जागतिक दर्जाच्या अनेक वाद्यवृंदांनी आणि नियमितपणे होणाऱ्या संगीत नृत्याचे जलसे यामुळे एक संगीत नगरी अशी व्हिएन्नाची ओळख झाली आहे. पाश्चिमात्य संगीतविश्वाची राजधानी मानल्या गेलेल्या व्हिएन्ना शहरातील व्हिएन्ना फिलहार्मोनिक आणि व्हिएन्ना सिंफनी हे दोन वाद्यवृंद सध्या जगविख्यात आहेत. तेराव्या शतकाच्या सुरुवातीपासून पुढे सहा शतके व्हिएन्नावर हॅब्सबर्ग घराण्याची सत्ता होती. या काळात त्या शासकांनी शहराचे स्थापत्य, कला, संगीत वगरे सांस्कृतिक विकासाला उत्तेजन दिले. निरनिराळ्या कालखंडांत विविध वाद्यवृंद, विविध संगीतकार यांनी व्हिएन्नाचे कलाजीवन समृद्ध करण्यात आपला विशेष सहभाग दिला. या कलाकारांच्या पिढीला व्हिएन्ना स्कूल ऑफ  म्युझिक असे संबोधले जाते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मोझार्ट, हायडन, बेथोवेन आणि शुबर्ट या संगीतातील दिग्गजांनी आपल्या कलाकारीने व्हिएन्नाच्या संगीतविश्वावर मोठा प्रभाव टाकला. या चौकडीला पहिले व्हिएन्ना स्कूल किंवा विनर क्लासिक म्हटले जाते. विसाव्या शतकाच्या आरंभात अर्नोल्ड शोएनबर्ग यांनी व्हिएन्ना संगीतावर आपल्या स्वतंत्र रोमँटिक शैलीने प्रभाव टाकला. अर्नोल्ड आणि त्याचे सहकारी अलवान बर्ग, आयर्विन स्टेन, जोसेफ रूफर यांच्या समूहाला दुसरे व्हिएन्ना स्कूल म्हटले जाते. गेल्या पन्नास वर्षांत बीट प्युरर, ओल्गा नूविर्थ, फ्रेडरिक चेहा इत्यादींनी सुरू केलेल्या क्लँगफोरम विन संगीतामुळे या समूहाला तिसरे व्हिएन्ना स्कूल असे नाव झाले. व्हिएन्ना फिलहार्मोनिक हा १८४२ साली स्थापन झालेला वाद्यवृंद जगातील सर्वोत्तम ऑर्केस्ट्रा समजला जातो. १८६९ साली बांधलेले भव्य व्हिएन्ना स्टेट ऑपेरा हे संगीत आणि नाटय़गृह तसेच याच नावाची नाटक कंपनी, संगीत आणि नाटय़क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाते. १००० गायक, वादक आणि अभिनेते या संस्थेचे सदस्य आहेत. व्हिएन्ना फिलहार्मोनिक वाद्यवृंदासाठी सदस्यांची केली जाणारी अतिकाटेकोर निवड व्हिएन्ना स्टेट ऑपेरा करते. १९०० साली फर्डिनंड लो याने स्थापन केलेल्या व्हिएन्ना सिम्फनी या वाद्यवृंदालाही पाश्चिमात्य संगीत क्षेत्रात मानाचे स्थान आहे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com 

 

***************************************************

 

वृक्षारोपणाची शास्त्रीय बैठक

वृक्षारोपण हे शास्त्र, कला की समाजसेवा असा प्रश्न जेव्हा विचारण्यात येतो तेव्हा त्याचे उत्तर समाजसेवा असेच मिळते. वास्तविक वृक्षारोपण हे शास्त्र असून त्यास कला आणि समाजसेवेची जोड दिल्यास लोकसहभागातून हा उपक्रम निश्चितच यशस्वी होऊ शकतो. वृक्षारोपणाची तयारी एक वर्ष आधीच हवी. परतीचा मान्सून संपला की पूर्वनियोजित जागेवर तीन मीटर अंतरावर एक याप्रमाणे एक मीटर लांब, रुंद आणि खोल असे खड्डे सरळ रेषेत खणून घ्यावेत. खोल खड्डय़ामध्ये पालापाचोळा आणि माती एकत्र मिसळून तो खड्डा भरून घ्यावा आणि तेथे खुणेसाठी दगड ठेवावेत. जो वृक्ष लावायचा आहे त्याचीच खाली पडलेली पाने खड्डय़ांमध्ये भरली असता वृक्षाला मूलद्रव्यांची कमतरता भासत नाही. झाडांची निवड दोन वर्षे आधीच करावी. या उपक्रमासाठी दोन वर्षे वयाची सारख्याच उंचीची, निरोगी रोपे निवडावीत. हिवाळा सुरू झाला की पूर्वी निवड केलेल्या खड्डय़ांमध्ये वृक्षारोपण करावे. जमिनीतील ओलावा, सभोवतालची थंडी आणि पुरेसा सूर्यप्रकाश या आवश्यक घटकांमुळे रोपाच्या मुळांना जमिनीत पसरण्यास वाव मिळतो आणि वृक्षारोपण यशस्वी होते. वृक्षारोपणासाठी देशी वृक्षाची निवड करावी, कारण जैवविविधतेच्या अधिवास आणि परिसंस्थेसाठी हे महत्त्वाचे आहे. काही निवडक सदाहरित विदेशी वृक्षांचा उदा. सोनमोर येथे अपवाद असावा. शहरामध्ये मोठय़ा रस्त्याच्या कडेला एका ओळीमध्ये मध्यम उंचीचे (उदा. भेंड) असे सदाहरित वृक्ष आणि अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा मुद्दाम लावलेली लहान फुलझाडे शहराचे हरित सौंदर्य वाढवण्यास मदत करतात. शहरांमध्ये पानझडीचे तसेच रस्त्यावर पिकलेल्या फळांचा सडा टाकणारे उंबरासारखे वृक्ष शक्यतो टाळावेत. मोठमोठी गृहसंकुले, शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट आणि शासकीय परिसरात सरळ-उंच वाढणाऱ्या वृक्षांना प्राधान्य हवे. महामार्गाच्या दुतर्फा भरपूर पर्णसंभार असलेले डेरेदार वृक्ष आणि जंगलांमध्ये स्थानिक वृक्षांना जागा असावी. टेकडय़ा, डोंगरउतारावर कमी उंचीची, मात्र मुळांचा पसारा जास्त असलेली झाडे लावावीत. समुद्रकिनारी सागरी हवामानास तोंड देणारे उंडी, सुरू, समुद्रफळ यांसारखे उंच वृक्ष असावेत. शेवटी वृक्षारोपण करताना अनुभवी वृक्षतज्ज्ञांचे शास्त्रीय मार्गदर्शन घ्यावे.

–  डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org