27 September 2020

News Flash

वैभवशाली रोम

कला, संस्कृती, राजकारण अशा सर्वच क्षेत्रांत युरोपियन देशांवर प्रभाव पाडणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या रोम शहराबद्दल

कला, संस्कृती, राजकारण अशा सर्वच क्षेत्रांत युरोपियन देशांवर प्रभाव पाडणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या रोम शहराबद्दल, त्याच्या इतिहासाबद्दल कितीही लिहिले तरी कमी पडेल! सध्या सर्व युरोपियन देश, रशिया आणि आशिया खंडातील काही प्रदेश यामध्ये अस्तित्वात असलेली न्यायव्यवस्था, प्रशासकीय पद्धती, कला, क्रीडा संस्कृती यांचा उगम रोममध्येच झाला. जगाच्या इतिहासात ग्रीकांनंतर रोमन संस्कृती नांदली. खरे तर रोमन संस्कृती आणि जीवनशैलीतील अनेक गोष्टी ग्रीकांकडूनच आलेल्या आहेत. पुढे रोमन साम्राज्याचा प्रचंड मोठा विस्तार झाला. यामध्ये पश्चिमेस इंग्लंडपासून पूर्वेला इराणपर्यंत आणि विशेषत: भूमध्य समुद्राभोवतालचे सर्व देश रोमन साम्राज्यात अंतर्भूत होते. साधारणत: पाचव्या शतकापूर्वीच्या सहस्रकात रोमन लोकांचा इतर युरोपियन देशांशी जेते या नात्याने संबंध आला. इतर देशांशी रोमन लोकांच्या आलेल्या संबंधामुळे रोमन संस्कृतीचा पाश्चिमात्य देशांपासून पौर्वात्य देशांपर्यंत प्रसार झाला. रोममध्ये प्रथम स्थापन झालेले हे साम्राज्य इतके फोफावले की मध्यपूर्वेत कॉन्स्टन्टिनोपल म्हणजे आजचे इस्तंबुल येथे त्याची दुसरी शाखा स्थापन करावी लागली. ज्याप्रमाणे जेत्या रोमनांच्या जीवनशैलीचा प्रभाव इतर देशांवर पडून रोमनांकडून त्यांनी अनेक गोष्टी उचलल्या त्याचप्रमाणे रोमनांनीही त्यांच्या काही चांगल्या गोष्टी स्वीकारल्या. मूळ रोमन रक्तात त्यामुळे ग्रीक, नॉर्मन, स्पॅनिश, इंग्लिश, जर्मन, टर्की इत्यादी अनेक वंशांचे मिश्रण झाले. चतन्याचा ओघ, कलेचे नवनवीन आविष्कार ही रोममध्ये अखंड चालणारी प्रक्रिया असल्यामुळेच ‘ऑल रोड्स लीड टू रोम’, ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे’, ‘बी रोमन इन रोम’, ‘टू बी इन रोम’ अशा म्हणी प्रचलित झाल्या. अद्वितीय कलाकार, चित्रकार, शिल्पकार, विचारवंत, साहित्यिक आणि राजकारणी इत्यादींचे माहेरघर रोम! ज्युलियस सीझर, गॅरिबाल्डी, मुसोलिनी, बर्निनी, मायकेल अ‍ॅन्जेलो, रॅफेल, सोफिया लॉरेन, रॉबटरे रोझेलिनी अशी रत्ने रोम जगाला पुरवीत आले आहे. त्यामुळे रोमला ‘इटर्नल सिटी’ असेही नामाभिमान प्राप्त झालेय.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 
चिंच
चिंच या नावाचा पदार्थ आपण आपल्या स्वयंपाकात वापरतो. याचे मूळ उष्णकटिबंधीय आफ्रिकेत सापडते; परंतु कित्येक वर्षे भारतात वाढल्यामुळे हा आता भारतीय वृक्षच झाला आहे. म्हणूनच हा वृक्ष ‘तमारे िहद’ अर्थात ‘िहदुस्थानचा खजूर’ या नावाने ओळखला जातो. वनस्पतिशास्त्रातील ‘टॅमरिन्डस इंडिका’ नाव असलेला हा सिसालपिनेसी कुटुंबातील वृक्ष आहे. याचे खोड मजबूत असते. खोडाची साल जाड, गडद राखाडी, खडबडीत व भेगाळलेली असते. फांद्या सर्व बाजूंनी पसरलेल्या असतात. लहान वयातील वृक्ष सरळ आकारबद्ध असतात. नंतर त्यांचा आकार बदलतो व ते आकारहीन, अस्ताव्यस्त पसरतात. खोड मजबूत आणि टिकाऊ असल्यामुळे याचे आयुष्यही भरपूर असते. विशेषत: रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी हा उत्तम वृक्ष आहे.
याची पाने एकांतरीत, संयुक्त, ५ ते १२ सेंमी लांब व शिडशिडीत असतात. पर्णिकांच्या लहान जोडय़ा असतात. पाचूसारख्या तजेलदार असलेल्या कोवळ्या पर्णिका जून झाल्यावर मळकट हिरव्या, आंबट चवीच्या बनतात. फुले लहान असतात. पटकन नजरेत भरत नाहीत. फुलांचे झुबके झाडावर दिसतात. चार पांढरी बाहय़दले व तीन पिवळट पाकळ्या दिसतात. त्यावर गुलाबी लालसर रेषा असतात. तीन पुंकेसर आणि एकच स्त्रीकेसर असतो. फुले चवीला आंबट असतात. याची फळे म्हणजे लांब वाकडय़ा आकडय़ासारखी फिकट तपकिरी रंगाची शेंग. शेंगेमध्ये ८ ते १० मिमी लांब व ते ५ मिमी रुंद, हिरवट तपकिरी रंगाच्या बिया असतात. चिंच हा शब्द जरी उच्चारला तरी तिची आंबट, गोड चव आठवते. ही आंबट चव असते टार्टारिक आम्लाची. या आम्लाबरोबरच चिंचेमध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ ही जीवनसत्त्वे असतात. चिंचेच्या बिया म्हणजे चिंचोका. यात भरपूर पिष्टमय पदार्थ असतात. चिंचोक्याची पावडर खोकला बरा करते.
विविध पदार्थाना चव आणण्याचे, किंबहुना त्याची रुची वाढवण्याचे काम चिंच करते. यापासून सरबत व बीअर बनवितात. याच्या फुलांचा गुलकंद करतात. याचा औषधी उपयोग म्हणजे मादक पदार्थाचा कैफ उतरविण्यासाठी याचे सरबत देतात. तोंडामध्ये अरुची निर्माण झाली असेल तर चिंचेचे सार उत्तम रुचिवर्धक आहे.

अनिता कुलकर्णी (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2016 3:29 am

Web Title: roman empire history
Next Stories
1 बर्लिन शहर प्रशासन
2 आजचे बर्लिन
3 नागर आख्यान : बर्लिनची भिंत
Just Now!
X