News Flash

ऑक्सिजन, ग्लुकोज आणि पाणी

ऑक्सिजन, ग्लुकोज आणि साधं पाणी या तीन गोष्टींचं आपल्या मेंदूच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे.

ऑक्सिजन, ग्लुकोज आणि साधं पाणी या तीन गोष्टींचं आपल्या मेंदूच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. का महत्त्वाच्या आहेत या तीन गोष्टी? आपण दिवसभरात जे काही खातो ते केवळ पोट भरण्यासाठी असतं, अशी आपली समजूत असते. मात्र, शरीरातले इतर अवयव जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने चालावेत यासाठी हेच खाणं त्यांना मदत करत असतं, हे काही आपल्या नीटसं लक्षात येत नाही. आपला मेंदू चालतो तोही आपल्या आहारावरच. आपण जे काही खातो, त्यातूनच त्याला ऊर्जा मिळत असते.

शिकणाऱ्या व्यक्तींनी मेंदूतल्या पाण्याची पातळी कायम राखायला हवी. ती राखायची असेल तर सतत पाणी प्यायला पाहिजे. जर मेंदूतली पाण्याची पातळी बरीच कमी झाली (डीहायड्रेशन) तर त्याचा शिकण्यावर निश्चितच वाईट परिणाम होतो. याउलट जर योग्य प्रमाणात पाणी प्यायलं, तर एकाग्रता आणि स्मरणशक्तीदेखील शाबूत राहते.

पाण्याइतकी गरज असते ऑक्सिजनची. मेंदूला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होण्यासाठी गरज असते ती नियमित व्यायामाची. हल्ली वर्गात, शिकवणीच्या क्लासमध्ये मुलं सतत बसून असतात. वाहनानं प्रवास करत असतील, तर तिथंही बसावंच लागतं. सध्या टीव्ही हाही त्यांना बसवून ठेवतो. अशा प्रकारे सततच्या या बैठय़ा कारभारामुळे त्यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा व्हायला हवा, यासाठी त्यांना खेळायला द्यायला हवं.

मेंदूला पोषक ठरणारा तिसरा घटक म्हणजे ग्लुकोज. हे ग्लुकोज रक्तप्रवाहातून शोषलं जातं. यासाठी ठरावीक वेळेला आणि नियमित योग्य प्रकारचा आहार घेणं हे खूपच आवश्यक आहे.

कधीकधी असं होतं की, पोषक नसलेले पदार्थ खाल्ले जातात. यामध्ये ग्लुकोज नसतं. जेवायच्या वेळेला भूक निघून जाते. जेवावंसं वाटत नाही. जर असं झालं तर समजावं, की शरीरात आवश्यक ते पौष्टिक पदार्थ न गेल्यामुळे ग्लुकोज तयार झालेलं नाही. जर ग्लुकोज तयारच झालेलं नसेल, तर ते मेंदूला मिळणार कुठून? आणि मेंदू आपलं काम करणार कसं? मेंदूकडून नीट काम करून घ्यायचं असेल, तर त्याला पोषक पदार्थ वेळच्या वेळी देण्याची जबाबदारी आपलीच. ऑक्सिजन, ग्लुकोज आणि साधं पाणी या तीन गोष्टींची रसद मेंदूला पुरवली गेली पाहिजे.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 12:02 am

Web Title: oxygen glucose water
Next Stories
1 इथरचा निकाल!
2 कुतूहल – प्रकाशाचे स्वरूप
3 मेंदूशी मैत्री : काळजीवाहक ग्लायल
Just Now!
X