23 July 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : प्रोसिजरल मेमरीची मदत

शिकल्यानंतर एकदम चाळीस वर्षांनंतर सायकल हातात घेतली तरीसुद्धा आपण सहज सायकल चालवू शकतो.

(संग्रहित छायाचित्र)

श्रुती पानसे contact@shrutipanse.com

कितीही वेळा वाचलं तरी समजत नाही किंवा लक्षात राहत नाही, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. विशेषत: शालेय मुलांच्या अभ्यासाच्या संदर्भात पालकांना उपाय सापडत नाहीत. आपल्या मेंदूत ज्या आठवणी साठवून ठेवलेल्या असतात, त्या आठवणींचेदेखील अनेक प्रकार असतात. त्यातला एक प्रकार म्हणजे प्रोसिजरल मेमरी. कुठल्याही प्रकारचं कौशल्य शिकण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी अशा मेमरीचे व्यायाम करणं हे अतिशय चांगलं.

आपण जेव्हा एखादी गोष्ट पायरी-पायरीने शिकतो ती गोष्ट किंवा एखादं कौशल्य आत्मसात करण्यासाठी अशा प्रकारची स्मरणशक्ती लागते. उदाहरणार्थ सायकल चालवायला शिकणं, पोहायला शिकणं. यामध्ये प्रत्येक पायरी आणि त्या पायरीवरचा सराव महत्त्वाचा आहे.  पहिली पायरी आत्मसात झाली की त्यापुढची पायरी जमते. अशा प्रकारे काही दिवसांनी आपल्याला ते कौशल्य व्यवस्थित जमायला लागतं. संशोधनातून असं दिसून आलं आहे की प्रोसिजरल मेमरीमध्ये ज्या गोष्टी साठवलेल्या असतात किंवा ज्या गोष्टी आपण पायरी-पायरीने शिस्तबद्ध पद्धतीने आत्मसात करतो, त्या आठवणी सहजासहजी पुसल्या जात नाहीत. प्रोसिजरल मेमरीची तुलना खऱ्या, घडलेल्या घटनांशी केली तर असं लक्षात येतं की काही वेळा घडलेल्या घटना विसरू शकतात, पण प्रोसिजरल मेमरीतल्या घटना सहजासहजी विसरत नाही. शिकल्यानंतर एकदम चाळीस वर्षांनंतर सायकल हातात घेतली तरीसुद्धा आपण सहज सायकल चालवू शकतो. पोहायला लागल्यानंतर कितीही वर्षांनी पाण्यात पडलो तरी हे कौशल्य विसरलेलं नसतं. मेंदूतल्या या गुणांचा आपण स्वत:च्या आणि मुलांच्या अभ्यासासाठी करून घेऊ शकतो. विशेषत: आजच्या ‘पुढे पाठ आणि मागे सपाट’च्या काळात याचा उपयोग करता येईल.

उदाहरणार्थ, एखादी गोष्ट आज शिकवल्यानंतर लगेच उद्या ती आत्मसात व्हावी अशा उद्देशाने शिकवण्यापेक्षा रोज थोडा थोडा भाग शिकवला, शिकण्याच्या भागाचे तुकडे केले तर तो भाग नीट समजेल आणि त्यामुळेच दीर्घकाळ स्मरणात राहील. एक धडा एका दिवसात शिकण्यापेक्षा चार दिवस शिकला, ते ही वाचन- विविध पद्धतीने लेखन- संभाषण – प्रयोग – आकृत्या – चित्र – व्हिडीओ- मुलाखत –  अशा अनेक पद्धतींनी आत्मसात केलं तर दीर्घकालीन स्मरणात राहील.

First Published on March 14, 2019 1:11 am

Web Title: procedural memory works