13 December 2019

News Flash

दुर्मीळ मूलद्रव्ये

मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीत काहीशा दुर्मीळ असणाऱ्या १७ मूलद्रव्यांचा एक गट आहे.

मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीत काहीशा दुर्मीळ असणाऱ्या १७ मूलद्रव्यांचा एक गट आहे. ‘रेअर अर्थ’ या नावे ओळखल्या जाणाऱ्या या गटात स्कँडियम, यिट्रियम, तसेच ‘लँथनाइड’ या प्रकारातली १५ मूलद्रव्ये, अशा एकूण १७ मूलद्रव्यांचा समावेश होतो. या गटातील मूलद्रव्यांचे अनेक भौतिक आणि रासायनिक गुणधर्मही सारखे आहेत. म्हणूनच या गटातली अनेक मूलद्रव्ये बऱ्याच वेळा एकाच खनिजात आढळतात. मेंडेलिव्हला आपल्या आवर्तसारणीत यातील लँथेनाइड प्रकारातली मूलद्रव्ये एकाच जागेत ‘कोंबून’ बसवावी लागली. गुणधर्माच्या साधम्र्यामुळे या ‘रेअर अर्थ’ मूलद्रव्यांचा शोध गुंतागुंतीचा ठरला.

या मूलद्रव्यांच्या शोधाची सुरुवात, स्वीडनमधील यटर्बी येथील खाणीत सापडलेल्या काळ्या रंगाच्या खनिजातील यिट्रियम या मूलद्रव्याच्या शोधाने झाली. सन १७९४ मध्ये स्वीडनच्या जोहान गॅडोलीन या रसायनतज्ज्ञाने यिट्रियमचा हा शोध लावला. टंगस्टन (म्हणजे ‘जड दगड’) या स्वीडनमध्ये पूर्वी सापडलेल्या खनिजाच्या विश्लेषणातून, स्वीडिश संशोधक बझ्रेलियस आणि इतरांना १८०३ साली यिट्रियमसारखेच गुणधर्म असणाऱ्या सीरियम या मूलद्रव्याचा शोध लागला. हे सीरियम शुद्ध केल्यानंतर उरलेल्या पदार्थात स्वीडनच्याच कार्ल मोसांडरला १८३९ साली लँथेनम हे मूलद्रव्य सापडले. त्यानंतर मोसांडरने आपले लक्ष पूर्वी शोधल्या गेलेल्या यिट्रियमकडे वळवले. या यिट्रियमच्या शुद्धीकरणात त्याला, १८४२-४३ सालांत एर्बियम आणि टर्बियम ही मूलद्रव्ये सापडली. हे सर्व शोध रासायनिक पद्धतींद्वारे लावले गेले होते. परंतु रासायनिक गुणधर्मातील साधम्र्यामुळे या गटातील आणखी मूलद्रव्ये त्यानंतर बराच काळ सापडली नाहीत. अखेर रासायनिक विश्लेषणासाठी वर्णपटशास्त्राचा वापर सुरू झाला आणि १८७८ सालापासूनच्या तीन दशकांत आणखी ११ मूलद्रव्यांचा शोध लागला.

शेजारी मूलद्रव्यांचे अणुभार हे एक-एकच्या फरकाने नसल्याने, मेंडेलिव्हच्या अणुभारावर आधारलेल्या आवर्तसारणीवरून या गटात आणखी किती मूलद्रव्ये असावीत, याचा अंदाज येत नव्हता. शेजारी मूलद्रव्यांचे अणुक्रमांक मात्र एक-एकच्याच फरकाने असल्यामुळे, अणुक्रमांकावर आधारलेली आवर्तसारणी अस्तित्वात आल्यावर निओडायमियम आणि सॅमॅरियम या दोन मूलद्रव्यांच्या मधली, ६१ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याची जागा रिकामी असल्याचे स्पष्ट झाले. अखेरीस १९४७ साली, अमेरिकेतील ओक रिज येथील युरेनियमच्या विखंडनावरील संशोधनातून ६१ अणुक्रमांकाचे प्रोमेथियम हे किरणोत्सारी स्वरूपाचे मूलद्रव्य शोधले गेले.. आणि या ‘रेअर अर्थ’ गटातील सर्व मूलद्रव्यांचा शोध पूर्ण झाला!

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on August 5, 2019 12:05 am

Web Title: rare chemical element mpg 94
Just Now!
X