News Flash

कुतूहल – किफायतशीर दूध उत्पादन- ३

दूध उत्पादनात दर्जाचे सातत्य राखण्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतात. कासेच्या आजारामुळे गुरांचे दूध उत्पादन थांबून कायम स्वरूपाचे नुकसान होते

| August 16, 2013 12:22 pm

दूध उत्पादनात दर्जाचे सातत्य राखण्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतात. कासेच्या आजारामुळे गुरांचे दूध उत्पादन थांबून कायम स्वरूपाचे नुकसान होते; यासाठी गोठा स्वच्छ ठेवावा, दूध काढणाऱ्या व्यक्तीने साबण, पाणी वापरून हातपाय स्वच्छ करावे. धुण्याचा सोडा गरम पाण्यात टाकून (४ टक्के)  दूध काढण्याची, साठवण्याची भांडी स्वच्छ करून घ्यावीत. दूध काढण्याच्या यंत्राचा वापर करावा. दूध त्वरित थंड करावे. यामुळे दुधाचा दर्जा सुधारतो. दूध नासणे टाळता येते.
गुरांचे आरोग्य : किफायतशीर दुग्धव्यवसायासाठी गुरे निरोगी असायला हवीत. सकस आहार दिल्याने खाद्य कमतरतेमुळे होणारे आजार टाळता येतील. जिवाणू, विषाणूंद्वारे होणारे आजार रोगप्रतिबंधक लसीकरणाच्या नियमित कार्यक्रमाद्वारे टाळता येतील. गोठय़ाभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, धुण्याचा सोडा, चुना समप्रमाणात घेऊन फवारणी करणे, शेणमूत्राची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे, भटक्या गुरांचा संपर्क टाळणे, पाण्याच्या टाक्या, गव्हाणी यांना दर पंधरा दिवसांनी चुनासफेदी करणे अशा उपाययोजनेद्वारे गुरांचे आजार टाळता येतील. जंतांचा त्रास टाळण्यासाठी दर तिमाहीस जंतनाशक (कृमीनाशक) औषध पशुवैद्याच्या सल्ल्यानुसार सर्व गुरांना पाजावे. गोचीड, गोमाश्यांचा प्रादुर्भाव असल्यास गुरांच्या अंगावर, गोठा आणि परिसरात कीटकनाशक औषध वापरावे. वैयक्तिक पातळीवर गोचीडनियंत्रण करण्याऐवजी सामुदायिक पातळीवर एकाच वेळी गोचीडनाशक कार्यक्रम घ्यावा. आजारी गुरांना त्वरित पशुवैद्याद्वारे पूर्ण उपचार करून घ्यावेत.
गुरांचा गोठा : गुरांचे संगोपन गोठय़ात करावे. गायी-म्हशींना पॅडॉकमध्ये (अंगणात) मोकळे सोडावे. पॅडॉकमध्ये गव्हाण आणि पाण्याची टाकी असावी. पॅडॉकच्या एका बाजूस शेड असावी. उन्हाच्या वेळी गुरे शेडमध्ये आराम करू शकतील. गोठा, पॅडॉक कुंपणाने बंदिस्त करावे.
 तणाव टाळणे : दुधाळ गुरांना दूध उत्पादनाचा तणाव असतो. आवश्यकतेनुसार सकस आहार देऊन तणाव कमी करता येईल. उन्हाळ्यात गुरांना सावलीत ठेवण्याची तजवीज करावी. त्यांच्या पाठीवर ओल्या गोण्या ठेवाव्यात. शक्य असल्यास पंख्याचा वापर करावा. थंड पाणी पाजावे. याद्वारे उन्हाळ्याचा तणाव कमी करता येईल. पायातील जखमा, अस्वच्छ गोठा यामुळेदेखील तणाव येतो.

जे देखे रवी.. – कवी १
रवी हा प्रकाशाचा जनक. तो सगळे दाखवितो. सर्वसाधारण माणसांना जे दिसत नाही ते ज्याला दिसते तो कवी, अशी कल्पना आहे. ढोबळमानाने रवी विज्ञानाकडे आणि कवी आत्मज्ञानाकडे कलतो. अर्थात विज्ञानाला आणि आत्मज्ञानाला दोघांनाही प्रतिभा आवश्यक असते, जे सरळ सरळ भासते त्याहून वेगळे किंवा उलट किंवा तिरपे दिसू लागले की, मग प्रति+भा असा शब्द होतो. केप्लरने सूर्य स्तब्ध असतो, पृथ्वी त्याच्याभोवती फिरते, असे शोधून काढले. केप्लर हल्ली हल्लीचा प्रतिभावंत, पण चौथ्या अध्यायात तेराव्या शतकात, उदय आणि अस्ताच्या कारणे। जसे न चालता होते सूर्याचे चालणे। तसेच कर्मात असूनही न करणे। हे नैष्कम्र्य जाणणे।। या अर्थाच्या ओवीत ‘सूर्य स्तब्ध आहे’ अशा प्रकारचे जे विधान मिळते त्यातही प्रतिभा उजळलेली असते, तसेच दोन आगगाडय़ा एकाच वेगाने शेजारी शेजारी चाललेल्या असल्या तर दोन्ही आगगाडय़ा स्तब्ध आहेत असा जो भास होतो, त्या भासातून आइन्स्टाइनला सापेक्षता वाद सुचला, अशी एक सुरसकथा सांगतात. त्याचे समांतर उदाहरण ज्ञानेश्वरीत चौथ्याच अध्यायात सापडते.
होडीतून जाते वेळी। वृक्षांची उलटय़ा दिशेची पळापळी।
पण असतात ते वृक्ष। त्यांच्याच स्थळी।।
यात आगगाडीच्या विरुद्ध उदाहरण दिले असले तरी मतलब सापेक्षवादाचाच असतो. किंबहुना या विश्वात ब्रह्माच्या तुलनेत अनेक वस्तूंची गर्दी असल्यामुळे सर्व गोष्टी सापेक्ष किंवा तुलनात्मक असाव्या लागतात आणि त्यातून फसगत होते,  हे जे भारतीय तत्त्वज्ञानाचे मर्म आहे, ते
आइन्स्टाइनच्या ‘स्थिरता ही गोष्ट फोल आहे. सगळ्या हालचाली एकमेकांच्या संदर्भात असतात’ या विज्ञानाशी मिळते-जुळते आहे आणि त्या दोन्हीत प्रतिभेची धगधग आहे.
कवी जसा द्रष्टा असू शकतो तसाच जादूगिरीही करू शकतो. ही जादूगिरी शब्दांची असते. शब्द तेच, पण ज्या तऱ्हेने वापरले जातात त्यामुळे एक काहीतरी निराळेच दिसू लागले. असला कवी टोपीतून ससा काढून दाखवितो. ढग सूर्यामुळे दिसतो। पण सूर्य ढगामागे लोपतो। असे आपण जे म्हणतो। ते दृश्यही दाखवितो सूर्यच। या सोप्या भाषेत केलेल्या ओवीत टोपी / ससा हा न्याय दिसतो. मूळ जादूगार सूर्यच असतो. परमात्म्याला चोर म्हणायचा धीटपणाही द्रष्टा कवी दाखवू शकतो.
विश्व घेऊन गेला। नाही ठेवला पुरावा। शोधावा कसा। अशा चोराला।
अर्थात शब्द वापरताना ज्या कौशल्याने कवी ते शब्द वापरतो त्यामुळे त्यांच्या मनातला निरोपही जास्त चांगला पोहोचतो. उदा. सज्जनांबद्दल,
घरच्यांसाठी उजेड करावा। परक्यांसाठी अंधार असू द्यावा।
अरे पांडवा। असे करीत नाही दिवा।।
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस  -अवघड मूत्रपिंडविकार : आयुर्वेदीय उपचार झ्र् २
मधुमेह व रक्तदाब या विकाराकरिता आधुनिक वैद्यकात लॅसिक्ससारख्या औषधाचा खूप मोठा वापर आहे. यामुळे मानवी शरीरात मूत्राच्या एकूण प्रमाणात तात्पुरती वाढ होऊन शरीरातील विविध अवयवांची बाह्य़ सूज कमी होते. हृदयावरचा दाब, भार तात्पुरता कमी होतो. पण सततच्या लॅसिक्ससारख्या औषधांच्या वापराने आपल्या मूत्रपिंडाचे प्रमुख कार्य ‘भरपूर लघवी निर्माण करण्याचे’, बिघडून जाते. मग डायलेसिससारखे महागडे उपचार सुरू होतात. या उपचारांत, रुग्णाचे रक्ताचे प्रमाण कमी न होता भरपूर लघवी विनासायास होईल असे परस्परविरोधी कार्य ही मोठीच कसरत असते. इथे आयुर्वेदीय औषधी महासागरातील ‘गोखरू’ या सोन्यासारख्या वनस्पतीचे योगदान काय वर्णावे?
मधुमेह व रक्तदाब विकारात शरीरातील रक्ताचे प्रमाण नीट राहावे याकरिता लोह हे घटकद्रव्य असणारी चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादि, मधुमेहवटी, पुष्टीवटी ही औषधे आपापले काम योग्य तऱ्हेने करत असतातच. पण या औषधात लोह, सुवर्णमाक्षिक भस्म, शिलाजीत, सुंठ, मिरे, पिंपळी अशी प्रामुख्याने मूत्रसंग्रहण करणारी घटकद्रव्ये असल्यामुळे; शरीरातील एकूण मूत्राचे प्रमाण कमी होते. इथे गोखरू या औषधी वनस्पतीची मदत होते. त्याकरिता क्रॉनिक रिनल फेल्युअर विकारात पूर्वी सांगितलेल्या चार औषधांच्या जोडीला गोक्षुरादिगुग्गुळ ६ गोळ्या व गोखरू, आवळकाठी, गुळवेल घटकद्रव्य असणारे रसायनचूर्ण घेतल्याने मूत्रपिंडाचे कार्य लगेचच सुधारते. सीआरएफ विकारग्रस्त रुग्णांचे लघवीचे प्रमाण नेहमी कमी म्हणजे जेमतेम २५०-३०० मिलीपर्यंत खाली आलेले असते. डायलेसिसने मूत्रपिंडाचे कार्य मुळातून सुधारत नाही. ते कार्य गोखरू हे प्रमुख घटकद्रव्य असणारी औषधे त्वरेने करतात. २४ तासांत मूत्राचे प्रमाण एक-दीड लिटपर्यंत वाढते. मात्र या काळात मीठ पूर्णपणे वज्र्य करून राजगिरासारख्या लाह्य़ा खाऊन, कोरडे कोरडे अन्न; जास्तीत जास्त पाचशे मिली द्रव पदार्थ असा आहार ठेवल्यास सीआरएफचे भ्यां कोणाला?
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – १६ ऑगस्ट
१८७९>   ‘महाराष्ट्र कविचरित्रमाला’ ही ३००० पृष्ठांची, ११ पुस्तकांची माला सिद्ध करणारे जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म. ‘कवन-कुतूहल’ (पद्यरचना), ‘प्रणय विकसन’, ‘प्रणयानंद’ ही नाटके आणि ‘मुकुंदराजाचा सार्थ- परमाकृत’ हा संपादित ग्रंथ, तसेच काही बाल-पुस्तके त्यांनी लिहिली.
१९०१>  इतिहास-लेखक आणि पत्रकार श्रीपाद रामचंद्र टिकेकर यांचा जन्म. रियासतकार सरदेसाई यांच्यासह ‘शिवाजी सूव्हेनीर’, तर प्रभाकर पाध्ये यांच्यासह ‘आजकालचा महाराष्ट्र’ या ग्रंथांचे लेखन त्यांनी केले होते. ‘मुसलमानी मुलखातल्या मुशाफिरी’, ‘ब्राह्मी बंडाळीचे ब्रह्मपुराण’ ‘सिंहाला शह’ ही पुस्तके ‘केसरी’चे वार्ताहर म्हणून त्यांनी केलेल्या बातमीदारीवर आधारित आहेत. पुढे ‘बातमीदार’ हे अभ्यासपूर्ण पुस्तकही त्यांनी लिहिले.
१९३२>  पत्रकार, लेखक व पद्यरचनाकार ‘अनिरुद्ध पुनर्वसु’ ऊर्फ नारायण गजानन आठवले यांचा जन्म. ‘प्रभंजन’ या म. फुले यांच्या जीवनावरील कादंबरीसह अनेक कादंबऱ्या, ‘सैकत’ हा कथासंग्रह, ‘मुंबैगीता’ हा मुंबईतील विषयांवरचा ओवीसंग्रह (पुढे त्यावर आधारलेले नाटकही आले) अशी सुमारे ३० पुस्तके आठवले यांच्या हयातीत प्रकाशित झाली.
– संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2013 12:22 pm

Web Title: lucrative milk production 3
टॅग : Navneet,Navnit
Next Stories
1 कुतूहल – किफायतशीर दूध उत्पादन- २
2 कुतूहल – किफायतशीर दूध उत्पादन
3 कुतूहल- पशूंच्या देशी जातींचे संवर्धन
Just Now!
X