05 March 2021

News Flash

राष्ट्रीय विज्ञान दिन व रामन परिणाम

रामन यांनी एकाच रंगाचे प्रकाशकिरण घेऊन ते निरनिराळ्या पदार्थातून नेले.

पदार्थावर प्रकाशकिरण टाकले असता पदार्थाची संरचना व गुणधर्मानुसार त्यांचे विकिरण (Diffractc) होते. सर चंद्रशेखर व्यंकट रामनांनी आपल्या के. एस. कृष्णन, के. आर. रामनाथन व अन्य सहकाऱ्यांबरोबर विविध पदार्थावर प्रकाशाच्या होणाऱ्या विकिरणावर संशोधन केले.

रामन यांनी एकाच रंगाचे प्रकाशकिरण घेऊन ते निरनिराळ्या पदार्थातून नेले. त्या पदार्थातून बाहेर पडणारा प्रकाश तपासून पाहिला असता, त्यांना प्रकाशाच्या तरंगलांबीत बदल झालेला दिसला.

पारदर्शक माध्यमातून प्रकाश जात असताना माध्यमाच्या अणूत किंवा रेणूत प्रकाशाची ऊर्जा काही प्रमाणात शोषली जाते. या शोषलेल्या ऊर्जेची अणूत किंवा रेणूत आंतरक्रिया होते. अणुरेणूंतील ऊर्जास्तरात बदल घडून येतात. हे बदल कायम स्वरूपाचे नसले तर शोषलेली ऊर्जा परत उत्सर्जति केली जाते. विकिरित प्रकाश हाही ऊर्जा उत्सर्जनाचाच एक प्रकार आहे. विकिरित प्रकाशाची तरंगलांबी (वेव्हलेंथ) मूळ प्रकाशापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. त्यानुसार विकिरित प्रकाशाच्या वर्णपटात मूळ प्रकाशाच्या रेषांच्या आधी किंवा नंतर अतिक्षीण अशा रेषा आढळतात. या क्षीण रेषांच्या स्थानांवरून आणि त्यांच्या दीप्ती (इंटेसिटी)वरून अणुरेणूंमधील ऊर्जेच्या स्तराविषयी माहिती मिळते. रेणूतील वेगवेगळ्या अणूंमधील बंध कशा प्रकारचे आहेत याचीही माहिती मिळू शकते. त्यामुळे रेणूंच्या संरचनेचे आकलन होऊ शकते. प्रा. रामन यांनी ही बाब प्रत्यक्ष पुराव्यानिशी ती सिद्ध केली.

हा शोध त्यांनी ‘नेचर’ या ब्रिटिश नियतकालिकास फेब्रुवारी १९२८ मध्ये पत्राद्वारे कळविला. रामन यांचे हेच संशोधन ‘रामन-परिणाम’ या नावाने जगद्विख्यात आहे. या शोधाकरिताच त्यांना नोबेल पारितोषिकाचा सन्मान प्राप्त झाला. रेणवीय संरचना व प्रारण यासंबंधी पुढे झालेल्या संशोधनावर रामन परिणामाचा इतका मोठा प्रभाव पडला की, रामन यांना आधुनिक भौतिकीच्या इतिहासातील एक आद्य विचारवंत म्हणून मान्यता मिळाली.

भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना जेव्हा पुढे आली तेव्हा सरकारने त्या वेळचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. वसंतराव गोवारीकरांकडे यासाठी सुयोग्य दिवस कोणता याची चौकशी केली. डॉ. गोवारीकरांनी कोणाचा जन्मदिन-मृत्युदिन न निवडता भारताला पहिला नोबेल पुरस्कार मिळवून देणारा विज्ञान आविष्कार ज्या दिवशी सर चंद्रशेखर व्यंकट रामनांनी जगासमोर मांडला तो दिवस निवडला; तोच तो आजचा विज्ञान दिन २८ फेब्रुवारी.

वैष्णवी कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

विष्णू डे यांची साहित्यसंपदा

विष्णू डे यांच्या सुरुवातीच्या कवितांपेक्षा १९५० नंतरची त्यांची कविता वेगळी आहे. अधिक मुक्त, तरीही संयत, पारदर्शी अशी आहे. उदा. ‘कोमल गान्धार’ (१९५३), ‘आलेख्य’ (१९५८), ‘स्मृति सत्ता भविष्यत्’ (१९६३), ‘उत्तरे भाको मौन’ (१९७७). या संग्रहातील कवितांतून त्यांचं द्रष्टेपण उठून दिसतं.

सभोवतालच्या समाजातील अनिष्ट रूढी, रीतिरिवाज यातील टोचणारा पोकळपणा व्यंग, विडंबनाच्या रूपात व्यक्त झाला आहे. ‘ऑफेलिया’, ‘क्रेसिडा’ यांसारख्या कवितांत मानवी असहायतेचे, दुभंगलेल्या मन:स्थितीचे चित्रण आहे. ‘घुडीसवार’ या प्रतीकात्मक कवितेत घोडीच्या टापांतून ध्वनित होणारी गती व ताण त्यांनी विलक्षण तन्मयतेने शब्दबद्ध केला आहे. ‘पूर्वलेख’ संग्रहातील ‘जन्माष्टमी’ कवितेत कलकत्ता महानगरीचे एक संवेदनशील पण विदारक रेखाचित्र आहे.

स्वातंत्र्य आंदोलन, फॅसिझमचा उदय व त्याला झालेला विरोध, महायुद्ध, बंगालचा भयानक दुष्काळ, जातीय दंगे, स्वातंत्र्योदय अशा घटनांचे पडसाद त्यांच्या ‘पूर्वलेख’, ‘सातभाई चंपा’ आणि ‘संदिपेर चर’मधील कवितांतून दिसतात. या काळात फॅसिझमविरोधी लेखक संघटना आणि ‘गणनाटय़ संघ’ यांसारख्या कार्यात विष्णूजी सक्रिय होते.

सामाजिक शोषण, अन्याय यावर त्यांनी प्रहार केलाच, पण कवितेच्या मर्यादांचेही त्यांना भान होते; पण त्यांनी कवितेला घोषणाबाजीसाठी वापरले नाही. त्यांच्या कविता शोषण, गरिबी आणि वर्गभेदाविरुद्ध सामान्य माणसाला एकजूट करण्याचे आवाहन करतात.

त्यांच्या ‘संदिपेर चर’ संग्रहातील ‘लाल तारा’ कवितेत साम्यवादी विचारधारेचे प्रातिनिधिक स्वरूप स्पष्ट झालेले दिसते. या कवितेत समुद्रमंथनातून निघालेल्या, सात तोंडांच्या, पांढऱ्या रंगाच्या, इंद्राच्या घोडय़ाचे खिंकाळणे आणि पक्षिराज गरुडाची आकाशझेप, प्रतीके म्हणून वापरली आहेत. यात साम्यवादी विचारधारा असली तरीही आपल्या भारतीय मिथकांचा उपयोग केलेला दिसतो. ‘नाम रेखेछि कोमल गंधार’, ‘आलेख्य’ व ‘तुमि शुधु पँचिशे बैशाख’ (१९५४-५७) या संग्रहातील कविताही वैशिष्टय़पूर्ण आहे. विष्णू डे यांना ‘अन्विष्ट’ (१९५०) व ‘आलेख्य’ (१९५६) या काव्यसंग्रहांनी त्यांना कवी म्हणून मान्यता मिळवून दिली.‘स्मृति सत्ता भविष्यत्’ (१९६३) हा त्यांचा काव्यसंग्रह ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ठरला .

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 3:38 am

Web Title: national science day
Next Stories
1 विष्णू डे  -१९७१ (बंगाली)
2 मधमाश्यांच्या मेणाच्याच शुद्धतेची मानके
3 मधाची प्रमाणबद्ध शुद्धता
Just Now!
X