मिशनरी फ्रान्सिस झेवियर केरळ आणि गोव्यात धर्मप्रसारासाठी राहिला पण तो काही तेथल्या स्थानिक भाषा शिकला नाही. फ्रान्सिस झेवियरनंतर जे धर्मोपदेशक गोव्यात आले त्यांनी मात्र मराठी, कोकणीचा अभ्यास करून त्या भाषांमध्येच धार्मिक साहित्य रचना आणि इतर व्यवहार केले. त्या काळात अकबराच्या दरबारात आणि उत्तर भारतातल्या बऱ्याच भागांमध्ये फारसी भाषा अवगत होती.

स्पेन आणि पोर्तुगाल हे देश अरबांच्या वर्चस्वाखाली अनेक शतके राहिल्यामुळे स्पॅनिश आणि पोर्तुगीजांना फारसी आणि अरबी बऱ्यापैकी अवगत होती. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी व्यापाऱ्यांची ठाणी होती आणि त्यांच्या व्यापारी संबंधांमुळे किनारपट्टीतल्या लोकांनाही बऱ्यापैकी फारसी भाषा येत होती.

इ.स. १५७८ मध्ये गोव्याच्या व्हाइसरॉयने आंतोनियु काब्राल याला आपला वकील म्हणून अकबराच्या दरबारात पाठविलं होतं. अकबराला ख्रिस्ती धर्मासंबंधी उत्सुकता वाटल्यामुळे त्याने पोर्तुगीज वकील काब्रालला विनंती केली की ख्रिस्ती धर्माची माहिती द्यावी. काब्रालने या कामासाठी मिशनरी फादर अक्वाविवा याला अकबराच्या दरबारात नियुक्त केले, पण त्याच्या जोडीला फादर हेन्रीक्स यालाही नियुक्त केले कारण हेन्रीक्सला फारसी भाषा उत्तम येत होती.

अनेक पोर्तुगीज मिशनऱ्यांना फारसी भाषेचे ज्ञान होते आणि या भाषाज्ञानाचा उपयोग त्यांना तत्कालीन भारतीय राजकारणात आणि धर्मप्रसारासाठी झाला. पुढे परकीय युरोपियन लोकांनी भारतात प्रवेश केल्यानंतर धर्मप्रसार आणि राजकारण यांच्यासाठी स्थानिक भारतीय भाषांच्या जोडीला फारसी भाषा शिकण्याचा पायंडाच पडला.

१५९४ साली अकबराच्या दरबारातील मिशनरी फादर हिरोनीमो याने ख्रिस्ती धर्मतत्त्वांबाबतचा ‘फाऊंटन ऑफ लाइफ’ हा ग्रंथ फारसी भाषेत लिहून बादशाह अकबराला अर्पण केला. त्याच काळात फादर नोबिली आणि फादर बेस्की यांनी संस्कृत आणि तमीळ भाषांमध्येही काही धार्मिक साहित्य निर्मिती केली.

हे पोर्तुगीज मिशनरी मोगल दरबारात परकीय देशांचे व्यापारी, प्रवासी यांच्यासाठी दुभाषाचे काम करणे, त्यांची पत्रे फारसीत अनुवाद करून वाचणे इत्यादी कामे करीत. त्यामुळे मोगल दरबारात या मिशनऱ्यांचे मोठे प्रस्थ तयार झाले होते.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com