सध्या उत्तर प्रदेश प्रांतात असलेले, भारत-नेपाळ सीमेजवळचे आणि कोसी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले जिल्ह्य़ाचे मुख्यालय रामपूर हे रामपूर संस्थानाचे प्रमुख ठाणे होते. रामपूरचे राज्यकत्रे हे मूळ अफगाण रोहिले बारेचा वंशाचे शियापंथीय मुस्लीम होते. रामपूर राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी अवधच्या राज्याला लागून असलेल्या रोहिलखंड या त्यांच्या राज्याची राजधानी बरेली येथे होती. १७७२ साली मराठय़ांनी रोहिल्यांवर हल्ला केला होता. त्या वेळी रोहिला नवाबाने अवधच्या नवाबाकडे या लढाईत लष्करी मदत मागितली. अवधच्या नवाबाने रोहिल्यांना या सनिकी मदतीचा मोबदला म्हणून मोठी थोरली रक्कम देण्याची अट घातली. त्याप्रमाणे रोहिला नवाबाने रक्कम देण्याचे मान्य केल्यावर अवध आणि रोहिल्यांच्या संयुक्त फौजेने मराठय़ांचा पराभव केला. लढाईनंतर ठरलेली रक्कम देण्यास रोहिला नवाब टाळाटाळ करू लागला. दोन वर्षांत ठरलेल्या रकमेपकी काहीही न मिळाल्यामुळे अखेरीस १७७४ साली फैजुलखान या अवधच्या नवाबाने ईस्ट इंडिया कंपनीचे लष्करी साहाय्य घेऊन रोहिलांची राजधानी बरेलीचा ताबा घेऊन नवाबांना हद्दपार केले. पुढे कंपनीच्याच आशीर्वादाने, मदतीने रोहिला नवाब फैजुलखान याने १७७४ मध्ये रामपूर येथे छोटे राज्य स्थापन केले. इ.स. १७७४ ते १९४७ या काळात ब्रिटिश संरक्षित, अंकित राहिलेल्या रामपूर संस्थानामध्ये फक्त चार खेडय़ांचा अंतर्भाव होता. नवाब फैजुलखान याने आपल्या राज्याचे नाव बदलून मुस्तफाबाद असे करून मोठा राज्यविस्तार केला. २३५० चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या या संस्थानाला ब्रिटिशांनी १५ तोफांच्या सलामीचा मान दिला. १९४१ साली या संस्थानाची लोकसंख्या ४८ हजार होती. नवाबाने जरी राजधानीचे नाव बदलून मुस्तफाबाद केले तरी सरकारदफ्तरी आणि प्रजेमध्ये रामपूर हेच नाव राजधानी आणि राज्यासाठी वापरले गेले.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी

‘उत्तम बीजारोपणाने येणारी फळेही उत्तमच असतात’, संत तुकाराम महाराजांनी फार महान विचार जगासमोर ठेवलाय. व्यावसायिक व्यवस्थापनातदेखील याला खूपच महत्त्व आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. इच्छित परिणामासाठी योग्य कार्यसंस्कृती समोर ठेवून त्याला अनुरूप अशी योजनाबद्ध आखणी करावयाची, म्हणजेच रसाळ गोमटी फळे येण्यासाठी अनुरूप असे शुद्ध बीजारोपण करावयाचे. सिद्धी प्राप्तीसाठीची संकल्प योजनाच ही जणू! उत्पादनांचा दर्जा सातत्याने उंचावत नेत वस्त्रांचे वेळेवर वितरण होण्याला खूप महत्त्व आले आहे. जागतिक स्पर्धा तीव्र होऊ लागली आहे आणि त्यामुळे याकडे जरा जास्त लक्ष देणे क्रमप्राप्त झाले आहे. कापड उत्पादक कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना आवश्यक गुणवत्तेचे घटक जाणून घेऊन त्यांची पूर्तता होऊ शकेल, अशा गुणवत्तेची वस्त्रनिर्मिती करण्याची खबरदारी घेण्याची गरज आहे. यशस्वी मार्केटिंगसाठी उत्पादन प्रक्रियेचे सखोल ज्ञान खूपच आवश्यक आणि मदत करणारे ठरते. रेडीमेड गारमेंट्सचे प्राबल्य वाढत असल्याने वस्त्र उत्पादकांना या क्षेत्रास पुरवठा करण्यावर जरा जास्त भर द्यावा लागेल.
कापड उत्पादकांनी स्वत:च्या कंपनीची आपली अशी एक कार्यसंस्कृती निर्माण करावयास हवी. यासाठी सर्व विभागांचा समन्वय व सहयोग आवश्यक ठरतो. आवश्यकतेनुसार कंपनीच्या व्यवस्थापन विभागाच्या वरिष्ठांचे मार्गदर्शन आवश्यक वाटते. कारण ‘जो सक्षम/ समर्थ तोच टिकून राहतो’ हा नियम आता जास्त प्रकर्षांने लागू होतोय, असे चित्र दिसतेय. गुणवत्ता, मार्केटिंग इत्यादीबाबत स्पष्टता आणि त्यानुसार धोरण असणे खूपच आवश्यक आहे. कधी नव्हती एवढी गरज भासतेय ती एकोप्याने काम करण्याची आणि संघातील समन्वयाची. गुणवत्ताभिमुख कार्यसंस्कृती आणि नि:संदिग्ध विपणन धोरण यामुळे वस्त्रनिर्मात्या कंपनीची ग्राहकांच्या मनात खास अशी छाप निर्माण होते. मग ही विक्री बी टू बी स्वरूपाची असो अथवा रिटेल शॉपमधून उपभोक्त्यांना कापडाच्या स्वरूपात असो, ही छाप ब्रॅण्डच्या रूपात सादर होते हे नि:संशय. हीच ती ग्राहकाभिमुख तसेच गुणवत्ताभिमुख कार्यसंस्कृती, संकल्पांना अपेक्षित सिद्धी देणारे ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या संकल्पनेला मूर्त रूप देणारे आहे.
सुनील गणपुले (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org