28 February 2021

News Flash

साधी वीण (प्लेन विव्ह)

कापडात ताणा आणि बाणा गुंतवण्याची जी पद्धत अवलंबली जाते, त्याला वीण असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने साधी (प्लेन), ट्विल, सॅटिन या विणींचा समावेश होतो

| July 31, 2015 01:24 am

कापडात ताणा आणि बाणा गुंतवण्याची जी पद्धत अवलंबली जाते, त्याला वीण असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने साधी (प्लेन), ट्विल, सॅटिन या विणींचा समावेश होतो. यापकी साधी वीण ही सर्वात सोपी वीण आहे. ही वीण असलेले कापड विणताना काहीच अडचण येत नाही. तसेच दोन ताणे आणि दोन बाणे यानंतर पुन्हा तोच क्रम या विणीमध्ये अवलंबला जातो. याकरिता मागावर दोन शाफ्ट किंवा चार शाफ्ट वापरून काम भागते. यामध्ये ताणा आणि बाणा यांची अतिशय चांगल्या प्रकारे एकमेकांत गुंतवणूक (इंटरलेसमेंट) होते. त्यामुळे या विणीचा वापर केलेले कापड मजबूत असते. विणल्या जाणाऱ्या कापडाच्या एकूण उत्पादनात सुमारे ८० टक्के कापड हे साध्या विणीचे असते. यावरून कापड उद्योगातील या विणीचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. शिवाय विणकाम सोपे असल्यामुळे काही महिन्यांच्या सरावानंतर विणकराला हे कापड विणणे जमायला लागते. आपल्या देशात कापड उद्योग भरभराटीला आला, त्याने मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला, त्याकरिता जी अनेक कारणे आहेत, त्यापकी हे एक महत्त्वाचे कारण आहे. या विणीसाठी खूप तांत्रिक सोयी कराव्या लागत नाहीत, त्यामुळे कापडाचा प्रतिमीटर होणारा खर्चही सीमित राहतो. या कापडाचे वर्णन स्वस्त, मस्त आणि मजबूत असे केले तर ते वावगे ठरणार नाही.
साधी वीण वापरून कापडातील इतर घटक बदलले तर सहज जमते. त्यामुळे अनेक प्रकारचे कापड ही वीण वापरून तयार करता येते. ताण्याची घनता आणि बाण्याची घनता अगदी १० पासून २०० पर्यंत ठेवणे या विणीत शक्य होते. तसेच अगदी जाडय़ाभरडय़ा सुतापासून ते अतिशय तलम सुतापर्यंत कोणतेही सूत साध्या विणीकरिता वापरता येते. उदाहरण द्यायचे झाले तर घनतेच्या बाबतीत कमीत कमी घनता असलेले बॅण्डेज कापड आणि जास्तीत जास्त घनता असलेले कापड म्हणजे पूर्वीची टाइपरायटरची रिबीन त्याचे कापड. याचबरोबर जाडय़ाभरडय़ा सुतापासून तयार होणारे लादी पुसायचे डस्टर ते अतितलम सुतापासून तयार होणारे धोतर इतकी मोठी विविधतेची साखळी साध्या विणीच्या कापडात आहे. या लवचीकतेमुळे या विणीचा वापर सर्वत्र होतो आणि म्हणूनच एकूण कापड उत्पादनातला सर्वात जास्त हिस्सा या विणीचा आहे.

– सतीश भुटडा (कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
संस्थानांची बखर

पालिताणाची जैनमंदिरे

पालिताणा शहराजवळ, दोन कि.मी. वर शत्रुंजय पर्वतरांगांवरील पुरातन जैन मंदिरे हे जैन धर्मीयांचे एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. पालिताणा राज्य स्थापनेपूर्वी अकराव्या शतकात या मंदिरांचे बांधकाम सुरू झाले; ते ९०० वष्रे अव्याहतपणे चालू होते.
चौदाव्या व पंधराव्या शतकात मुस्लीम आक्रमकांनी त्या काळात बांधकाम पूर्ण झालेल्या मंदिरांचा पूर्ण विध्वंस केल्यावर ती मंदिरे परत नव्याने बांधण्यात आली. मूळची पांढऱ्या संगमरवरात बांधलेली ही मंदिरे नंतर पिवळसर हस्तिदंती रंगाच्या संगमरवरात बांधण्यात आली. श्व्ोतांबर जैन समाजाची एकूण ८६३ मंदिरे या पर्वताच्या पाच भागांमध्ये विखुरलेली असून जैनांचे पहिले र्तीथकर भगवान आदिनाथ यांचे मंदिर यामध्ये प्रमुख समजले जाते. भगवान आदिनाथ, हा पवित्र पर्वत ९९ वेळा चढून गेले आणि तेथल्या रायण वृक्षाखाली ते चिंतन, उपासनेसाठी बसत.. त्यांनी आपले पहिले प्रवचन येथेच दिले, असे मानले जाते. भगवान आदिनाथांना ऋषभ, आदिश्वर आणि आदिनाथ अशा तीन नावांनी संबोधले जाते.
तुर्की मुस्लिमांच्या आक्रमणांमुळे पूर्ण वाताहत आणि विध्वंस झालेल्या मंदिरांची नव्याने उभारणी करण्याचे काम इ.स. १५०० मध्ये सुरू झाले. सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व मंदिरांचे बांधकाम सोळाव्या शतकात झालेले असून बहुतेक मंदिरे धनिक व्यापारी, व्यावसायिक यांनी बांधलेली आहेत. १७३० साली पालिताणा मंदिर संकुलाची देखभाल आनंदजी कल्याण ट्रस्टकडे सोपविली गेली आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पालिताणा राज्यकर्त्यांनी घेतली.
या मंदिर समूहापकी आदिनाथ, कुमारपाल, संप्रीतीराज, बिमल शहा ही मंदिरे अधिक महत्त्वाची समजली जातात. भाविक लोक मंदिरांकडे जाताना वाटेत असलेल्या अंगार पीरच्या दग्र्याचे दर्शन घेतात.
अंगार या मुस्लीम संताने तुर्की आक्रमणाच्या वेळी अनेक मंदिरांचे रक्षण केले असे म्हटले जाते. या सर्व मंदिरांच्या रक्षणाची जबाबदारी पुढे पालिताणा संस्थान राज्यकर्त्यांनी घेतली.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:24 am

Web Title: plain view
Next Stories
1 कुतूहल – विणकामाची पूर्वतयारी
2 कुतूहल- धोटाविरहित विणकाम यंत्र
3 स्वयंचलित यंत्रमागामुळे होणारे फायदे
Just Now!
X