पोपलिओ द्वितीयने फ्रेंच राजा शार्लमेनला विनंती केली आणि त्याच्या डोक्यावर मुकुट ठेवून त्याला सम्राट घोषित केले. सम्राट शार्लमेनचे साम्राज्य तेथून पुढे ‘पवित्र रोमन साम्राज्य’ म्हणून ओळखले गेले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस सर्व युरोपियन देशांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण होऊन राज्यांचे एकीकरण आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रयत्न सुरू झाले. १८४९ साली कार्लो अम्रेलिनी, मॅझिनी आणि सफी या नेत्यांनी रोमन प्रजासत्ताकाची घोषणा केली आणि त्या दडपणाने पोप पायस नववा रोम सोडून पळून गेला. पुढे मार्च १८६१ मध्ये इटालीतील राज्यांचे एकीकरण होऊन इटाली हा अखंड देश निर्माण झाला. त्याच वर्षी इटालीची संसद भरून रोम येथे राजधानी स्थापन झाली. राजकीय पक्षांमध्ये नॅशनल फॅसिस्ट पक्षाला मताधिक्य होते आणि बेनिटो मुसोलिनी याच्या नेतृत्वाखालील फॅसिस्ट पक्षाचे सरकार इ.स. १९२२ ते १९४३ या काळात सत्तेवर होते.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 4:37 am

Web Title: java plum
टॅग Navneet
Next Stories
1 रोमन साम्राज्याची विभागणी
2 विक्षिप्त रोमन सम्राट निरो
3 दुबळा सम्राट क्लॉडियस
Just Now!
X