29 November 2020

News Flash

मनोवेध : सकारात्मक मानसशास्त्र

कुत्रे असे का वागतात, हे सेलिग्मन यांच्या प्राध्यापकांना समजले नव्हते.

डॉ. यश वेलणकर

मानवकेंद्रित मानसोपचार पद्धतीमध्ये प्रेरणा, आयुष्याचा अर्थ अशा संकल्पनांना महत्त्व असले तरी, पूर्वी मानसोपचार हे मुख्यत: कोणताही त्रास असेल तर तो कमी करण्यासाठी वापरले जायचे. हा दृष्टिकोन बदलून सकारात्मक मानसशास्त्र विकसित करण्यात मार्टिन सेलिग्मन यांचे मोठे योगदान आहे. १९४६ मध्ये जन्मलेल्या या शास्त्रज्ञाने २००० साली ‘सकारात्मक मानस केंद्र’ सुरू केले असले, तरी २१ व्या वर्षीच त्यांनी ‘माणसे मनाने हतबल का होतात?’ यावर संशोधन केले. हे संशोधन त्यांच्या प्राध्यापकांनी सुरू केले होते.प्रयोगशाळेत कुत्र्यांना इलेक्ट्रिक शॉक दिले की ते तेथून दुसरीकडे पळतात. पण असे शॉक देताना त्याना सुरुवातीला पळायला जागाच नसेल तर शॉक लागला तरी ते हतबल होऊन तेथेच राहतात. असे काही काळ केल्यानंतर त्यांना पळायला जागा आहे अशा ठिकाणी ठेवले आणि शॉक दिले तरी ते पळत नाहीत. कुत्रे असे का वागतात, हे सेलिग्मन यांच्या प्राध्यापकांना समजले नव्हते. ते सेलिग्मन यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्याला ‘संस्कारातून हतबलता (लर्नेड हेल्पलेसनेस)’ असे नाव दिले. म्हणजे प्रथम शॉक लागत असताना पळून जाणे शक्य नसल्याने ते सहन करण्याचा संस्कार कुत्र्यांवर झाला. नंतर पळणे आणि शॉकपासून स्वत:ला वाचवणे शक्य असूनही या संस्कारामुळे ते हतबल होऊन तेथेच राहू लागले.

सेलिग्मन यांनी नंतर याच विषयात प्राणी आणि माणसे यांवर शेकडो प्रयोग केले आणि १९७८ साली हा सिद्धांत प्रसिद्ध केला. याच हतबलतेमधून निराशा आणि औदासीन्य येते हेही त्यांच्या लक्षात आले. त्यावर उपाय म्हणून ‘आशावादाचे संस्कार (लर्नेड ऑप्टिमिझम)’ करणे शक्य आहे, हेही त्यांनी प्रयोगातून दाखवून दिले. त्यांनी विविध क्षेत्रांतील शेकडो यशस्वी माणसांचा अभ्यास करून- ‘आशावादी माणसे आयुष्यात जास्त यश मिळवतात,’ असा सिद्धांत मांडला. ‘सिग्नेचर स्ट्रेंग्थ’ ही त्यांचीच संकल्पना आहे. स्वत:मधील शक्ती, कौशल्ये यांचे भान आले आणि त्याला आशावादाची जोड दिली तर माणसे आयुष्यात भरीव कामगिरी करू शकतात. याच सिद्धांतावर ‘सकारात्मक मानसशास्त्र’ ही शाखा विकसित झाली. त्यामध्ये माणसांना आनंद कशामुळे वाटतो, त्यांची सर्जनशीलता कशी विकसित होते, त्यामध्ये लक्ष देण्याची क्षमता, अटेन्शन ट्रेनिंग कसे महत्त्वाचे आहे, यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रयोग होत आहेत.

 yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 12:56 am

Web Title: loksatta manovedh positive psychology zws 70
Next Stories
1 मनोवेध : स्वीकार आणि निर्धार
2 कुतूहल : वन्यजीवांची तस्करी
3 मनोवेध : प्रसूतीनंतर औदासीन्य