09 August 2020

News Flash

कुतूहल : फुलपाखरांचे स्थलांतर 

फुलपाखरांच्या वाढीसाठी खाद्य वनस्पती आवश्यक असते.

केवळ एक-दीड महिना एवढेच आयुष्य लाभलेली फुलपाखरे एवढय़ा काळातही स्थलांतर करतात. स्थलांतराला सुरुवात केल्यानंतर त्या प्रक्रियेस इतका वेळ लागतो की, कधी कधी फुलपाखराची पुढची पिढी स्थलांतरित होत असते. असे असूनदेखील फुलपाखरांच्या स्थलांतराची प्रक्रिया चालूच राहते. याला दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे अन्नाचा शोध आणि दुसरे म्हणजे उबदार वातावरणाची गरज.

फुलपाखरांच्या वाढीसाठी खाद्य वनस्पती आवश्यक असते. त्यावरच त्यांचा अंडी-अळी-कोष ते फुलपाखरू हा जीवनक्रम घडत असतो. ही खाद्य वनस्पती त्यांच्याकरिता अत्यंत महत्त्वाची आहे; पण ती मर्यादित असल्यामुळे, एखाद्या ठिकाणच्या वनस्पतीवर किती फुलपाखरे जगू शकतील, याचा अंदाज फुलपाखरांच्या प्रजातींकडून घेतला जातो. कालानुरूप खाद्य वनस्पतींची घट लक्षात येताच, फुलपाखरांचे स्थलांतर घडून येते. भारतात उत्तरेकडून दक्षिणेकडे अन्नाच्या शोधात हे स्थलांतर होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

फुलपाखरांना अति थंडी सहन होत नाही, त्यांना उबदार वातावरण लागते. तसेच फुलपाखरांना लागणारी ऊर्जा सूर्यप्रकाशातूनच मिळत असते. जिथे उबदार वातावरण व स्वच्छ सूर्यप्रकाश असतो, त्या प्रदेशाकडे फुलपाखरे स्थलांतर करतात. स्थलांतर करण्याआधी काही काळ फुलपाखरे एका ठिकाणी जमू लागतात, याला ‘काँग्रेशन’ असे म्हणतात.  ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यांपुरतेच निरीक्षण केल्यास, ठाण्यातील येऊरच्या जंगलात, वसईच्या किल्ल्यात काँग्रेशन होत असल्याचे आढळते. साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत हे फुलपाखरांचे काँग्रेशन पाहणे ही डोळ्यांना पर्वणी असते. ‘स्ट्राइप टायगर’ (पट्टेरी रुईकर), ‘ब्लू टायगर’ (नील रुईकर) या प्रजातींची फुलपाखरे येथे हमखास आढळतात.

जर फुलपाखरांनी स्थलांतर केलेच नाही, तर फुलपाखरे एक तर अति थंडीमुळे नाश पावतील किंवा ती ज्या खाद्य वनस्पतींवर अवलंबून आहेत, त्या खाद्य वनस्पती आणि पर्यायाने स्वत: असे दोघेही नामशेष होतील. म्हणूनच फुलपाखरांचे स्थलांतर गरजेचे असते. नैसर्गिक स्रोतांचा हवा तेवढाच वापर करण्याचे हे ज्ञान फुलपाखरांनाच नव्हे, तर पशू-पक्ष्यांनादेखील उपजतच असते. पाणी, अन्न, झाडे, पाला, फळे, भक्ष यांसारख्या नैसर्गिक स्रोतांचा वापर इतर सर्व सजीव हे जपूनच करतात. मात्र, या फुलपाखरांच्या तुलनेत अतिशय प्रगल्भ, संस्कारित व सुशिक्षित मेंदू लाभलेल्या माणसांना नैसर्गिक स्रोतांचे  महत्त्व कधी कळेल?

– दिवाकर ठोंबरे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 12:02 am

Web Title: migration of butterflies akp 94
Next Stories
1 मनोवेध : मेंदूतील बुद्धी
2 कुतूहल : फुलपाखरांची कुळे
3 कुतूहल : प्लास्टिकच्या सूक्ष्म कणांचे आव्हान
Just Now!
X