23 March 2019

News Flash

लोखंडाचा सच्चा मित्र – मॉलिब्डेनम

फार वर्षांपूर्वी सेम्फिरोपल या गावच्या रस्त्यावर मोटारींच्या चाचण्या घेतल्या जात होत्या

फार वर्षांपूर्वी सेम्फिरोपल या गावच्या रस्त्यावर मोटारींच्या चाचण्या घेतल्या जात होत्या, तपासणारे एकेक मोटार चालवून बघत होते. सर्व काम व्यवस्थित चालले होते. इतक्यात एक मोटार सपाट, गुळगुळीत रस्त्यावर चालत असतानाही उलटीपालटी झाली. निरीक्षणाअंती समजले की मोटारीचे चाक पोलादी नलिकेत मुक्तपणे फिरण्याऐवजी घट्ट अडकले होते. असे अपघात टाळण्यासाठी वंगण वापरणे महत्त्वाचे असते, मॉलिब्डेनम त्यासाठी वापरले जाते. मॉलिब्डेनम हे ग्रॅफाइटसारखे पदर असणारे आणि शिसे या धातूसारखे दिसणारे मूलद्रव्य आहे.

खरं तर अनेक मूलद्रव्यांच्या नावाप्रमाणे याच्याही नावाचं मूळ उगम ग्रीक भाषेत आहे. मॉलिब्डेस या ग्रीक शब्दाचा अर्थ शिसे. ‘गॅलेना मॉलिब्डॉस’ आणि ‘मॉलिब्डेनाइट’ या खनिजांमधून दोन मूलद्रव्ये मिळाली होती. मॉलिब्डेनमच्या शिसेसदृश दिसण्यामुळे याला शिसे समजण्यात आले होते. १७७८ मध्ये कार्ल शीलने मॉलिब्डेनमचा शोध लावला, पण शिसे आणि हे मूलद्रव्य एकच आहे असा त्याचाही समज झाला. पुढे १७८१मध्ये पीटर जेकब जेम याने मॉलिब्डेनम हे मूलद्रव्य वेगळे करण्यात यश मिळविले.

मॉलिब्डेनम हा लोखंडाचा सच्चा मित्र म्हणायला हरकत नाही. पॅरिसमधील सुप्रसिद्ध लोवर वस्तुसंग्रहालयाचे बांधकाम मॉली स्टील या पोलाद आणि मॉलिब्डेनमच्या संमिश्राने केले आहे. पोलादाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यात मॉलिब्डेनम मिसळतात. पोलादाची वर्धनीयता (पत्रा करण्याची क्षमता) आणि तन्यता (तार तयार करण्याची क्षमता) वाढवण्याचे काम मॉलिब्डेनम करते. तसेच पोलादाची मजबुतीही वाढवते. शस्त्रास्त्रे, चिलखते तयार करताना मॉलिब्डेनम आणि पोलादाचे संमिश्र वापरले जाते. सुप्रसिद्ध सामुराई तलवारींच्या धारदारपणाचे रहस्यही हेच संमिश्र आहे.

आज आपण ग्रॅफाइटच्या पेन्सिल वापरतो. कित्येक शतकांपूर्वी मॉलिब्डेनम या मूलद्रव्याचा वापर मॉलिब्डेनाइट या खनिजाच्या स्वरूपात पेन्सिल म्हणून केला जात असे. या खनिजामुळे हिरवट-भुऱ्या रंगाच्या रेषा कागदावर उमटतात. द्रवरूप नायट्रोजनचा साठा करण्यासाठी थंडतारोधक पोलादाच्या टाक्या तयार केल्या जातात. या टाक्यांच्या जोडकामास भेगा पडत असत, मॉलिब्डेनमने सच्च्या मित्रासारखा पोलादाचा हाही प्रश्न सोडवला.

काही वर्षांपूर्वी अमेरिकन संशोधकांनी रंग बदलणाऱ्या काचेचा प्रकार शोधला होता. या काचेच्या मिश्रणात मॉलिब्डेनम मिसळले जायचे किंवा काचेच्या दोन थरांमध्ये मॉलिब्डेनमचा थर असायचा. ही काच सूर्यप्रकाशात निळसर तर रात्री पारदर्शक होत असे.

– अनघा अमोल वक्टे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on June 13, 2018 2:05 am

Web Title: molybdenum chemical element