27 February 2021

News Flash

आवर्तसारणी आणि क्रॉसवर्ड

‘द असेंट ऑफ मॅन’ या पुस्तकामध्ये जॅकॉब ब्रॉनोव्हस्की’ यांनी विज्ञानाच्या विविध टप्प्यांवरचा प्रवास लिहिला आहे.

‘द असेंट ऑफ मॅन’ या पुस्तकामध्ये जॅकॉब ब्रॉनोव्हस्की’ यांनी विज्ञानाच्या विविध टप्प्यांवरचा प्रवास लिहिला आहे. या पुस्तकावरच त्यांनी तेरा भागांची चित्रवाणी मालिका ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनसाठी तयार केली. इ.स.१९५० च्या दशकात बीबीसीने ती प्रसारित केली. कालांतराने आपल्या दूरदर्शननेही ती आपल्यासाठी दाखवली. ब्रॉनोव्हस्की म्हणतात, मूलद्रव्यांची मांडणी अर्थात आवर्तसारणी एका क्रॉसवर्ड कोडय़ासारखी किंवा पत्त्यांच्या पेशन्स या खेळासारखी आहे. या दोन्ही खेळांमध्ये काही जागा खेळता खेळता मोकळ्या सोडल्या जातात. मोकळ्या सोडलेल्या जागेवर नंतर कधीतरी शब्द किंवा पत्ता येईल असे वाटत राहते आणि तशी जागा भरली जाते. अगदी याचप्रमाणे दिमित्री मेंडेलिव्हने आवर्तसारणी करताना काही जागा मोकळ्या सोडल्या. कालांतराने खरोखरच तिथे चपखल बसणारी मूलद्रव्ये सापडली.

मेंडेलिव्हने इ.स. १८७१च्या सुमारास आवर्तसारणी तयार केली तेव्हा फक्त ६३ मूलद्रव्यांचा शोध लागला होता. त्या वेळेला अणूचे भंजनही झालेले नव्हते. अणुक्रमांक, अणुकेंद्र, प्रोटॉन, न्यूट्रॉन, समस्थानिक या कल्पनाही अस्तित्वात नव्हत्या. या सर्व संकल्पना स्पष्ट झाल्यानंतरही मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत फारसे बदल झाले नाहीत. त्यामुळे मेंडेलिव्हची आवर्तसारणी फारच पायाभूत आणि महत्त्वाची ठरते. १८७१च्याच सुमारास लॉदर मेयर यांनीही आवर्तसारणी तयार केली होती. परंतु ती त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशात आली. अणुभारांमध्ये बदल होत गेले तशा मूलद्रव्यांच्या जागा बदलल्या, पण मूळ विचार कायम राहिला.

मूलद्रव्यांची आवर्तसारणी तयार करताना मेंडेलिव्ह यांनी सांगितले की, ‘मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानानुसार मूलद्रव्यांची मांडणी केली असून ते स्थान त्यांच्या गुणधर्माच्या समानतेचे असल्याचेही व्यक्त होते.’ मेंडेलिव्हने मूलद्रव्यांची मांडणी करताना उभ्या आणि आडव्या दोन दिशांचा विचार केला. एकाच कुटुंबामध्ये येऊ शकतील अशा समान गुणधर्माच्या मूलद्रव्यांची मांडणी उभ्या दिशेने म्हणजे उभ्या स्तंभांमध्ये केली. असे आठ गट किंवा स्तंभ तयार केले. त्याच वेळेस अणुवस्तुमानाच्या चढत्या किमतीनुसार त्यांची मांडणी आडव्या दिशेने – आडव्या रांगांमध्ये केली. जिथे जिथे उभे आणि आडवे स्थान एकत्र आले नाही ती जागा मोकळी सोडली, किंवा त्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या अचूकतेविषयी शंका घेतली. मेंडेलिव्ह यांनी आवर्तसारणी तयार करताना एकाच कौटुंबिक समानतेला महत्त्व दिले.

– जयंत श्रीधर एरंडे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 1:51 am

Web Title: list of chemical elements
Next Stories
1 रस्किन बाँडची साहित्यसंपदा
2 कुतूहल : आवर्तसारणीची गोष्ट
3 जे आले ते रमले.. : रस्किन बॉण्ड
Just Now!
X