05 August 2020

News Flash

मेंदूशी मैत्री : वास्तव उत्तरं

इंटरनेट वापराबाबतीत लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, त्यातल्या बहुसंख्य (खरं म्हणजे सर्वच) गोष्टी या पाश्चात्त्य संस्कृतीशी अनुरूप असतात.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. श्रुती पानसे

वयात यायच्या काळात मुलांना आसपास बघून कित्येक मूलभूत प्रश्न पडायला लागतात. साहजिकच अशा प्रश्नांची उत्तरं इंटरनेटवर शोधली जातात. पण अनेकदा लक्षात आलंय की, आपल्या- भारतीय मुलांचे प्रश्न आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेली उत्तरं ही वेगळी असतात. एखाद्या प्रश्नावर भलतीच माहिती समोर येते. जास्तीची माहिती येऊन मनावर अक्षरश: आदळते. या सगळ्या माहितीचं मुलांनी काय करायचं असतं? मुलं छायाचित्रं बघतात. व्हिडीओ बघतात. एकमेकांना दाखवतात. पण यामुळे प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. ती तशीच अनुत्तरित राहतात.

इंटरनेट वापराबाबतीत लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, त्यातल्या बहुसंख्य (खरं म्हणजे सर्वच) गोष्टी या पाश्चात्त्य संस्कृतीशी अनुरूप असतात. आपल्या परिस्थितीचा काही संबंधच नसतो. उदा. टीन एजर्ससाठी चालवलेल्या एका संकेतस्थळावर- नऊ  वर्षांच्या मुलीला संतती प्रतिबंधक औषधांबद्दल कसं सांगावं, याची चर्चा होती. तर एका १३ वर्षांच्या मुलीनं मानसशास्त्रज्ञ स्त्रीला असा प्रश्न विचारला होता की- मी वयात आले आहे, पण हे कळत नाहीये की आईला कसं सांगू? आपल्याकडे हा असा प्रश्नच गैरलागू ठरतो. कारण आई कितीही ‘बिझी’ असली, तरी तिचं स्वत:च्या वयात येऊ  घातलेल्या मुलीकडे लक्ष असतंच. मात्र यांसारखे अनेक प्रश्न इंटरनेटवरील संकेतस्थळांवर असतात.

त्यामुळे इंटरनेटवर सल्ले विचारताना आणि दिलेले सल्ले विचारात घेताना हा संस्कृतीतला फरक नक्कीच लक्षात घ्यायला हवा. तिकडे चौदा-पंधराच्या वयात मुलं स्वतंत्र होतात. तर आपल्याकडे हळूहळू सुटी होऊ  लागतात. आपल्याकडची आई नेमकं तेव्हाच ठरवते, की खूप वर्ष नोकरी केली, आता जरा काही वर्ष मुलांकडे बघू. आपल्याकडचं ‘मुलांकडे बघू’ प्रकरण कधी आणि कोणत्याच वयात संपत नाही. त्यामुळे आपल्या वागण्याला आणि प्रश्नांना इंटरनेटवरून कधी कधी उत्तरं मिळत असतील, तरी ती ‘संपूर्ण उत्तर’ ठरू शकत नाहीत. यासाठी वयात येणाऱ्या मुला-मुलींना प्रश्न पडणार आहेत; पण मुलं ते प्रश्न आपणहून विचारणार नाहीत, कधी कोणाशीही बोलणारही नाहीत, हे लक्षात घेऊन जाणत्या आणि शहाण्या माणसांनी त्यांच्याशी बोलत राहणं हेच योग्य उत्तर आहे!

contact@shrutipanse.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2019 12:05 am

Web Title: really answers brain abn 97
Next Stories
1 कुतूहल : प्रतिकणांचा शोध
2 मेंदूशी मैत्री ; आपलंसं..
3 कुतूहल ; इतिहासातली वये
Just Now!
X