सुनीत पोतनीस

२५ जून १९७५ रोजी अस्तित्वात आलेला आग्नेय आफ्रिकेतला मोझाम्बिक हा नवदेश चार शतकांहून अधिक काळ पोर्तुगीज साम्राज्याची वसाहत आणि पोर्तुगालचा एक प्रांत बनून पारतंत्र्यात होता. पोर्तुगीज राजवटीने सोळाव्या शतकात मोझाम्बिकमध्ये काही वसाहती स्थापन केल्यानंतर, तिथे येणाऱ्या पोर्तुगीज व्यापाऱ्यांना मोझाम्बिकच्या अंतर्गत भागात व्यापारी ठाणी उभारून ठरावीक कालमर्यादेपर्यंत त्या-त्या जमिनीची मालकी देण्याचे करार केले. त्यामुळे अनेक पोर्तुगीज व्यापारी मोझाम्बिकच्या अंतर्गत प्रदेशात येऊन स्थायिक झाले. अशा प्रकारे हजारो पोर्तुगीज कुटुंबे या प्रदेशात स्थायिक झाली आणि मोझाम्बिकचा सर्व प्रदेशच ‘पोर्तुगीज ईस्ट आफ्रिका’ या नावाने ओळखला जाऊ लागला. करारातील कालमर्यादा पुरी झाल्यावर पोर्तुगीजांनी मोझाम्बिकचा सर्व प्रदेश त्यांच्या वसाहतीत समाविष्ट केला.

विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात पोर्तुगाल सरकारने त्यांच्या मोझाम्बिक वसाहत प्रदेशाचे प्रशासन मोझाम्बिक कंपनी आणि झांबेजिया कंपनी या खासगी व्यावसायिक कंपन्यांकडे सोपवले. या कंपन्यांनी काही रेल्वेमार्ग बांधून बंदरपट्ट्यात काही नागरी सुधारणा केल्या. परंतु या कंपन्यांचा कारभार तत्कालीन सालाझार सरकारला समाधानकारक न वाटल्याने पुढे १९२९ आणि १९३२ साली या कंपन्यांकडून प्रशासनाचे अधिकार काढून घेऊन ते पोर्तुगालच्या वसाहती सरकारकडे देण्यात आले.

पुढे १९५१ साली पोर्तुगालच्या सरकारने आपल्या सर्व वसाहती बरखास्त करून त्यांना पोर्तुगालच्या प्रांताचा दर्जा दिल्याची घोषणा केली. १९५१ च्या वसाहतविषयक कायद्यानुसार मोझाम्बिक हा पोर्तुगाल सरकारचा एक प्रांत बनला. साधारणत: विसाव्या शतकाच्या मध्यानंतर वसाहतवादाविरोधी व कम्युनिस्ट विचारप्रणालीचा आफ्रिकेत प्रसार होऊन मोझाम्बिकमध्ये अनेक राजकीय गुप्त संघटना तयार झाल्या. मोझाम्बिकच्या जनतेत तोवर राजकीय जागृती येऊ लागली होती. पोर्तुगीज शासनाने मोझाम्बिकमध्ये स्थायिक झालेल्या पोर्तुगीजांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी जेवढ्या योजना राबविल्या, त्यांच्या तुलनेत मोझाम्बिकच्या मूळच्या जमातींसाठी, त्यांच्या शिक्षण आदी बाबींसाठी केलेल्या योजना अगदीच नगण्य होत्या, हे मोझाम्बिकवासींच्या लक्षात आले.

sunitpotnis94@gmail.com