01 October 2020

News Flash

कुतूहल – शेतीतला शास्त्रज्ञ : डॉ. गोविंद झेंडे

मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा उपयोग आपल्या शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी व प्रयोगात मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणाऱ्या फारच थोडय़ा व्यक्ती असतात.

| November 27, 2013 12:51 pm

मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा उपयोग आपल्या शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी व प्रयोगात मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणाऱ्या फारच थोडय़ा व्यक्ती असतात. अशांपकीच एक मृद् रसायनशास्त्रज्ञ व ऊस शास्त्रज्ञ डॉ. गोविंद काशिनाथ झेंडे.
उच्च शिक्षण व प्रदीर्घ अनुभव याच्या जोरावर त्यांची पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रात ऊस विशेषज्ञ म्हणून बढतीच्या पदावर नेमणूक झाली. तेथूनच त्यांची संशोधनाची कारकीर्द सुरू झाली. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादात त्यांनी आपले शोधनिबंध वाचले. त्यांनी ३५ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी मार्गदर्शन केले. अशा प्रकारे यशाची शिखरे गाठता गाठता १९८० साली ते राहुरी येथील महात्मा फुले कृषी रसायनशास्त्राचे प्रमुख व नंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे डीन या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतरची २५ वष्रे त्यांनी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन या संस्थेच्या कार्याला वाहून घेतले. या काळात व्हर्मी कंपोस्ट, सेंद्रिय शेतीसंबंधी त्यांनी ‘इन्रा’ या संस्थेच्या सहाय्याने गांडुळे व संबंधित विषयांवर अभ्यास करून उसाच्या उत्पादकतेत वाढ करून दाखवली.
‘उसाच्या पिकाचे शास्त्र’ हा त्यांनी मराठीत, दोन खंडांत लिहिलेला ४०० पानी ग्रंथ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरला आहे. त्यासाठी त्यांना २००३ साली अलाहाबादच्या भारतीय कृषी रसायन संस्थेतर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार, ‘कृषी रसायनशास्त्र रत्न’ पुरस्कार आणि ‘सायंटिस्ट ऑफ एमिनन्स’ पुरस्कार असे सन्मान मिळाले आहेत. मृद् शास्त्रातील मायक्रोन्यूट्रियंट, व्हर्मि- कंपोस्ट यांचा उसाच्या पिकावरील परिणाम या विषयांवर त्यांनी लिहिलेल्या प्रबंधाला मान्यता देऊन २००१ साली अमेरिकेतील वॉिशग्टन विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. मृद् रसायन व ऊस शास्त्रज्ञ डॉ. गो. का. झेंडे यांनी ३० डिसेंबर २००८ रोजी या जगाचा निरोप घेतला.
-शुभदा वक्टे , मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वॉर अँड पीस- हृदयरोग व नैराश्य
एखाद्या धडधाकट तरुण व्यक्तीला एकाएकी ‘हार्टचा दौरा’ आला, की तो जो धास्तावतो, त्याला तोड नसते. कारण घरचे, जवळचे नातेवाईक, थोरथोर वैद्यकीय चिकित्सक त्याला सक्तीने विश्रांती घ्यायला लावतात. दिवसातील अल्प झोपेचे तास सोडले तर तो सारखा विचार करत राहतो. वरवर ठीकठाक वाटला तरी निराशेमुळे तो खचतो, खंगत जातो, आत्मविश्वास, हिम्मत गमावून बसतो. आपल्याला पुन्हा हार्टअ‍ॅटॅक आला तर आपले, आपल्या कुटुंबाचे, मुलाबाळांचे, नोकरीधंद्याचे काय होणार? या प्रश्नांनी तो नैराश्याच्या घेऱ्यात सापडतो. अशा वेळेस जवळच्या माणसांनी त्याला धीर द्यायला लागतो. फार पूर्वी
‘‘मन शुद्ध तुझे, गोष्ट आहे पृथ्वी मोलाची।
तु चाल पुढे, तुला रे गडय़ा भीती कुणाची; पर्वाभी कुणाची ।।’’
असे एक गाणे १९५० साली सिनेरसिकांच्या सतत तोंडी असे.
 नैराश्यग्रस्त रुग्णमित्रांना ‘‘तू दणदणादण हो;  तुला काही होता कामा नये, अशी हिम्मत द्यावी लागते.  यावर एक रुग्णमित्र म्हणाले, मुळात हृदय हा अवयव नाजूक, त्यात हार्टअ‍ॅटॅक. घरी कच्चीबच्ची, बायको घाबरलेली. तुमच्या तत्त्वज्ञानापेक्षा माझी निराशा पूर्ण होईल असे टॉनिक द्या पाहू!
हृदयरोग व नैराश्यामुळे रुग्ण जेव्हा चिंताग्रस्त होतो तेव्हा त्याचे जेवणावरचे लक्षही उडते. खाणे-पिणे तुटते, आपल्या आहारातून आहाररस व रसधातू; त्यानंतर रक्त व या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून हृदयाचे अखंड काम अशी सामान्य शरीरक्रिया आहे. हृदयरोगी नैराश्यग्रस्त रुग्णाला जेवण नीट जावे, पचावे याकरिता ‘अरुची’ या लक्षणाकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. आयुर्वेदीय औषधी महासागरात शेकडो टॉनिके आहेत. त्यांच्यापेक्षा अन्नपचन व मेंदूला बल यावर लक्ष द्यायला हवे. भोजनोत्तर पिप्पलादिकाढा, आम्लपित्त वटी, सकाळ- सायंकाळ सारस्वतारिष्ट, ब्राह्मीवटी, चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादि वटी, झोपताना निद्राकर वटी, आस्कंदचूर्ण यांची तारतम्याने निवड करावी. शुभं भवतु!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..  – लग्न
माझ्या सासऱ्यांनी मला एक महत्त्वाचे ज्ञान दिले. ते म्हणाले, ‘निसर्गात जसे उंटिणीचे लग्न उंटाशी किंवा हत्तीचे लग्न हत्तिणीशी होते तसे माणसांमध्ये नसते. स्त्री आणि पुरुष हे दोन प्रकारचे प्राणी आहेत.’ मला वाटते अन्य प्राण्यांमध्ये ‘रात गयी तो बात गयी’ असते. आपल्यात रात गेल्यावर बात सुरू होते. ती जैविकतेच्या पुरात डुबलेली असते, मुले झाल्यावर त्यांच्या बोबडय़ा भाषेमुळे थोडीफार शृंगारते आणि मग जैविकतेचा पूर ओसरल्यावर जेव्हा खरे तर नदी संथ व्हायला हवी, तसे न होता मग ती बात रात्री आणि दिवसा दोन्ही व्यावहारिक होते. लग्नाच्या बेडीतलेच नव्हे तर फी’ Relationship मधले  कचाकचा भांडू शकतात किंवा रुसून अगदीच अबोला धरतात, कधी टोमणे मारतात, तर कधी छद्मी हसून तितक्याच तीव्रतेने आपल्या मनातला मतलब दुसऱ्याला फेकून मारतात.
माहेर आणि सासर या गोष्टी नाटकाच्या प्रवेशाच्या मागचा पडदा असतो. विंगेतून प्रवेश करणारे प्रत्येक पात्र जवळजवळ कधीही या दोन प्राण्यांच्या मनामध्ये तोच भाव निर्माण करीत नाही. त्यावरून मतभेद होतात. सगळं काही समप्रमाण असले पाहिजे हे तत्त्व मान्य करूनही जरा नवरा स्वयंपाकघरात मदतीच्या हेतूने शिरकाव (!) करू लागला तरी त्याचे स्वागत होत नाही आणि आर्थिक बाबीत मला हक्क हवेत, असे म्हणणारी आणि स्वत: कधीकधी नवऱ्याइतकीच किंवा जास्त कमाविणारी स्त्री आयत्या वेळी (इतर वेळी नीट हिशेब करणारी) तूच बघ सगळं मला कंटाळा येतो म्हणून मोकळी होते. परवा माझ्याबरोबर शस्त्रक्रिया करताना संथपणे काम करणारी एक परिचारिका घाईत होती. म्हणाली, लवकर संपवू या. सणाच्या दिवशी उशीर झाला तर सासू भडकते. मी म्हणालो, नवऱ्याकडे तक्रार कर. तशी म्हणाली, अहो सासऱ्यांनासुद्धा जुमानत नाही. नवरे म्हातारे होतात तशा या सरसावतात आणि पितृसत्ताक आणि पुत्रसत्ताक पद्धतीप्रमाणेच मातृसत्ताक राज्य पद्धती अमलात आणतात.
मला माहीत असलेल्या कुटुंबात निदान चाळीस टक्के कुटुंबात बायका अगदी कजाग नाहीत, पण वरचढ आहेत. काही (subversive)  कारस्थानी आहेत. पुरुष हताश तरी आहेत किंवा गपचीप बसले आहेत. जे normal आहेत ते आरडाओरड करतात. सत्ता गाजवतात; परंतु प्रजा म्हणजे बायको आणि मूल त्यांना अन्यायी राजा म्हणतात. अशा Dysfunctional स्थितीत संसार चालतात. बहुसंख्य जोडण्यांच्या बाबतीत हेच खरे असते. जिथे असे नसते त्या जोडप्यांच्या वर्तमानपत्रात, पाक्षिकांमध्ये मुलाखती छापतात. त्या अपवादांमुळे नियम सिद्ध होतो. असो. started hot now we are warm अशी समजूत करून घेत म्हातारपण येते.
 त्या पुरुषांच्या म्हातारपणाबद्दल उद्या; म्हणजे समतोल साधता येईल.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत   – २७ नोव्हेंबर
१९१४> कथाकार दिगंबर बाळकृष्ण मोकाशी यांचा जन्म. लामणदिवा,  वणवा  मिळून ११ कथासंग्रह. देव चालले, आनंद ओवरी  या कादंबऱ्या, तसेच पालखी, १८ लक्ष पावलं अशी प्रवासवर्णने, संध्याकाळचे पुणे (ललित), रेडिओदुरुस्ती व्यवसाया-बद्दलचे पुस्तक व बालसाहित्यदेखील त्यांनी लिहिले. जून १९८१ मध्ये त्यांचे निधन झाले.
१९४६ >   श्रीधर गणेश भालेराव यांचे निधन. गीतेचे रचनांतर, आईनस्टाईनप्रणीत सापेक्षी दर्शन, सुखदु:खविवेक, पुनर्जन्म विरुद्ध पुनर्जतन इ. ग्रंथ, तसेच वैयक्तिक अमरत्व आदी ग्रंथ त्यांनी लिहिले.
१९५२> भाष्यकार शंकर रामचंद्र तथा अहिताग्नी राजवाडे कालवश. नीत्शेचा ख्रिस्तांतक आणि ख्रिस्तांतक नीत्शे,  गीताभाष्य, षट्दर्शन समन्वय आणि पुरुषार्थ मीमांसा   ईशावास्योपतिषद्धाष्य, अग्निहोत्राचे स्वरूप, आदी ग्रंथ व आत्मचरित्रही त्यांनी लिहिले होते.
१९७६> गजानन त्र्यंबक  माडखोलकर ऊर्फ भाऊसाहेब कालवश. आधुनिक कवीपंचक  सह ७ समीक्षा पुस्तके, मुक्तात्मा, डाकबंगला, आदी १८ कादंबऱ्या, दोन कथासंग्रह व दोन नाटके  आणि बेळगावच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनात (१९४६) मांडलेला संयुक्त महाराष्ट्राचा ठराव, हे त्यांचे संचित होय.
– संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2013 12:51 pm

Web Title: scientists of agriculture dr govind jhende
टॅग Navneet,Navnit
Next Stories
1 कुतूहल: शेतीमित्र पक्षी
2 कुतूहल: शेती, पक्षी आणि प्राणी
3 कुतूहल – पीक संरक्षण व रासायनिक औषधे
Just Now!
X