07 August 2020

News Flash

कुतूहल – पॉलिस्टर तंतूंची उत्पादन प्रक्रिया – ७

कताईच्या अधिक वेगामुळे रेणूंची सुरचना जास्त प्रमाणात होते. या गोष्टीचा फायदा घेऊन कताईची गती वाढवून वेगवेगळ्या प्रकारचे तंतू तयार करण्यात येऊ लागले.

| April 30, 2015 01:01 am

कताईच्या अधिक वेगामुळे रेणूंची सुरचना जास्त प्रमाणात होते. या गोष्टीचा फायदा घेऊन कताईची गती वाढवून वेगवेगळ्या प्रकारचे तंतू तयार करण्यात येऊ लागले.
कताईची गती सुमारे ३००० मीटर प्रति मिनिट असेल, तर रेणूंची सुरचना अध्र्या अधिक प्रमाणात होते आणि अशा प्रकारे उत्पादित केलेल्या तंतूंना ‘अंशत: सुरचित तंतू’ असे म्हणतात. पॉलिस्टरच्या तंतूंना आरामदायी बनविण्यासाठी व त्यांच्यातील बाष्पशोषण क्षमता वाढविण्यासाठी या तंतूंवर सपोतीकरण (टेक्स्चरायिझग) नावाची एक प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेसाठी कच्चा माल म्हणून अंशत: सुरचित तंतूंचा वापर केला जातो. सपोतीकरण केलेला पॉलिस्टर तंतू अशी प्रक्रिया न केलेल्या पॉलिस्टर तंतूपेक्षा वापरायला आरामदायी असतो.
कताईची गती जेव्हा ५००० ते ६००० मीटर प्रति मिनिट इतकी वाढविली जाते तेव्हा कताई प्रक्रियेमध्येच तंतूंवर एवढा ताण पडतो की, या ताणामुळे तंतूंमधील रेणूंची सुरचना जवळजवळ पूर्णावस्थेला पोहोचते. अशा प्रकारे उत्पादित केलेल्या तंतूंना ‘पूर्ण सुरचित तंतू’ (फुल्ली ओरिएंटेड यार्न FOY) म्हणतात. या तंतूंवर रेणूंच्या सुरचनेसाठी खेंचण प्रक्रिया करण्याची गरज नसते. पूर्ण सुरचित तंतूंचे गुणधर्म खेंचण केलेल्या तंतूंच्या बरोबरीने पूर्णपणे नसले तरी जवळपास जाणारे असतात. काही थोडीशी कमी तन्यता पुरणाऱ्या उपयोगासाठी पूर्ण सुरचित तंतूंचा उपयोग केला जातो. कताईच्या अधिक गतीमुळे अंशत: सुरचित किंवा पूर्ण सुरचित तंतूंचा उत्पादन खर्च बराच कमी असतो, त्यामुळे हे तंतू अतिशय लोकप्रिय झाले आहेत.  
पॉलिस्टर अखंड तंतूंच्या वितळ कताईमध्ये कताईचा वेग किंवा गती ही फार महत्त्वाची असते. एका बाजूला उत्पादन खर्च कमी होतो, तर दुसऱ्या बाजूला एक प्रक्रिया कमी होते. तरीही गुणधर्म बहुतांश सारखेच असतात. गुणधर्म तितकेच चांगले मिळून किंमत कमी झाल्यामुळेच हा तंतू ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरला.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – उत्तम प्रशासक रणजितसिंह
शेर-ए-पंजाब या उपाधीने लोकांनी गौरविलेल्या आणि शीख राज्यसंघाचे संस्थापक असलेल्या महाराजा रणजितसिंह यांचे शीख साम्राज्य इ.स. १७९९ ते १८४९ असे केवळ पन्नास वष्रे (म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर दहाच वर्षे) टिकले. त्यांनी पंजाबातील शिखांची एकजूट तर राखलीच पण आपल्या हयातीत त्यांनी ब्रिटिशांना शीख राज्यसंघात हस्तक्षेप करू दिला नाही. लहानपणी देवीच्या आजारामुळे एक डोळा अधू झालेल्या रणजितसिंहांचे वडील एका शीख गटाचे नेतृत्व करणारे मिसलदार होते. वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे मिसलची सर्व जबाबदारी रणजितसिंहाने स्वत:वर घेऊन सन्य उभे केले व प्रथम लाहोर घेतले. लाहोर राजधानी करून त्यांनी अमृतसर, आनंदपूर हे इलाखे आपल्या राज्यात सामील केले. त्यांनी शीख खालसा सेना संगटित करून शीख राज्यसंघ एक प्रबळ सनिकी शक्ती म्हणून उभे केले. नेपोलियनच्या सेनेतील इटालियन सेनानी व्हेंचुरा व फ्रेंच सेनानी एलार्ड हे वाटर्लूच्या नेपोलियनच्या पाडावानंतर रणजितसिंहांकडे नोकरीस आले. त्यांच्या साहाय्याने महाराजांनी आपली फौज आधुनिक युद्ध तंत्राने प्रशिक्षित करून घेतली. काही काळ संपूर्ण भारतभरात फक्त पंजाबवर ब्रिटिशांचा अंमल नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शीख धर्माचे काटेकोर पालन करणारे रणजितसिंह प्रथम दल खालसाचे निष्ठावंत सनिक होते. सर्व धर्मीयांमध्ये सलोखा राखणारा हा महाराजा हिंदूंसह होळी, दिवाळीत सहभागी होई तर मुस्लिमांबरोबर रमजानचे उपवास करीत असे. अशिक्षित असले तरी महाराजांनी कला, शिक्षणास प्रोत्साहन दिले. त्यांनी अमृतसरच्या हरिमदर साहिब गुरुद्वारात सोन्याचा पत्रा चढविल्यामुळे त्या मंदिरास सुवर्णमंदिर हे नाव झाले. काशीविश्वनाथ मंदिरावरही त्यांनी सोन्याचा पत्रा चढविला. अफगाण राजा शाहशुजा याला महाराजांनी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात कोहिनूर हिरा परत भारतात आला. त्यांच्या मृत्यूनंतर (१८३९ ) शीख सरदारांमधील आपसातल्या सत्ता स्पध्रेचा ब्रिटिशांनी फायदा उठवीत पंजाबचे राज्य कंपनी सरकारमध्ये सामील केले.
 सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2015 1:01 am

Web Title: production of polyester fibers procedure 7
टॅग Navneet
Next Stories
1 कुतूहल – पॉलिस्टर तंतूंची उत्पादन प्रक्रिया- ६
2 कुतूहल – पॉलिस्टर तंतूंची उत्पादन प्रक्रिया- ५
3 पॉलिस्टर तंतूंची उत्पादन प्रक्रिया ४
Just Now!
X