डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

मेंदूतील कोणत्याही दोन पेशी परस्परांना जोडलेल्या नसतात. एका पेशीत आलेला विद्युत संदेश पुढील पेशीत पोहोचण्यासाठी दोन पेशींच्या मधे रसायने पाझरतात; त्यांनाच ‘न्यूरो ट्रान्समीटर्स’ म्हणतात. मराठीत त्यांना ‘संदेशवाहक’ म्हणता येईल. अशी जवळपास १०० रसायने शास्त्रज्ञांनी शोधली आहेत. ही रसायने वेगवेगळ्या भावनांशी संबंधित आहेत. आनंदभावनेशी निगडित मुख्यत: चार रसायने आहेत. डोपामाइन, सेरोटॉनिन, एन्डॉर्फिन आणि ऑग्झिटोसिन ही त्या रसायनांची नावे आहेत. यातील डोपामाइन हे उत्सुकतेशी, प्रेरणेशी निगडित आहे. ते कमी होते त्यावेळी कंटाळा येतो, उत्साह वाटत नाही. सेरोटॉनिन व एन्डॉर्फिन ही रसायने कृती करताना मिळणाऱ्या आनंदाला कारणीभूत आहेत. ऑग्झिटोसिन सहवासाच्या प्रसंगात पाझरते.

वेदना जाणवू न देणारे एन्डॉर्फिन हे रसायन अफूतील मॉर्फीनसारखे वेदनाशामक असते. ते आपल्या उत्क्रांतीमध्ये खूप महत्त्वाचे होते. आपले पूर्वज जंगलात राहत असताना या रसायनामुळेच वाचू शकले. हिंस्र श्वापदे पाठीमागे लागली असताना काटय़ाकुटय़ातून अनवाणी धावताना त्यांना झालेल्या जखमा दुखू लागल्या असत्या तर ते पळू शकले नसते. मात्र पळताना हे रसायन पाझरते आणि वेदना जाणवत नाहीत. कोणताही शारीरिक व्यायाम करताना हे रसायन पाझरते. त्यामुळे योग्य प्रमाणात व्यायाम केल्यानंतर बरे वाटते आणि पुन्हा व्यायाम करण्याची प्रेरणा मिळते. आपले शरीर हलत राहिले तर निरोगी राहते. ते हालते ठेवायला हे रसायन प्रेरणा देते.

हे रसायन तिखट पदार्थ खाल्ल्यानंतरही पाझरते. अर्थात हे सर्व पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात असे नाही, पण ते खावेसे वाटतात. कारण त्या वेळी हे रसायन पाझरते. जळजळीत मिसळ खाल्ल्यानंतर आपल्या तोंडाची आग होते. हा क्षोभ कमी करण्यासाठी एन्डॉर्फिन पाझरते. ते पाझरले की बरे वाटते. त्यामुळे पोटाला त्रास होत असला तरी मसालेदार तिखट पदार्थ खावेसे वाटतात. मेंदूतील हे रसायन अधिक वाढले की झोप आणते. हे रसायन मानसिक तणावही कमी करते. त्याचमुळे शारीरिक व्यायाम हा तणावाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी चांगला मार्ग आहे. शरीराला शांतता स्थितीत आणणारे हे रसायन दीर्घ श्वसन, साक्षीध्यान यामुळेही तयार होते. तिखट खाऊन ते वाढवण्यापेक्षा व्यायाम व ध्यान करून ते वाढवायला हवे!