12 December 2017

News Flash

ज्वरमापी -भाग २

बहुसंख्य धातू उष्णतेचे उत्तम वाहक आहेत; परंतु पारा हा एकमेव धातू कक्ष तापमानाला ‘द्रव’

लोकसत्ता टीम | Updated: October 5, 2017 2:53 AM

बहुसंख्य धातू उष्णतेचे उत्तम वाहक आहेत; परंतु पारा हा एकमेव धातू कक्ष तापमानाला ‘द्रव’ स्वरूपात असतो. पाऱ्याचा ‘उष्मा प्रसरण गुणांक’ जास्त असल्यामुळे तापमानातील छोटय़ाशा बदलामुळेही ज्वरमापीतील पाऱ्याच्या स्तंभाच्या उंचीत लक्षणीय बदल होतात. ज्या द्रवांचा उष्मा प्रसरण गुणांक जास्त आहे, अशा कुठल्याही द्रवाचा पाऱ्याऐवजी वापर करून तापमापी  बनवता येते. उदा. अल्कोहोल, इथेनॉल, इत्यादी. या द्रवांची पातळी ठळकपणे लक्षात येण्यासाठी त्यात लाल किंवा निळा रंग मिसळला जातो.

आजच्या पारंपरिक पाऱ्याच्या तापमापीचे जनकत्व (शोध १७१४ साली) जर्मन भौतिक शास्त्रज्ञ डॅनियल फॅरनहाईट यांच्याकडे जाते. १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत वापरली जाणारी ज्वरमापी होती एक फूट लांब आणि अचूक तापमान वाचनासाठी लागणारा कालावधी होता २० मिनिटे! १८६६च्या सुमारास ‘सर थॉमसक्लीफोर्ड अल्बर्ट’ यांनी यात सुधारणा करून ज्वरमापीची लांबी ६ इंचावर आणली. तसेच वाचनासाठी लागणारा कालावधीही पाच मिनिटांवर आणला. निरोगी मनुष्याच्या शरीराचे तापमान ३६.३ अंश सेल्सिअस ते ३७.५ अंश सेल्सिअस यामध्ये असते, हे सर्वप्रथम १८६८ साली जर्मन डॉक्टर ‘कार्ल वुंडरलीच’ यांनी सिद्ध केले.

पारा विषारी असल्याने १९९० सालापासून पाऱ्याच्या तापमापीची जागा इलेक्ट्रॉनिक अंकीय तापमापीने (डिजिटल थर्मामीटर) घेतली. यात इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये थर्मीस्टर, छोटा विद्युतघट व  LCD  पडदा असतो.

पहिली इलेक्ट्रॉनिक ज्वरमापी १९५४ मध्ये ‘काबरेलॉय (कोबाल्ट, टंगस्टन आणि कार्बन)’चा थर्मीस्टर वापरून बनवली गेली.

इलेक्ट्रॉनिक ज्वरमापीमध्ये पाऱ्याऐवजी थर्मीस्टर हा संवेदक म्हणून वापरला जातो. तापमान वाढले की, थर्मीस्टरचा रोध कमी होतो तसेच तापमान कमी झाले की रोध वाढतो. या रोधाचे मोजमाप तापमानाच्या मापनश्रेणीवर प्रमाणित करून LCD  पडद्यावर दर्शवले जाते.

ही अंकीय ज्वरमापी बगलेत दाबून धरल्यानंतर काही सेकंदांतच ‘बीप’ आवाज देऊन तापमान मापन झाले असल्याची सूचना देते. हे मापन स्मृतिकोशात (memory) साठवून ठेवण्याचीही सोय असते.

आजकाल काच, पारा किंवा बॅटरी-सेलविरहित ज्वरमापीही उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ पट्टीसारखी दिसणारी थर्मोस्ट्रिप. शरीराचे तापमान मोजताना थर्मोस्ट्रिप कपाळावर हलकेच हाताने दाबून ठेवतात. त्यावर उमटणारी पिवळ्या रंगाची रेघ तापमान दर्शवते. तसेच काही वर्णक रंगांच्या (pigments) तापमानाप्रमाणे रंग बदलणारी पावडर किंवा शाई यांच्या साहाय्यानेही तापमान वाचन करता येते.

अनुपमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

श्री. राजेंद्र केशवलाल शाह (२००१)

१९८१ ते २००० या कालावधीतील भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल २००१ चा ज्ञानपीठ पुरस्कार गुजरातीचे महत्त्वाचे कवी श्री. राजेंद्र केशवलाल शाह यांना प्रदान करण्यात आला. २००१ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे गुजराती भाषेतील राजेंद्र  शाह हे तिसरे साहित्यिक. त्याआधी  उमाशंकर जोशी (१९६७) व पन्नालाल पटेल (१९८५) हे गुजराती साहित्यिक ‘ज्ञानपीठ’चे मानकरी ठरले होते.

राजेंद्रजी हे मूलत: प्रेम, सौंदर्य, अध्यात्म, निसर्ग कवी आहेत. त्यांचे वैशिष्टय़ असे, की ते केवळ कवी आहेत. त्यांनी गद्यलेखन केले नाही. जयदेवकृत ‘गीत गोविंद’चा, दांतेंची महाकाव्यात्मक कृती ‘डिव्हाइन कॉमेडी’चा, रवींद्रनाथ टागोर, बुद्धदेव बसू, विद्यापती जीवनानंद दास इ.च्या अनेक कृतींचे त्यांनी गुजरातीत अनुवाद केले. त्यासाठी बंगाली भाषेचा अभ्यासही त्यांनी केला. मोरपीछसारख्या काही बालकविताही त्यांनी लिहिल्या आहेत.

गुजरातमधील कपडवंज (जि. खेडा) या गावी २८ जानेवारी १९१३ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव रामप्रसाद. मात्र पुढे राजेंद्र याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. त्यांचे वडील वकील होते. ते दोन वर्षांचे असतानाच वडिलांचे निधन झाले. आईच्या कठोर धार्मिक परंपरेत त्यांचे बालपण गेले. बालवयापासूनच त्यांना वाचनाचा छंद होता. मॅट्रिकपर्यंत ते गावातच शिकले. ते मॅट्रिकला असताना म. गांधींची असहकार चळवळ जोरात होती. तेव्हा राजेंद्रजी भूमिगत राहून ब्रिटिश राजवटीविरुद्ध पत्रके वाटत असताना पकडले गेले. एक हजार रु. दंड झाला. पण सहृदय मॅजिस्ट्रेटमुळे हा दंड माफ झाला आणि मॅट्रिक परीक्षेला बसायची परवानगीही मिळाली. पुढे त्यांची  शांतिनिकेतनमध्ये जायची इच्छा होती. पण शक्य न झाल्याने त्यांनी परिस्थितीवश शिकवण्या करून, मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून तत्त्वज्ञान विषयात पदवी संपादन केली. सुरुवातीला शिक्षक, मग दुकानदार, व्यावसायिक फर्मचे भागीदार आणि मुद्रणालयाचे मालक असा विविध क्षेत्रांत ते कार्यरत होते. त्या वेळी मुंबईच्या जोगेश्वरी उपनगराचा परिसर जंगलमय होता. जंगलातील लाकडे कापली जात. तेव्हा त्यांनी काही काळ लाकडाचा व्यापार सुरू केला. पण तो जमेना. घर विकून कर्ज फेडावे लागले. काही काळ दीडशे रुपये पगारावर नोकरी केली. पण त्यांचा मूळ पिंड कवीचा असल्याने कविता लेखन बहरत गेले.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

First Published on October 5, 2017 2:53 am

Web Title: marathi articles on fever