कुतूहल
पाण्यावर चालणारा साचा (भाग १)

सूतकताईसाठी हा साचा आर्कराइट या शास्त्रज्ञाने विकसित केला. यापूर्वी सूतकताईसाठी वापरण्यात येत असलेल्या टकळी, चरखा आणि जेनी या यंत्रामध्ये आणि आर्कराइटच्या या कताई साच्यामध्ये काही मूलभूत फरक आहेत. पूर्वीच्या यंत्रामध्ये पेळूची जाडी कमी करून ती सुताएवढी करण्यासाठी पेळू एका ठिकाणी घट्ट धरला जात असे. नंतर पेळूला खेच देण्यासाठी चाते किंवा पेळू एकमेकांपासून लांब लांब नेला जात असे. अशा रीतीने खेच देऊन पेळूची जाडी बारीक केली जात असे व सूत चात्यावरील बॉबिनवर गुंडाळण्यासाठी चाते पुन्हा पहिल्या जागेपर्यंत मागे आणले जात असे.

पेळूची जाडी कमी करण्यासाठी रुळांचा उपयोग लेविस पॉल आणि जॉन वॅट या शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम इ. स. १७३६ मध्ये विकसित केला. यामध्ये एकावर एक अशा रुळांच्या दोन जोडय़ा वापरल्या जातात. पुढील जोडी आणि मागील जोडीमध्ये फिरण्याच्या गतीमध्ये फरक असतो. पुढील जोडी मागील जोडीपेक्षा अधिक गतीने फिरते. या रुळांमधून पेळू पाठविला असता रुळांमधील गतीच्या फरकामुळे तो खेचला जाऊन त्याची जाडी कमी होते. जाडी जितकी कमी करावयाची असेल त्या प्रमाणात दोन्ही रूळ जोडय़ांमधील गतीचा फरक ठेवावा लागतो. अशा रीतीने रुळांच्या साहाय्याने पेळूची जाडी कमी केल्यास अधिक एकसारख्या जाडीचे सूत तयार करता येते व सुताचा दर्जा अधिक चांगला होतो. याशिवाय रुळांच्या साहाय्याने खेच देण्याची प्रक्रिया अधिक गतीने करता येते. यामुळे उत्पादनात मोठय़ा प्रमाणात वाढ होते.  टकळी, चरखा किंवा जेनी या पूर्वीच्या सूतकताईसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये सुताला पीळ देण्यासाठी तयार होणारे सूत बॉबिनच्या आसाच्या रेषेत आणून बॉबिन फिरविली असता सुताला पीळ बसत असे आणि पुरेसा पीळ देऊन झाल्यावर सूत बॉबिनच्या आसाशी काटकोनात आणून बॉबिन फिरविली असता सूत बॉबिनवर गुंडाळले जात असे. या प्रकारे सुताला पीळ देण्याचे कार्य एका टप्प्यात होते आणि सूत बॉबिनवर गुंडाळण्याचे काम दुसऱ्या टप्प्यात होत असे. म्हणजे सूतकताईची प्रक्रिया सातत्याने चालू राहत नाही. यामुळे अशा यंत्रांची उत्पादनक्षमता मर्यादित राहते. या कामासाठी लेविस पॉल आणि जॉन वॅट या शास्त्रज्ञांनी पंखाचे चाते (फ्लायर िस्पडल) आणि बॉबिन पद्धत विकसित केली.

 चं. द. काणे  (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर
कच्छ राज्य स्थापना

आजच्या गुजरात राज्यात वायव्येकडे असलेला कच्छ हा भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कच्छ हे ब्रिटिश भारतातील मोठय़ा संस्थानांपकी एक होते. भूज हे प्रमुख ठाणे असलेल्या कच्छ संस्थानाचे क्षेत्रफळ होते २१,४०० चौ.कि.मी. आणि १८९२ साली राज्याची लोकसंख्या होती पाच लाख दहा हजार. ब्रिटिशांनी कच्छ संस्थानाला १७ तोफ सलामींचा मान दिला होता.

सिंधच्या सामा जमातीचा प्रमुख, जाडा याने पुतण्या लाखो जडानी याला दत्तक घेतल्यावर जाडाला पुत्र झाला. त्यामुळे लाखोने सिंध सोडून गुजराथच्या दलदलीच्या प्रदेशात स्थलांतर करून ११४७ साली छोटे राज्य वसविले. पुढे १५४९ साली त्याचा वंशज महाराज खेनगारजी याने भूज येथे राजधानी ठेवून बराच मोठा राज्यविस्तार केला. खेनगारजीचे जडेजा घराणे हे राज्यकर्त्यांचे घराणे म्हणून आजही आपली प्रतिष्ठा टिकवून आहे.

जडेजा घराण्याच्या लोकांनी अफगाणिस्तानच्या मुस्लीम राज्यकर्त्यांशी आणि दिल्लीच्या मोगल शासकांशी रोटीबेटीचे व्यवहार केल्यामुळे राजपुतांच्या इतर समाजाशी त्यांना मोठय़ा संघर्षांतून जावे लागले. त्यामुळे झालेल्या राजकीय उलथापालथीमधूनही जडेजांचे राज्य सुरक्षित राहून संपन्न होत गेले.

कच्छ राज्याला त्यांचा सागरी व्यापार आणि बंदरांमुळे मोठे उत्पन्न मिळत असे. िहदी महासागरामधील सर्व बंदरांमधून कच्छी व्यापाऱ्यांचे चलन वलन होते, शिवाय झांजिबारच्या गुलामांच्या बाजारातूनही त्यांनी भरपूर पसा मिळविला. महाराव खेनगारजी तृतीय हे युरोपियन राजघराण्यांमध्ये जवळचे संबंध ठेवून होते. खेनगारजीने आपल्या कच्छ राज्याची राजधानी परत भूज येथे नेऊन १५८० साली मांडवी बंदर बांधले.

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com