28 February 2021

News Flash

सात बाय अठरा!

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीच्याच धर्तीवर आपण ‘मूलद्रव्यं तितके गुणधर्म’ असंही म्हणू शकतो.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीच्याच धर्तीवर आपण ‘मूलद्रव्यं तितके गुणधर्म’ असंही म्हणू शकतो. प्रत्येक मूलद्रव्याला स्वत:चं असं खास गुणधर्म असतात. त्यामुळेच तर त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या अभिक्रियेतून हजारो प्रकारची विविध रसायनं तयार होतात. आणि या अनेकविध रसायनांनी हे अफाट विश्व व्यापलेलं आहे, असं असलं तरी बुद्धिमान माणसाने आपल्या सोयीसाठी सर्व ज्ञात मूलद्रव्यांना ‘सात बाय अठरा’च्या कोष्टकात बसवून टाकलंय. आपल्या घरामध्ये आपल्याला एखादी वस्तू सहजी मिळावी आणि त्यांचा योग्य वेळी योग्य असा वापर करता यावा म्हणून एक शिस्तबद्ध मांडणी केलेली असते. स्वयंपाकघरात वाटय़ा, पेले, मसाल्यांचे पदार्थ, पिठं, धान्यं यांच्यातले वेगळे गुणधर्म आणि त्यांच्यात असलेलं साम्य अशा दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन त्यांची शिस्तबद्ध रचना केलेली असते; तर कपाटामध्ये रोजचे कपडे, लग्नकार्याचे कपडे, थंडीचे कपडे यांचेही साम्य आणि फरक समजून घेऊन, ते रचले जातात. तीच गत मुलद्रव्यांची!

रासायनिक रचनेला अनुसरून मूलद्रव्र्यामध्ये काही साम्यं दिसतात तर कधी काही वेगळेपण! तेव्हा सर्व मूलद्रव्यांचे स्वभाव विशेष लक्षात घेऊन त्यांना ‘सारणीबद्ध’ केलं गेलंय. जसजशी माणसाला नवनवी मूलद्रव्यं ज्ञात व्हायला लागली तसतशी त्याने त्यांची मांडणी करायला सुरुवात केली. पुढे पुढे अनेक नवी मूलद्रव्यं आणि आधी माहीत असलेल्या मूलद्रव्यांचे अनके नवीन गुणधर्म शोधले जायला लागले, तेव्हा त्यांच्या मांडणीत सुधारणा व्हायला लागल्या.

एकोणिसाव्या शतकात रशियन संशोधक दिमित्री मेंडेलीव याने मात्र मुलद्रव्यांची नुसती मांडणी न करता, त्यांची ‘आवर्त सारणी’ (पिरिऑडिक टेबल) तयार केलं. काही ठरावीक कालावधीने काही ठरावीक मूलद्रव्यं सारखेच गुणधर्म दाखवतात हे समजून घेत, म्हणजेच मूलद्रव्यांच्या गुणधर्माचे आवर्ती स्वरूप लक्षात घेत, मेंडेलीवने ही अत्यंत कल्पक अशी मूलद्रव्यांची मांडणी केली, ज्यामध्ये पुढच्या शोधांची भर घालत, आजही तीच ‘आवर्तसारणी’ मूलद्रव्यांच्या माहितीसाठी अचूकपणे वापरता येतेय. गेल्या काही दशकात विसाहून जास्त मानवनिर्मित मूलद्रव्यांचा जन्म झाला आहे. त्यानाही या आवर्तसारणीत यथायोग्य स्थान दिलं गेलं आहे. आजच्या घटकेला आवर्तसारणीत ११८ मूलद्रव्यं आहेत.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष           

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

ते आले आणि इथले झाले!

भारतीय उपखंडाच्या संपन्नतेची, सुबत्ततेची माहिती अरब आणि चिनी प्रवासी व्यापाऱ्यांकडून दूरवरच्या प्रदेशातल्या लोकांना मिळाल्यावर, या प्रदेशावर प्रामुख्याने वायव्येकडून आक्रमणे सुरू झाली. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात वायव्येकडून आक्रमण करून भारतीय उपखंडात प्रवेश करणारा ग्रीक राजा अलेक्झांडर हा पहिला परकीय समजला जातो. भारतीय राजकीय इतिहासाच्या दृष्टीने अलेक्झांडरच्या स्वारीचे महत्त्व विशेष नसले तरी, त्याच्या स्वारीमुळे पुढच्या काळात परकीय सत्ताधाऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी भारतीय प्रदेशाचे प्रवेशद्वार निश्चितच खुले झाले.

अलेक्झांडरपाठोपाठ भारतीय प्रदेशात येऊन आपले राज्य कमावणारे इंडो-ग्रीक राजे, मूळचे चिनी रानटी टोळ्यांच्या जमातीतले शक, पहलक व कुषाण हे परकीय याच प्रदेशात स्थायिक झाले. त्याच काळात दक्षिणेत अरब व्यापारी, सेंट थॉमस आणि काही ख्रिस्ती धर्मप्रचारक आले. हे सर्व शक, कुषाण, अरब, ख्रिस्ती धर्मोपदेशक भारतीय जीवनशैलीत आणि संस्कृतीत समरस होऊन या संस्कृतीचाच एक भाग बनले.  पुढे बाराव्या शतकाच्या अखेरीस तुर्की, अफगाण, मुघल या परकीय आक्रमकांचा भारतीय प्रदेशावरचा अंमल सुरू झाला. या आक्रमक सत्ताधाऱ्यांमध्ये गुलाम वंश, खिलजी वंश, मुघल वंश वगरे विभिन्न वंशांचे सत्ताधीश होते. याच काळात भारतीय प्रदेशात मूळचा इराणी असलेला पारशी समाज आणि आफ्रिकन असलेला हबशी समाज इथल्या सांस्कृतिक प्रवाहात मिसळले. ब्रिटिशराज काळात  अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनी भारतीय जनतेला उत्तम प्रशासन देऊन समाज विघातक परंपरा मोडण्यासाठी कठोर कायदे केले आणि भारतीय संस्कृतीत आपले योगदान दिले. या परकीयांनी भारतीय संस्कृतीच्या विविधतेत भर घालून भारतीय संस्कृतीच्या प्रवाहात एकरूप होऊन ते येथेच रमले! अशा या परकीय व्यक्ती आणि समाजांबद्दल माहिती देण्यासाठीच या लेखमालेचं प्रयोजन.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 3:21 am

Web Title: periodic table of elements
Next Stories
1 आयस!
2 इसवीसनपूर्व काळातली मूलद्रव्यं
3 ‘अजब रसायन!’
Just Now!
X