पॅरिसमधील राज्यकर्त्यांचे एक वैशिष्टय़ म्हणजे सततची युद्धे, राज्यक्रांती आणि दुष्काळ, प्लेगसारख्या संकटांना तोंड देत असतानाही राज्यातले शैक्षणिक कार्य चालू ठेवले, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा केल्या. आठव्या शतकातला राजा शार्लमेन याने प्रथम यामध्ये सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात किंग फिलीप द्वितीयच्या कारकीर्दीत त्याचा अधिकारी रॉबर्ट डी सोबरेन याच्या प्रयत्नांमुळे १२५७ साली पॅरिस युनिव्हर्सटिीची स्थापना झाली आणि शिक्षण प्रसाराला वेग आला. इ.स. १७९३ ते १८९६ या राज्यक्रांतीच्या काळात पॅरिस विद्यापीठ बंद होते. नेपोलियन तृतीयच्या काळात एकोणिसाव्या शतकात जुल्स फेरी या मंत्र्याने काही शैक्षणिक कायदे केले. त्यामध्ये मुलामुलींना सहाव्या वर्षी सक्तीचे प्राथमिक शिक्षण आणि संपूर्ण शिक्षण मोफत आणि संस्थांमध्ये निधर्मी शिक्षण हे महत्त्वाचे होते. कुठलीही धार्मिक प्रतीके जसे क्रॉस, लॉकेट, बुरखा शाळेत आणण्यास बंदी घातली गेली. १९७० साली पॅरिस विद्यापीठाचे १३ स्वतंत्र स्वयंशासित संस्थांमध्ये विभागणी झाली. या संस्थांचे पुढे सोबरेन विद्यापीठ असे नाव झाले. सध्या पॅरिसमध्ये विविध शाखांचे शिक्षण देणारी १३ सोबरेन विद्यापीठे आहेत. प्रत्येकाच्या नावात युनिव्हर्सटिी पॅरिस आणि त्यापुढे १ ते १३ असा क्रमांक असतो. जसे युनिव्हर्सटिी पॅरिस एक पॅथेआन या विद्यापीठात विधि आणि अर्थशास्त्र या शाखांचे शिक्षण आहे. युनिव्हर्सटिी पॅरिस ४ सोबरेनमध्ये भाषाशास्त्र आणि कलाविभाग या शाखा आहेत. याशिवाय अमेरिकन युनिव्हर्सटिी ऑफ पॅरिस, युनिव्हर्सटिी ऑफ लंडन इन्स्टिटय़ूट इन पॅरिस अशी परदेशी विद्यापीठेही पॅरिसमध्ये आहेत. विशिष्ट व्यवसाय शिक्षणासाठी वेगळी विद्यापीठे आहेत. आता युनिव्हर्सटिी पॅरिस फॅशन डिझायिनग असेही निराळे विद्यापीठ आहे!

– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

Untitled-18
भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ : प्रा. शिवराम कश्यप
प्रा. शिवराम कश्यप यांचा जन्म झेलम येथे ६ नोव्हेंबर १८८२ रोजी झाला. त्यांनी पंजाब विद्यापीठातून मॅट्रिक्युलेशनची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर आग्रा येथील मेडिकल स्कूलमध्ये डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. डिप्लोमा परीक्षेत ते उत्तम दर्जात उत्तीर्ण झाले व पुढील दोन वर्षे मेडिकल सíव्हसेसमध्ये काम केले. हे काम करत असताना त्यांनी खासगी विद्यार्थी म्हणून अगोदर इंटरमिजिएट आणि नंतर बी. एस्सी. हा अभ्यासक्रम पंजाब विद्यापीठातून पूर्ण केला आणि त्यातही प्रथम क्रमांक मिळवला. १९०९ साली त्यांनी पंजाब विद्यापीठातून वनस्पतिशास्त्र विषयात एम. एस्सी.ची पदवी प्रथम वर्गात सर्वप्रथम मिळवली. त्यासाठी त्यांना विद्यापीठाचे अर्नाल्ड व मॅकमिलन सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. नंतर १९१० साली त्यांनी केंब्रिज विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि १९१२ साळी नॅचरल सायन्समध्ये पदवी मिळवली. इंग्लंडहून परत आल्यावर काही काळ त्यांनी लाहोरच्या शासकीय महाविद्यालयात वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. याच विद्यापीठात प्रा. कश्यप वनस्पतिशास्त्राचे प्रमुख होते.
१९१९ साली मुंबईत आयोजित केलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसचे प्रा. कश्यप वनस्पतिशास्त्र विभागाचे अध्यक्ष होते. ते १९२० साली स्थापन झालेल्या इंडियन बॉटनिकल सोसायटीचे पहिले कार्यवाह होते. नंतर याच सोसायटीचे ते अध्यक्ष झाले व प्रमुख संपादक म्हणून त्यांनी विज्ञान पत्रिकेसाठी काम केले.
त्यांच्या वनस्पतिशास्त्र या विषयाच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पंजाब विद्यापीठाने त्यांना ‘होनोरीस काऊसा’- डिग्री ऑफ डॉक्टर ऑफ सायन्स या उपाधीने सन्मानित केले. प्रा. कश्यप क्रोनिका बॉटॅनिका या हॉलंड येथून प्रसिद्ध होणाऱ्या विज्ञान पत्रिकेचे सल्लागार संपादक पण होते. प्रा. कश्यपांनी वनस्पतिशास्त्रातील विविध उपशाखांवर संशोधन केले, परंतु त्यांची जागतिक कीर्तीची ओळख ब्रायोफायटा या गटावरील संशोधनाने झाली. त्यांचे ‘लिव्हरवर्टस ऑफ वेस्टर्न हिमालया’ हे पुस्तक ब्रायोफाइट्सवरील संशोधनासाठी संदर्भग्रंथ म्हणून महत्त्वाचे आहे. त्यांची संशोधनकार्यासाठी सतत भटकंती चालू असायची. यातूनच त्यांनी ‘फ्लोरा ऑफ वेस्टर्न हिमालय आणि सेंट्रल तिबेट या ग्रंथांच्या रूपाने मोठे योगदान दिले.
– अ. पां. देशपांडे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org