डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

मेंदूचं काम कसं चालतं, तो काय काय करतो, कसा ‘वागतो’? मेंदूविषयीच्या ताज्या संशोधनांचा आपल्या जगण्याशी कसा काय संबंध आहे? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं वाचकांना मिळवून देणारं हे नवं सदर!

बाळ जन्माला येतं. जन्माला आल्यावर पहिल्या काही क्षणांपासून त्याला विविध प्रकारचे अनुभव मिळायला सुरुवात होते. हे अनुभव एकूण मेंदूविकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. या प्रत्येक आणि प्रत्येक अनुभवाच्या नोंदी मेंदू करायला घेतो. माणसांचा स्पर्श, पाण्याचा स्पर्श, तापमानातले बदल, विविध लोकांचे आणि वस्तूंचे आवाज, दुधाची चव, किती तरी प्रकारचे वास, डोळ्यांसमोरून जाणारी विविध माणसं हे अनुभव बाळाच्या दृष्टीने अगदी नवीन असतात. बाळ जन्मलं की मेंदूतल्या विविध क्षेत्रांत असणारे सुटे सुटे न्यूरॉन्स लगबगीने कामाला लागतात. ते एकमेकांशी जुळायला सुरुवात होते. प्रत्येक अनुभवाचं रूपांतर विद्युत संदेशात आणि त्या संदेशाचं रूपांतर रासायनिक संदेशात होतं. ही पहिल्या काही क्षणांत सुरू झालेली ही ‘सिनॅप्स’ची प्रक्रिया आयुष्यभर कायम राहाते.

‘सिनॅप्स’ हा शब्द जरा अपरिचित आहे.. होय ना?  पण सध्या एवढंच लक्षात ठेवू की, जन्मापासून मिळणारा प्रत्येक अनुभव मेंदूत दोन न्यूरॉन्सची मत्री करत असतो. या मत्रीला मेंदूशास्त्रीय भाषेत ‘सिनॅप्स’ म्हणतात.