गणिताच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे बक्षाली हस्तलिखित दीर्घकाळ अज्ञातवासातच होते. बक्षाली या आता पाकिस्तानात असलेल्या गावात एक शेतकरी जमीन खणत असताना त्याला ७० भूर्जपत्रे सापडली. भूर्जपत्रांवरील मजकूर जुन्या शारदा लिपीत होता व भाषा संस्कृत-प्राकृत मिश्र स्वरूपाची, पण आशय समजणारी होती. बराच काळ जमिनीखाली गाडले गेल्याने हे हस्तलिखित ५ जुलै १८८१ रोजी खूपच वाईट अवस्थेत सापडले. पण तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी ते जनरल ए. कनिंगहॅम यांच्याकडे पाठवले. त्यांनी ते प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. रुडॉल्फ होर्नले यांच्याकडे सुपूर्द केले. संशोधकाच्या नजरेतून लक्ष्यपूर्वक वाचन केल्यावर त्याचे मोल होर्नले यांनी जाणले आणि सुरू झाला एका चिकित्सक शोधकार्याचा प्रवास!

प्राथमिक संशोधन पूर्ण केल्यावर होर्नले यांनी १८८३ मध्ये बंगालच्या एशियाटिक सोसायटीमध्ये आणि ‘इंडियन अ‍ॅण्टिक्वेरी जर्नल’च्या बाराव्या खंडात हस्तलिखितासंबंधी निवेदन प्रसिद्ध केले. नंतर त्यांनी १८८६ मध्ये व्हिएन्ना येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत आणि १८८८च्या ‘इंडियन अ‍ॅण्टिक्वेरी जर्नल’मध्येही संपूर्ण माहिती दिली. १९०२ मध्ये त्यांनी हे मौल्यवान हस्तलिखित ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बोडलीयन ग्रंथालयाकडे सुपूर्द केले आणि सध्या ते त्याच ग्रंथालयात आहे. बक्षाली या गावाचेच नाव मिळालेल्या या हस्तलिखिताचा बक्षाली ते ऑक्सफर्ड हा प्रवास असा रंजक आहे. बक्षाली हस्तलिखित संपूर्ण संपादित करून प्रसिद्ध करण्याची होर्नले यांची इच्छा प्रकृतीची साथ न लाभल्याने पूर्ण झाली नाही. मग प्रा. जी. आर. के यांनी भाग १ व २ एकत्रित १९२७ मध्ये आणि भाग ३ सन १९३३ मध्ये- असे ग्रंथरूपाने ते प्रसिद्ध केले. १९८१ साली या हस्तलिखिताच्या शोधाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यामुळे गणिताच्या इतिहासाचे संशोधक डॉ. राधाचरण गुप्ता यांनी एक लेख लिहिला आणि त्याच वर्षी या ग्रंथाची नवीन आवृत्ती प्रकाशित झाली, जी सध्या उपलब्ध आहे.

२०१७ मध्ये बोडलीयन ग्रंथालयाने हाती घेतलेल्या कार्बन कालगणनेमुळे बक्षाली हस्तलिखिताच्या काही पानांचा काळ इ.स. २२४ ते ३८३ इतका जुना असल्याचे आढळले. त्यामुळे हा ग्रंथ तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातला असल्याच्या होर्नले यांच्या अंदाजाला दुजोरा मिळाला. ऑक्टोबर २०१७ मध्ये लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये भरलेल्या ‘इल्युमिनेटिंग इंडिया’ या प्रदर्शनातही हे हस्तलिखित ठेवण्यात आले. मात्र, अजूनही या ग्रंथाच्या काळाबद्दल संशोधकांमध्ये एकमत नाही. तरीही, अशी भूर्जपत्रांवरील प्राचीन हस्तलिखिते जतन करून, अभ्यासून उजेडात आणण्याचे कार्य करणारे विद्वान निश्चितच प्रशंसेस पात्र आहेत.

– डॉ. मेधा लिमये

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org