अ‍ॅबे नोले हा फ्रेंच संशोधक १७४८ साली द्रवांच्या गुणधर्मावर प्रयोग करत होता. त्याच्या मते, ‘द्रवाचे उकळणे म्हणजे, त्या द्रवात विरघळलेली हवा बाहेर येणे.’ आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्याला विरघळलेली हवा पूर्णपणे काढून टाकलेले अल्कोहोल उकळवून पाहायचे होते. त्यासाठी त्याने एका भांडय़ात हवारहित अल्कोहोल साठवले होते. त्या काळच्या प्रचलित पद्धतीनुसार, डुकराच्या मूत्राशयाचे पटल बांधून त्याने या भांडय़ाचे तोंड बंद केले. त्यानंतर त्यातील द्रवाचा हवेशी संबंध येऊ नये म्हणून भांडे पाण्याखाली बुडवून ठेवले. काही वेळाने त्याला अनपेक्षित असे घडलेले दिसले. अल्कोहोलच्या भांडय़ात पटलातून बाहेरचे पाणी शिरले होते आणि तेही इतक्या प्रमाणात की त्या पाण्याचा पटलावर मोठा ताण येऊन पटल बाहेरच्या बाजूला फुगले होते. नोलेने या घटनेची नोंद आपल्या द्रवांच्या उकळण्यावरील प्रयोगांच्या अहवालात एक छोटे टिपण म्हणून केली. नोलेसाठी तो विषय तिथेच थांबला. परंतु या घटनेने भौतिकशास्त्राबरोबरच जीवशास्त्रामधील एका महत्त्वाच्या विषयाला स्पर्श केला होता.

हेन्री डॉट्रोशेट हा एक फ्रेंच वनस्पतीतज्ज्ञ. त्याने १८२६ साली पेशींच्या आवरणातून द्रवाची देवाण-घेवाण कशी होते ते अभ्यासण्यासाठी काहीसा असाच एक प्रयोग केला. यासाठी त्याने वर आणि खाली असे दोन कक्ष असणारे उपकरण तयार केले. हे दोन कक्ष एकमेकांना अर्धपार्य (सेमिपरमिएबल), म्हणजे ज्यातून काही प्रमाणात पदार्थाची जा-ये होऊ शकते, अशा पटलाने जोडले होते. यातील वरच्या कक्षात ज्या द्रावणाचा प्रयोगासाठी वापर करायचा ते द्रावण घेतले आणि खालच्या कक्षात शुद्ध पाणी घेतले. काही वेळाने खालच्या कक्षातील पाणी अर्धपार्य पटलातून वरच्या कक्षात शिरत असलेले त्याला आढळले आणि वरच्या कक्षातील द्रावणाची पातळी वाढली. एक ठरावीक पातळी गाठल्यावर द्रवाचे हे स्थानांतर थांबले. द्रावणाने गाठलेली कमाल पातळी ही या द्रावणावर निर्माण झालेला दाब दर्शवत होती. डॉट्रोशेटने या दाबाला ‘ऑस्मोटिक प्रेशर’ (परासरण दाब) असे संबोधून त्याचा तपशीलवार अभ्यास केला. पेशींच्या आवरणातून द्रवाचे स्थानांतर कसे होते हे या प्रयोगांवरून सिद्ध झाले. वनस्पतींची केश-मुळे मातीतील पाणी आपल्या पेशींमध्ये कसे शोषून घेत असावीत, याचे उत्तर या संशोधनातून मिळाले.

– डॉ. नागेश टेकाळे , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org