१ जानेवारी १८०१ रोजी सिरिस या छोटय़ा आकाराच्या नवीन ‘ग्रहा’चा – लघुग्रहाचा – शोध लागला. हा लघुग्रह मंगळ-गुरू यांच्या कक्षांमधील मोकळ्या जागेतून फिरत सूर्याला प्रदक्षिणा घालीत आहे. कालांतराने या मोकळ्या जागेत वसतीला असणारे अनेक लघुग्रह एकामागोमाग सापडू लागले. सिरिसच्या शोधानंतर सात दशकांतच सुमारे शंभर लघुग्रह शोधले गेले होते. आजच्या घडीला या भागात जवळजवळ आठ लाख लघुग्रह सापडले आहेत. एका पट्टय़ाच्या स्वरूपात असणाऱ्या या लघुग्रहांचे एकत्रित वस्तुमान हे आपल्या चंद्राच्या वस्तुमानापेक्षाही कमी भरते. लघुग्रहांच्या निर्मितीबद्दल पूर्वीपासून विविध सिद्धांत मांडले गेले आहेत. त्यातल्या एका जुन्या सिद्धांतानुसार या पट्टय़ाच्या ठिकाणी फार पूर्वी एखादा ग्रह अस्तित्वात असावा. या ग्रहावर सूर्यमालेतीलच दुसरा एखादा ग्रह येऊन आदळला असावा. या टकरीमुळे निर्माण झालेले दोन्ही ग्रहांचे तुकडे या पट्टय़ात लघुग्रहांच्या स्वरूपात फिरत आहेत. दुसऱ्या एका सिद्धांतानुसार, इतर ग्रहांप्रमाणेच तिथल्या दगडधोंडय़ांपासून ग्रह तयार होणे अपेक्षित होते. परंतु गुरूच्या तीव्र गुरुत्वाकर्षणामुळे इथे पूर्ण ग्रह आकार घेऊ शकला नाही व हे दगडधोंडे तसेच सूर्याभोवती फिरत राहिले.

अलीकडच्या काळात ‘ग्रँड टॅक’ हा एक नवा सिद्धांत सुचवला गेला आहे. या सिद्धांतानुसार ग्रहनिर्मितीच्या काळात, गुरू व शनी हे ग्रह हळूहळू सरकत सूर्याच्या जवळ गेले असावेत. या मार्गक्रमणात आजूबाजूच्या दगडधोंडय़ांमुळे त्यांचा मार्ग बदलून ते पुन्हा सूर्यापासून दूर ढकलले गेले आणि आता आहेत त्या कक्षांत स्थिरावले. या सर्व प्रवासात त्यांनी आजूबाजूच्या पदार्थानाही दूर ढकलून दिले. मागे उरला तो अगदी कमी वजनाच्या लघुग्रहांचा पट्टा. दुसऱ्या एका सिद्धांतानुसार आता जिथे लघुग्रह वसले आहेत ती जागा पूर्वी पूर्ण मोकळी होती. आजूबाजूच्या परिसरातील वायू, धूळ व दगडधोंडय़ांपासून मंगळ आणि गुरू या ग्रहांची निर्मिती झाली. या निर्मितीनंतर उरलेले अतिरिक्त पदार्थ मंगळ व गुरू या दरम्यानच्या मोकळ्या जागेत ढकलले जाऊन लघुग्रहांचा पट्टा निर्माण झाला. या सिद्धांताला कारण ठरणारे निरीक्षण म्हणजे, मंगळाच्या कक्षेच्या जवळ सापडणारे लघुग्रह हे मंगळाप्रमाणेच अधिक घनतेचे आहेत, तर गुरूच्या कक्षेच्या जवळ सापडणारे लघुग्रह हे गुरूप्रमाणेच कमी घनतेचे आहेत.

प्रदीप नायक 

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org